मुंबई बिघडविणार दिल्लीचे समीकरण?
मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, ते दिल्ली कॅपिटल्सविरुध्द आज (शनिवारी) होणार्या आयपीएलच्या सामन्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता विजय नोंदवून गुणतालिकेत अव्वलस्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला तर दिल्लीचे गणित बिघडू शकते.
चेन्नईच्या कोलकातावरील विजयामुळे मुंबईचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित झाले आहे. त्यांचे 16 गुण झाले आहेत व धावगतीही चांगली आहे. त्यांचा संघ अव्वल दोनमध्ये कायम राहणे जवळजवळ निश्चित आहे. दिल्लीचे 14 गुण असून त्यांचा संघ तिसर्याल स्थानी आहे.
सलग तीन पराभव झाल्याने दिल्लीचा संघ खडबडून जागा झाला असून त्यांना सामन्यातील कोणताही ढिलेपणा महगात पडू शकतो. त्यांना प्ले ऑफमधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी एका विजयाची गरज आहे. त्यांचे मुंबई व बंगळुरूशी उर्वरित दोन सामने होणार आहेत. हे दोन्ही सामने गमवल्यास दिल्लीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागू शकते.
स्नायू दुखावल्याने नियमित कर्णधार रोहित शर्मा सलग चौथ्या सामन्यातही बाहेर राहू शकतो. मात्र, मुंबईकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. मुंबईने मागील सामन्यात बंगळुरूला पराभूत केले आहे ते दिल्लीविरुध्द अडचणी उभ्या करू शकतात.
मुंबईचे फलंदाज व गोलंदाज आपल्या परीने पूर्णपणे योगदान देत आहेत. याच्या विरोधात मागील काही सामन्यांमध्ये दिल्लीच्या फलंदाजांची कामगिरी संघासाठी अनुकूल झालेली नाही. हैदराबादविरुध्दच्या सामन्यात त्यांचे फलंदाज खूपच दबावाखाली दिसून आले. कगिसो रबाडा व एन्रिच नॉर्त्जे चांगली गोलंदाजी करत आहेत. मात्र, अन्य गोलंदाजांकडून त्यांना साथ मिळत नाही.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.