शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : सोमवार, 20 मार्च 2023 (14:38 IST)

श्री काळाराम मंदिर धार्मिक , ऐतिहासिक दृष्ट्या महत्व काय आहे ?

नाशिकमधील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात चैत्र पाडव्याला वासंतिक नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असतो. या मंदिराला पूर्ण देशात फार महत्व आहे, त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत, त्याचे सर्व महत्व वाचा पूर्ण रिपोर्ट ..
 
श्री काळाराम संस्थानच्या  वासंतिक नवरात्रोत्सव महोत्सवास बुधवार (ता.२२) पासून प्रारंभ होत आहे. (Kalaram Sansthan Vasantik Navratri festival from 22 march)
 
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या हस्ते सायंकाळी साडेपाच वाजता महोत्सवाचे उद्‌घाटन होणार असून, स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवळकर प्रमुख पाहुण्या असतील. ३ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
पंचवटीतील श्री काळाराम देवस्थानतर्फे दरवर्षी वासंतिक नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. महोत्सव काळात २६ मार्चला तुलसी अर्चन, २७ मार्चला तुलसी अर्चन, २८ मार्चला सप्तमी महाप्रसाद, ३० मार्चला श्रीराम जन्मोत्सव व अन्नकोट, शुक्रवारी (ता. ३१) कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
श्रीराम याग, शनिवारी (ता. १) गीतापठण, रविवारी (ता. २) दुपारी चार वाजता श्रीराम व गरुड रथोत्सव यात्रा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (ता.३) सायंकाळी सात वाजता गोपालकाल्याने महोत्सवाची सांगता होईल.मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.
 
तब्बल 12 वर्षे सुरू होतं बांधकाम
सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर पुर्णतः काळ्या पाषाणात बांधलेले आहे. मंदीराच्या बांधकामासाठी 2 हजार कारागिर 12 वर्षे राबत होते. पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांमध्ये याचा समावेश आहे. 245 फुट लांब व 145 फुट रुंद आहे. मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे. मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे.
 
काळया पाषाणातील मूर्ती 
दररोज शेकडो भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसर अतिशय प्रसन्नमय आहे. मंदिरात प्रभू श्रीराम, सिता, लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील 2 फुट उंचीच्या मूर्ती आहेत. चैत्र महिन्यात इथे रामनवमीचा उत्सव असतो.
 
14 हजार राक्षसांचा केला होता वध 
श्रीरामांनी पंचवटीत शुर्पनखाचे नाक,कान कापल्यानंतर 14 हजार राक्षस या ठिकाणी श्रीरामांवर हल्ला करण्यासाठी आले असता. त्यावेळी प्रभू श्रीरामांनी  छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा केलीआणि सर्व 14 हजार राक्षसांचा वध केल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्याप्रसंगी अत्यंत विराट आणि भव्य कालस्वरूप रूप  प्रभू  श्रीरामांनी धारण केलं होतं. कालस्वरूप म्हणून श्री काळाराम नाव प्रसिद्ध झाले. त्यामुळे पुढे जाऊन श्री काळाराम मंदिर स्थापन झाले.
 
मंदिरातील आरतीची वेळ 
सकाळी 5 वाजता मंदिर भक्तांसाठी खुलं होतंय. 5:30 वाजता काकड आरती होते. त्यानंतर 11 वाजता मध्यानं पूजा होते. पुन्हा संध्याकाळी 7 वाजता आरती होते. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं असते.
 
श्रीरामाची आरती 
 
त्रिभुवनमंडितमाळ गळां।
आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा॥
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥
ठकाराचे ठाण वारीं धनुष्यबाण।
मारुती सन्मुख उभा कर जोडून॥
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥
भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती।
स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती॥
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥
रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी।
आरती ओवाळूं चौदां भुवनांच्या कोटी॥
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥
विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें।
आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें॥
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥
 
कुठे आहे मंदिर ?
श्री काळाराम मंदिर हे पंचवटी मध्ये आहे. नाशिक शहरातील मुख्य बसस्थानकापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. खाजगी किंवा सरकारी बसने अथवा वाहनाने तुम्ही तिथपर्यंत पोहचू शकता.
 
श्रीक्षेत्र नाशिकला प्रत्येक युगात निरनिराळी नावे पडली. कृतसत्य युगात भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टी रचण्याकरीता पद्मासन घालून तप केले. त्यामुळे पद्मनगर नाव पडले. त्रैतायुगात , काट्याप्रमाणे विध्वंसक असणाऱ्या खर-दुषण आणि त्रिशिर या राक्षसांचा संचार असल्यामुळे ' त्रिकंटक ' नाव पडले. द्वापार युगांत जनक राजाने अनेक यज्ञ यागादि कर्मे करून वास्तव्य केले म्हणून जनस्थान , प्रभु रामचंद्र व लक्ष्मणाने रावण भगिनी शूर्पणखा हिचे नासिका छेदन केले म्हणून कलीयुगात नाशिक म्हटले जाऊ लागले. या भूमीत मोठ्या प्रमाणावर गुलाब पिकत असल्यामुळे (आजही होतात) औरंगजेबाच्या काळात नाव पडलं होतं ' गुलशनाबाद '. औरंगजेबाच्या काळातच नाशिकमधल्या अनेक मंदिरांचा विध्वंस झाला. पुढे पेशवाई आल्यानंतर पेशव्यांच्या लहान-मोठ्या सरदारांनी १७०७ ते १७९२ या काळात कुंभमेळ्याचे प्रमुख स्थान असलेल्या नाशिकचा कायाकल्प हाती घेतला. अहिल्याबाई होळकरांनी गोदावरीचा घाट , सरदार नारोशंकर राजेबहाद्दरांचे नारोशंकर शिवमंदिर , नीळकंठेश्वर , कपालेश्वर , सुंदरनारायण अशी अनेक मंदिरे नाशिकमध्ये उभी राहिली. या सर्व मंदिरांचा मुकुटमणी हेमाडपंती स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे काळाराम मंदिर. पेशव्यांचे सरदार असलेल्या रंगराव ओढेकर यांनी १७७२ ते १७९२ काळात हे मंदिर बांधून रामचरणी अर्पण केले. प्रभुरामचंद्र त्यांच्या वनवास कालखंडात १४ वर्षांतील सव्वादोन वर्षं ज्या ठिकाणी वास्तव्यास होते , त्याच पर्णकुटीच्या जागी हे मंदिर सुवर्णशिखरासह मोठ्या डौलाने उभे आहे.
 
पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण अशा चारही दिशांनी मंदिरात प्रवेश
मंदिराची रचना अद्भुत असून पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण अशा चारही दिशांनी मंदिरात प्रवेश करता येतो. पूर्व दाराने आत आल्यानंतर मोठे भव्य प्रांगण व आतील भागात ओवऱ्यांना (हा शब्दही अलीकडे ऐकायला मिळत नाही) ८४ महिरपी असून ८४ लक्ष योनींचे प्रतीक म्हणून त्यांची रचना केलेली आहे. सभामंडपाच्या एका टोकाला असलेल्या हनुमान मंदिराला ४० स्तंभाचा आधार आहे. हनुमान चालिसा म्हणून ४० स्तंभ आहेत , असे म्हणतात. परंतु , वेदामध्ये ४० अक्षरांचा विराटछन्द , १० अक्षराच्या चार ओळी (१० x ४=४०) असेही एक गणित आहे. मुख्य मंदिरात येण्यासाठी १४ पायऱ्या चढाव्या लागतात. १४ पायऱ्या प्रभुरामचंद्राच्या १४ वर्षांच्या वनवासाचे प्रतीक म्हणून. शिवाय विद्येचे स्थानही चौदावे सांगितले आहे. तीन शिखरे असलेल्या द्वारातून आत प्रवेश केल्यानंतर , उपगर्भगृह अर्थात जिथून भाविक दर्शन घेतात ती मेघडंबरी आठ स्तंभांवर उभी आहे. या मेघडंबरीची आतून एक हजार पाकळ्या असलेल्या उलट्या कमळाची रचना कोरलेली आहे. ही सहस्त्राधार रचना म्हणजे अधोमुख श्रीयंत्र. प्रभुराम अयोध्येत ' श्री ' सोडून आले होते
 
 हे त्यातून मंदिरांच्या रचनाकारांना सांगायचे आहे.
मंदिराच्या मध्यभागी गर्भगृहात राम , लक्ष्मण , सीता माता
मंदिराच्या मध्यभागी गर्भगृहात राम , लक्ष्मण , सीता माता यांच्या मूर्ती विद्यमान आहेत. त्यातील प्रभुरामचंद्र उजवा हात छातीवर आणि डावा हात पायाकडे करून अभयमुद्रेमध्ये उभे आहेत. मंदिरात त्रिकाळ अर्चन होते , प्रातः साडेपाच वाजता काकड आरती , दुपारी बारा वाजता माध्यन्य पूजा आणि सायंकाळी आठ वाजता शेजआरती. गेल्या २७ पिढ्यांपासून त्रिवर्ग पुजारी घराण्याने अव्याहतपणे प्रभुरामाची ही सेवा अखंडित ठेवली आहे. मंदिरात गुढीपाडवा ते चैत्र फाल्गुन महोत्सव , चार नवरात्री , २४ एकादशी , महापर्व धुमधडाक्यात साजरी केली जातात. गुढीपाडवा रामनवमी-रथयात्रा (चैत्र कामदा एकादशी) आणि वासंतिक नवरात्रोत्सवास महाराष्ट्रात एक प्रमुख सांस्कृतिक महोत्सव म्हणून मान्यता आहे. दसऱ्याच्या दिवशी या मंदिरातील प्रभुराम चांदीच्या पालखीतून सीमोल्लंघनाला जातात. गाव वेशीवर शस्त्रपूजन होऊन पुन्हा वाजतगाजत रात्री नऊपर्यंत परत येतात.
 
२४ लाख रुपये खर्चून झाल्याची नोंद
मंदिराचे बांधकाम १७७२ ते १७९२ या कालखंडात २४ लाख रुपये खर्चून झाल्याची नोंद पेशवे दप्तरी आहे. सरकार ओढेकरांची सर्व संपत्ती मंदिर बांधण्याच्या कामी खर्च झाली. परंतु मंदिराच्या सुवर्ण कलशांचे काम अपूर्ण होते. त्यामुळे सरदार ओढेकरांनी त्यांच्या पत्नीचे अलंकार मोडून सुवर्ण शिखराचे काम पूर्ण केल्याची आख्यायिका आहे. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेली नाशिक नगरी शातकर्णेच्या काळात एक महान नगरी म्हणून ओळखली जाई. या नगरीत सरदार , मांडलिक , मानकरी यांच्या घरापेक्षा राजमंदिर उंचीवर होते व राजमंदिरापेक्षा देवमंदिर उच्च होते. याचा अर्थ असा की , राजा कितीही मोठा असला तरी तो देवापुढे छोटा होय. या श्रद्धेतून नाशिकमधील काळाराम मंदिरालाही अनन्य स्थान प्राप्त झाले. नाशिकजवळच्या टाकळी येथे समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य होते. ते गोदावरीत स्नान करत आणि काळारामाच्या दर्शनाला येत. त्याकाळी हे मंदिर लाकडी होते. मात्र , मूर्ती आज आहेत त्याच होत्या. अनेक श्लोक , करूणाष्टके , आरत्या यांच्या रचना समर्थांनी याच काळारामाच्या पुढ्यात केल्या आहेत.
 
काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही क्रांतिकारक घटना
 
काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही क्रांतिकारक घटना होती. यातून जातीव्यवस्थेच्या बुरुजाला सुरुंग लावण्याचे काम झाले. काळाराम मंदिर सत्याग्रह करण्याआधी 'बहिष्कृत भारत'मध्ये बाबासाहेबांनी झणझणीत अग्रलेख लिहिला. त्यात त्यांनी स्पष्ट नमूद केले होते की, 'काळाराम मंदिरासाठी सत्याग्रह करणं अपरिहार्य झाले आहे. आपण लवकरच मंदिर प्रवेशाची चळवळ हाती घेणार. जोपर्यंत हिंदू म्हणून या समाजाचे आहोत तोपर्यंत मंदिर प्रवेश हा आमचा अधिकार आहे व तो आम्ही बजावूनच दम घेऊ'. २ मार्च १९३० ला बाबासाहेबांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाची सगळी जबाबदारी दादासाहेब गायकवाड यांच्याकडे होती. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून नाशिकच्या दिशेने लोक आले. ट्रकभरून लोक रोज नाशकात उतरू लागले. दोन मार्चपर्यंत आठ हजार आंदोलक सत्याग्रहात सामील होण्यासाठी दाखल झाले. बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली २ मार्चला सकाळी १० वाजता एक टोलेजंग सभा भरविण्यात आली. सत्याग्रह कसा चालू ठेवायचा, कोण नेतृत्व करणार, पहिली आघाडी कोणाची असेल किती लोकांचे गट असावे अन् सगळ्यात महत्त्वाचे हे की हा सत्याग्रह अहिंसेच्या मार्गाने करायचा अशा सगळ्यांना सूचना देण्यात आली. परत तीन वाजता सभा भरली. तोपर्यंत नाशकात आणखी सात-आठ हजार आंदोलक येऊन थडकले. तीन वाजता १५ हजार लोकांची मिरवणूक निघाली. मिरवणूक गोदावरीच्या घाटाकडे वळली. एक जंगी सभा घेऊन मिरवणूक विसर्जित करण्यात आली.
 
बाबासाहेबांच्या आदेशाने ३ तारखेला सत्याग्रहाची सुरुवात झाली. सत्याग्रहांच्या चार तुकड्या पाडण्यात आल्या. प्रत्येक तुकडीत दीडशे सत्याग्रही होते. या तुकड्या मंदिराच्या चारी दरवाजावर सकाळपासून ठाण मांडून बसल्या. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार खंदे सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. बाबासाहेब अन् भाऊ राव हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन् रामाचे दर्शन घेणार, असे ठरले. यावेळी गडबड उडू नये म्हणून आयुक्त घोषाळ नाशिकला आले. त्यांनी आधी बाबासाहेबांचे मत जाणून घेतले.
 
बाबासाहेब म्हणाले, 'मी माझ्या लोकांना हक्क मिळवून देण्यासाठी लढा उभारला आहे, वाजवी तडजोड होत असल्यास आम्ही सत्याग्रह तहकूब करायला तयार आहोत.' सत्याग्रहाची सत्य परिस्थिती जाणून घेतल्यावर तत्कालीन आयुक्त घोषाळांनी हॉटसन साहेबांस एक पत्र लिहिले होते. त्यात नमूद केले आहे की, मी आताच नाशिकहून परतलो. मला आधी वाटत होते त्यापेक्षा हे प्रकरण खूपच गंभीर आहे. देवळाला सरळ सरळ वेढा घालण्यात आला आहे. सकाळी मला तेथे आंबेडकर भेटले. अनेकजण तेथे गीत गात होते. अधून मधून उंच आवाजात युद्ध घोषणा देत होते. तेथे स्त्रीयाही होत्या. खाकी पोषाख केलेले व हातात काठ्या घेतलेले लोक पहारा देत आहेत. सत्याग्रह्यांचा वेष खादी व डोक्यावर गांधीटोप्या होत्या. त्या त्यांना नुकत्याच देण्यात आल्या होत्या. दर पाच दहा मिनिटांनी सत्याग्रह्यांनी भरलेल्या लॉऱ्या नाशकात येत होत्या. सत्याग्रहात अडथळा आणणारा कुठलाही हुकूम पाळला जाणार नाही, असे आंबेडकरानी सांगितले आहे. गार्डन, रेनाल्डस (पोलिस अधीक्षक) व मी सकाळी जेव्हा तेथे गेलो तेव्हा धरणे धरून बसलेल्यांपैकी कोणीच उठून उभे राहिले नाही. त्यापैकी बरेचजण खेड्यातून आलेले वतनदार आहेत. मी त्यांच्याशी बोलत असतानासुद्धा ते उठून उभे राहिले नाहित. परंतु, आंबेडकर येताक्षणीच ते उठून आनंदाने उड्या मारू लागले. त्यांना सलाम करू लागले. 'गांधीजी की जय' अशा घोषणा दिल्या. नाशिक परिसरातील सत्याग्रहींवर तेथील संवर्णानी बहिष्कार घातलेला आहे. अशा परिस्थीतीत उत्तेजण देणे म्हणजे त्यांची खरी सेवा करण्यासारखे नाही. या चळवळीचे स्वरुप धार्मिक असण्यापेक्षा, सामाजिक व राजकीय आहे.
 
बाबासाहेबांना झाल्या जखमा
९ एप्रिल १९३० रामनवमी. रथयात्रा निघणार होती सत्याग्रही अधिक आक्रमक होत चालले. पोलिसानी दंगल वगैरे होऊ नये म्हणून बंदोबस्त वाढविला. एकंदरीत तणाव वाढताना बघून दोन्ही कडच्या नेत्यांनी मिळून एक तात्पुरती तडजोड काढली. रथ ठेवण्याच्या जागेपासून पूर्वेच्या श्रीराम मंदिरापर्यंत रथ 'यांनी' आणायचा. तिथुन पुढे विमान सर्वस्वी सत्याग्रहींनी न्यावे अन् रथ मात्र दोघांनी मिळून ओढावा पण तसे झाले नाही. ऐन वेळी धोका झाला. वेळेच्या आधीच रथ बाहेर घाईघाईने ओढण्यास सुरुवात केली. सत्याग्रहींना चुकवून रथयात्रा काढण्याचे नियोजन होते. चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला. यावरून मिरवणूक बाजूला राहिली व मारामारी, दगडफेक झाली. तोवर बाबासाहेब प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले. दगडांचा वर्षाव चालू होता. इतक्यात पोलिसांचा कडा फोडून 'भास्कर कद्रे' नावाचा भीमसैनिक मंदिरात घुसला अन् रक्ताने माखून बेशुद्ध पडला. उपस्थित सर्व सत्याग्रह्यांना व स्वत: बाबासाहेबांनाही लहान-सहान इजा झाल्या होत्या. अशा प्रकारे हा सत्याग्रह १९३५ पर्यंत चालला.


Edited By - Ratnadeep ranshoor