गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 24 जुलै 2022 (16:46 IST)

केरळच्या शायजाला तिच्या मिशांचा अभिमान वाटतो, कारण...

Photo -SHYJA एका भारतीय महिलेला तिच्या चेहऱ्यावर असणाऱ्या मिशांमुळे सोशल मीडियावर असणाऱ्या लोकांकडून कौतुक ऐकायला मिळतंच पण सोबत तिची या गोष्टीवरून चेष्टाही केली जाते. पण ती म्हणते, तिच्या मिशांमध्ये इंटरेस्ट घेणाऱ्या लोकांविषयी तिला काहीच फरक पडत नाही.
 
35 वर्षांची शायजा तिच्या व्हॉट्सअॅप स्टेटसच्या सेक्शनमध्ये तिच्या फोटोखाली लिहिते की, "मला माझ्या मिशा आवडतात."
 
ज्या लोकांनी तिचे फोटो फेसबुकवर पाहिलेत, जे लोक तिला प्रत्यक्षात भेटतात, ते तिला 'मिशी का ठेवतेस' म्हणून बऱ्याचदा विचारतात.
 
त्यावर ती उत्तर देते की, "मी फक्त एवढंच सांगू शकते की मला माझी मिशी खूप आवडते."
 
दक्षिणेकडील केरळ राज्यातल्या कन्नूर जिल्ह्यात राहणारी शायजा फक्त शायजाच नाव लावते आडनाव लावत नाही. इतर अनेक स्त्रियांप्रमाणे तिच्याही ओठांवर अनेक वर्षांपासून लव यायचे.
 
ती नेहमीच तिच्या भुवया कोरायची, अर्थात थ्रेड करायची. पण वरच्या ओठावरील लव काढण्याची तिला कधी गरजच वाटली नाही.
 
पण मागच्या पाच वर्षांपासून तीचे वरच्या ओठांवरील केस दाट व्हायला लागले, आणि ते मिशीसारखे दिसू लागले. आनंदित झालेल्या शायजाने ती ठेवण्याचा निर्णय घेतला.
 
"मी आता त्याशिवाय जगण्याचीही कल्पना करू शकत नाही. जेव्हा कोव्हिड सुरू झाला तेव्हा मास्क घालावे लागले. पण मला मास्क घालणं आवडत नाही, कारण त्याने माझा चेहरा झाकला जातो." असं शायजा सांगते.
 
तिला पाहणाऱ्या अनेकांनी तिला मिशी काढून टाकण्याचा सल्ला दिला. पण शायजाने त्याला नकार दिला.
 
"मला असं कधीच वाटलं नाही की मी सुंदर नाहीये. कारण माझ्याकडे हे असलं पाहिजे ते नसलं पाहिजे असं कधी झालंच नाही."
 
स्त्रियांना बऱ्याचदा असं सांगितलं जातं, चेहऱ्यावर केस असू नये, असतील तर ते काढावेत. पण यासाठी नेहमी पैसे मोजावे लागतात. आज या हेअर रिमूव्हल उत्पादनांचा अब्जावधी डॉलरचा उद्योग चालतो. यात क्रीम, वॅक्स स्ट्रिप्स, रेझर आणि एपिलेटर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि या गोष्टी अशाच महिला खरेदी करू शकतात ज्यांना ते परवडतं.
 
परंतु अलीकडच्या काही वर्षांत बऱ्याच स्त्रियांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन त्यांच्या चेहऱ्यावरच्या केसांना आहे तसं स्वीकारलं आहे. किंबहुना त्यांना त्याचा अभिमान आहे.
 
हरनाम कौर यांचे नाव गिनीजमध्ये आहे
2016 मध्ये, बॉडी पॉझिटिव्हिटी कॅम्पेनर हरनाम कौर यांचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं गेलं त्यांच्या दाढीमुळे. दाढी ठेवणाऱ्या त्या जगातील सर्वात तरुण महिला ठरल्या. चेहऱ्यावर केस ठेवल्याबद्दल अनेकदा धाकदपटशाहीचा सामना करतानाचं त्यांनी त्यांचे केस स्वीकारले. आणि हे स्वीकारणं स्वतःवर प्रेम करण्याचा एक महत्त्वाचा भाग असतो असं त्यांनी बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगितलंय.
 
शायजासाठी, मिशा ठेवणं म्हणजे नुसतंच बोलण्यासारखं नाहीये. तर ती प्रत्यक्षात काय आहे याचा एक भाग आहे.
 
शायजा म्हणते, "मला जे आवडतं तेच मी करते. जर मला दोनदा आयुष्य मिळालं असतं तर कदाचित एक आयुष्य मी इतरांसाठी जगले असते."
 
शायजाला बरीच वर्षं आरोग्याच्या तक्रारी होत्या. यातून लढता लढता तिचा स्वभाव चिवट बनला. यात मागच्या दहा वर्षात तिच्यावर सहा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. एक तिच्या स्तनातील गाठ काढण्यासाठी, दुसरी तिच्या अंडाशयातील सिस्ट काढण्यासाठी होती. पाच वर्षांपूर्वी तिच्यावर हिस्टरेक्टॉमी ही शेवटची शस्त्रक्रिया झाली.
 
ती म्हणते, "प्रत्येक वेळी मी जेव्हा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर यायचे तेव्हा पुन्हा मला शस्त्रक्रियेसाठी जावं लागणार नाही अशी आशा लागून राहायची."
 
आरोग्याशी निगडित अनेक संकटांवर मात केल्यामुळेच शायजाच्या मनात दृढ विश्वास निर्माण झालाय. त्यामुळे तिला ज्यात आनंद वाटतो त्याच पद्धतीने तिने तिचं आयुष्य जगलं पाहिजे असं तिला वाटतं.
 
शायजा सांगते की ती जसजशी वयात येऊ लागली तसा तिचा स्वभाव लाजाळू बनला. तिच्या गावातल्या स्त्रिया संध्याकाळी 6 नंतर घराबाहेर क्वचितच दिसायच्या.
 
केरळ हे भारतातील सर्वांत प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे. तिथला विकास निर्देशांक उच्च असला तरी तिथल्या बहुतेक भागात पितृसत्ताक पद्धत कायम आहे. महिलांनी एकट्याने प्रवास करणे, एकट राहणे शक्यतो टाळलं जातं.
 
जेव्हा ती लग्न करून शेजारच्या तामिळनाडू राज्यात गेली तेव्हा तिला नव्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं.
 
'माझ्या मुलीलाही आवडते माझी मिशी'
 
"माझे पती कामावरून रात्री उशिरा परतायचे. त्यामुळे मी संध्याकाळी घराबाहेर बसायचे, काहीवेळा मला काही हवं असल्यास मी रात्री एकटीच दुकानात जायचे. कोणाला काहीही फरक पडायचा नाही. जसजसं मी माझं माझं काम करायला लागले तसतसा माझा आत्मविश्वास वाढत गेला." माझ्या मुलीमध्येही असाच आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून मी प्रयत्न करत असल्याचं ती सांगते.
 
शायजाचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी तिच्या मिशी ठेवण्याला पाठिंबा देतात. तिची मुलगी तिला बऱ्याचदा सांगत असते की मिशी तिच्यावर चांगली दिसते.
 
पण शायजा सांगते की रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडून मात्र तिला बऱ्याच कमेंट्स ऐकाव्या लागतात.
 
ती सांगते, "लोक माझी चेष्टा करतात की पुरुषांना मिशा असतात, स्त्रियांना असतात का?"
 
पण गेल्या काही वर्षांत बऱ्याच स्थानिक माध्यमांनी तिच्यावर बातम्या केल्या आहेत. कधीकधी ती या बातम्या तिच्या फेसबुकवर शेअर करते तेव्हा काही लोक तिच्यावर उपहासात्मक कमेंट करतात.
 
एका व्यक्ती तिच्या शेअर केलेल्या बातम्यांवर कमेंट करताना म्हणतो की, ती तिच्या भुवया कोरते तर तेच ती तिच्या मिशांवर ब्लेड का मारत नाही.
 
यावर शायजा विचारते की, "पण मला काय आवडतं ? काय ठेवायचं आहे? याबद्दल कोणी विचारत नाही."
 
शायजाच्या मैत्रिणी बऱ्याचदा फेसबुकवर आलेल्या या कमेंट्सवर रागाने व्यक्त होतात. पण शायजाला मात्र या गोष्टींचा अजिबात त्रास होत नाही.
 
"खरं तर कधी कधी मला या गोष्टी वाचून हसायला येतं."