रविवार, 26 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By भाषा|

राजस्थान रॉयल्स आयपीएलचा बादशहा

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) आज झालेल्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध तीन गडी राखून दणदणीत विजय मि‍ळवून आयपीएलचा पहिला बादशहा होण्याचा मान पटकाविला.

शेवटच्या चेंडूपर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात चेन्नई संघ बाजी मारेल असे वाटत होते. परंतु, बालाजीने टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर सोहेल तन्वीरने एक धाव काढून संघाला निर्णायक विजय मिळवून दिला.

नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने मर्या‍दीत 20 षटकात पाच गडी गमावून विजयासाठी 163 धावांचे आव्हान राजस्थान रॉयल्सपुढे ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरवात मात्र खराब झाली होती. सलामीवर नीरज पटेल अवघ्या दोन धावांवर गोनीच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्याच्या जोडीला असलेला असनोडकरही लवकरच झेल बाद झाला. त्याने 20 चेंडूत चार चौकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या कामरान अकमललाही सूर गवसला नाही आणि राजस्थान संघाला घसरगुंडी लागली होती.

परंतु, त्यानंतर फलंदाजीस आलेल्या वॉटसन व युसूफ पठाण या जोडीने संघाला सावरले. वॉटसनने 19 चेंडूत तीन चौकाराच्या मदतीने 28 धावांचा खेळ केला. या जोडीने 66 धावांची भागिदारी करून संघाला मजबूत स्थितीत नेले. युसूफने आक्रमक फलंदाजी करताना 39 चेंडूत चार षटकार व तीन चौकाराच्या मदतीने आपले अर्धशतक (56) पूर्ण केले. परंतु, अधिकाधिक धावा काढण्याच्या नादात तो धाव‍चित झाला आणि पुन्हा एकदा संघ अडचणीत सापडला.

मात्र, त्यानंतर आलेला मोहम्मद कैफ 12 धावा काढून बाद झाला आणि सामना अत्यंत चुरशीचा बनला. कर्णधार शेन वॉर्न व सोहेल तन्वीर या जोडीने संयमी खेळ करत शेवटच्या चेंडूवर संघाला विजय मिळवून दिला.

'मॅन ऑफ द मॅच' च्या पुरस्काराने युसूफ पठाण तर 'मालिकावीर' म्हणून शेन वॉटसनला सन्मानित करण्यात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते विजेत्या संघाला आयपीएल डीएलएफ ट्राफी व 4.8 कोटीचे बक्षीस देण्यात आले. तउपविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला 2.4 कोटीचे बक्षीस देण्यात आले.

चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पार्थिव पटेलने आक्रमक फलंदाजी करताना 33 चेंडूत पाच चौकाराच्या मदतीने सर्वात जास्त 38 धावा केल्या. सलामीला आलेल्या एस. विद्यूतलादेखील चांगला सूर गवसला नाही आणि त्याने युसूफ पठाणच्या चेंडूवर रविंद्र जडेजाकडे झेल दिला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या सुरेश रैनाने सर्वात जास्त 30 चेंडूत दोन षटकार व एका चौकाराच्या मदतीने 43 धावा काढल्या आणि संघाला चांगला स्कोर करून दिला. परंतु, वॉटसनच्या चेंडूवर तो जडेजाकरवी झेलबाद झाला. नंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 17 चेंडूत नाबाद 29 धावांचा खेळ केला होता.