ममतांनी उखडला डाव्यांचा तंबू
तृणमूल कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या युतीने पश्चिम बंगालमध्ये जे वादळ आणले, त्यात डाव्यांचा पार पालापाचोळा करून टाकला. बंगाल व केरळ या दोन्ही बालेकिल्ल्यात डाव्यांना ३४ जागा गमवाव्या लागल्या. माकपचे उपनेते मोहम्मद सलीम, रूपचंद पाल, हनान मुल्ला, अनिल बसू, तडित बरन तोपदार हे बडे नेते यावेळी लोकसभेत जाऊ शकले नाहीत. मुल्ला व पाल आठ वेळा, बसू सातवेळा तर तोपदार सहा वेळा निवडून आले होते. माकचे ज्येष्ठ नेते वासुदेव आचार्य तेवढे नवव्यांदा लोकसभेत पोहोचू शकले. गेल्यावेळी बीरभूमहून विजयी झालेले रामचंद्र डोम यावेळी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांच्या बोलपूर मतदारसंघातून सलग सातव्यांदा लोकसभेत पोहोचले. पण बाकी डाव्यांची सत्ता उखडली गेली. माकपला एकट्या बंगालमध्ये १७ जागा गमवाव्या लागल्या. केरळमध्ये ८ जागांचे नुकसान झाले. माकपने गेल्या निवडणुकीत बंगालमधील ४२ पैकी २६ व केरळमधील २० पैकी १२ जागा जिंकल्या होत्या. दोन्ही राज्यात मिळून ६२ पैकी ५० जागा माकप, भाकप, फॉरवर्ड ब्लॉक व रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पक्षाच्या ताब्यात गेल्या होत्या. यावेळी भाकपने केरळमध्ये गेल्यावेळच्या तिनही जागा गमवल्या. बंगालमध्ये भाकप, आरएसपी यांना एक व फॉरवर्ड ब्लॉकला दोन जागांचे नुकसान झेलावे लागले.