शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2023 (20:24 IST)

टोरनॅडो म्हणजे काय? भारताला या वादळांपासून काही धोका आहे का?

प्रचंड वेगानं वाहणारे वारे, उद्ध्वस्त झालेली घरं आणि मोडून पडलेली झाडं...
 
25 मार्चला पंजाबच्या फझिल्कामध्ये टोरनॅडोचा तडाखा बसला, ज्यात गाईगुरांचं आणि घरांचं मोठं नुकसान झालं आणि सहाजण जखमी झाले.
 
शनिवारी 25 मार्चलाच अमेरिकेच्या मिसीसीपी राज्यालाही अशा एका वादळाचा मोठा तडाखा बसला आणि त्यात किमान 25 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक हवामान विभागानं दिलेला माहितीनुसार किमान तासभर या वादळानं धुमाकूळ घातला.
 
पण टोरनॅडो म्हणजे नेमकं काय असतं? हे वादळ कशामुळे येतं? आणि भारताला, विशेषतः महाराष्ट्राला त्यापासून किती धोका आहे, जाणून घेऊयात.
 
टोरनॅडो म्हणजे काय?
पृथ्वीवरच्या सर्वांत विनाशकारी वादळांमध्ये टोरनॅडोंचा समावेश केला जातो. ही वादळं वावटळीसारखी दिसतात, पण वावटळीपेक्षा ती वेगळी आणि कित्येक पटींनी शक्तीशाली असतात.
 
अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अटमॉस्फेरिक अडमिनिस्ट्रेशननं केलेल्या व्याख्येनुसार टोरनॅडो म्हणजे एक असं निमुळता, वेगानं गरगर फिरणारा हवेचा स्तंभ जो एखाद्या वादळातल्या ढगांमधून खाली जमनीवर उरतो.
 
एरवी हवा पारदर्शी असते, पण हा हवेचा स्तंभ पाण्याचे थेंब, धूळ आणि इतर गोष्टी मिसळल्यानं एखाद्या भोवऱ्यासारखा दिसू लागतो.
 
जमिनीवर टेकल्यावर हे वादळ कुठे कसं भरकटेल हे अचूक सांगता येणं कठीण असतं.
 
ट्विस्टर, व्हर्लविंड अशा नावांनीही हे वादळ ओळखलं जातं. मराठी विश्वकोषानुसार टोरनॅडोला ‘घूणावर्ती वादळ’ म्हणूनही ओळखतात.
 
टोरनॅडो कसं तयार होतं?
बीबीसी वेदर सेंटरनुसार टोरनॅडो निर्माण होण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. उदा. तीव्र उष्णता.
 
ऊन्हामुळे जमीन तापली की जमिनीलगतची बाष्प असलेली हवा तापते आणि वर उठते.
 
ही उष्ण आणि बाष्पयुक्त हवा वरच्या थरातल्या थंड हवेला जाऊन धडकते, आणि त्यातून झपाट्यानं ढग आणि वादळ तयार होतं. त्यातून वीजा चमकू शकतात आणि पाऊस पडू शकतो.
 
वर उठणाऱ्या हवेचा वेग खूपच वाढला तर चक्राकार गतीनं फिरू लागते. ढगातून एक कोना किंवा शंकुसारखा स्तंभ खाली जमिनीवर उतरतो आणि भोवऱ्यासारखा फिरताना दिसतो. हेच ते टोरनॅडो.
 
टोरनॅडोचा आकार वेगवेगळा असू शकतो आणि काहीवेळा ते शेकडो मीटर रुंद असू शकतं. तसंच या वादळाचा कालावधी काही सेकंदांपासून ते एखाद्या तासभरापर्यंतही असू शकतो.
 
काही टोरनॅडो लगेच विरून जातात तर काहीवेळा टोरनॅडो कित्येक मैलांपर्यंत प्रवास करून जातात आणि वाटेल आलेल्या सगळ्या गोष्टी नष्ट करतात.
 
एखाद्या शक्तीशाली टोरनॅडोमध्ये ताशी पाचशे किलोमीटर पर्यंत वेगानं वारे वाहू शकतात. म्हणजे एखाद्या चक्रीवादळापेक्षाही हा वेग जास्त आहे.
 
टोरनॅडो तयार होण्याच्या घटना लोकलाईज्ड म्हणजे स्थानिक हवामानाशी निगडीत असतात. हवामानशास्त्रज्ञ कुठली परिस्थिती टोरनॅडोसाठी पोषक आहे याचा अंदाज बांधू शकतात, पण बहुतांश वेळा त्याविषयी अचूक भाकित करता येत नाही.
 
टोरनॅडो प्रामुख्यानं उत्तर अमेरिका खंडात आढळतात. कारण तिथली, विशेषतः यूएसएच्या मधल्या भागातील काही राज्यांतली परिस्थिती टोरनॅडोंच्या निर्मितीसाठी पोषक आहे. म्हणून या प्रदेशाला टोरनॅडो अ‍ॅली म्हटलं जातं.
 
पण म्हणजे जगात बाकीच्या ठिकाणी टोरनॅडो येतच नाही, असं नाही.
 
भारतात टोरनॅडोचा किती धोका?
भारताच्या बहुतांश भागात शक्तीशाली टोरनॅडो येण्याच्या घटना तशा दुर्मिळ असल्याचं भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर सांगतात.
 
पण पूर्वोत्तर म्हणजे ईशान्य भारतात एप्रिल-मे महिन्यांत नॉर्वेस्टर वादळं येतात तेव्हा टोरनॅडोंची निर्मिती होणं नवं नाही अशीही माहिती ते देतात. नॉर्वेस्टर वादळांनाच पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात कालबैसाखी म्हणून ओळखलं जातं.
 
ईशान्य भारतात टोरनॅडोसारख्या घटनांच्या काही नोंदीही आढळतात. गेल्या वर्षीच मे महिन्यात आसाममध्ये कमी तीव्रतेचं टोरनॅडो आलं होतं.
 
पंजाब, दिल्ली किंवा महाराष्ट्रात अशी वादळं अभावानंच नोंदवली गेली आहेत. पर्यावरण अभ्यासक आणि भवताल मासिकाचे अभिजीत घोरपडे यांनी अशा वादळांचं वार्तांकन केलं होतं. ते सांगतात,
 
“एक घटना 2018 साली घडली होती. पुणे जिल्ह्यात जेजुरी मोरगाव रस्त्यावर नाझरे नावाचं गाव आहे. तिथे टोरनॅडो आलं होतं आणि तो प्रचंड कुतुहलाचा विषय ठरला होता. 2020-21च्या आसपास सोलापूर जिल्ह्यात एक टोरनॅडो पाहिलं गेलं त्याचीही चर्चा झाली होती."
 
पण केवळ अलीकडच्या काळातच नाही तर पूर्वीही या घटना घडत असाव्यात असं अभिजीत यांना वाटतं.
 
“टोरनॅडो जेव्हा एखाद्या जलसाठ्यावरून जातं, तेव्हा तिथल्या सगळ्या गोष्टी उचलून घेतं, शोषून घेतं. त्याची तीव्रता संपल्यावर त्या सगळ्या गोष्टी खाली पडतात. ते एखाद्या जलसाठ्यावरून गेलं असेल आणि त्यानं मासे उचलले असतील तर मग माशांचा पाऊस सारख्या घटना घडू शकतात. त्यामुळे जुन्या काळात माशांचा पाऊस झाला, बेडकांचा पाऊस झाला असे जे उल्लेख आहेत, त्यामागे टोरनॅडोच असण्याची शक्यता आहे.”
 
टोरनॅडोंची तीव्रता आणि ते तयार होण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत का, याविषयी संशोधक तपास करत आहेत. नेमकी ही वादळं कशी येतात आणि त्यांचं स्वरुप काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी अशा नोंदी महत्त्वाच्या आहेत.
 
अभिजीत सांगतात, “अलीकडे या गोष्टींच्या नोंदी वाढल्या आहेत कारण सर्वांच्या हातात स्मार्टफोन्स आले आहेत. त्यामुळे या घटना रेकॉर्ड करणं, रेकॉर्ड केल्यावर सर्वांपर्यंत पोहोचवणं हे सहज शक्य झालं आहे. पूर्वी ही साधनं नसल्यानं अशा घटनांच्या नोंदी कदाचित झालेल्या नसतील. पण आता ती नोंद होते आहे, लोकांचं या गोष्टींविषयी कुतुहल वाढतंय.“
Published By -Smita Joshi