रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 13 मार्च 2024 (10:13 IST)

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघः एकेकाळी दिग्गजांनी गाजवलेल्या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष

election
1967 सालापासून मुंबईमधल्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकांनी आपलं वेगळेपण दाखवून दिलं आहे. एकीकडे पूर्व उपनगरांमधील मध्यमवर्गीय आणि निम्नमध्यमवर्गीय जनता आणि शिवाजीनगर मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या अतिशय गरिब मतदार अशी या मतदारसंघाची रचना आहे. मात्र या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असते. अनेक पक्षातील दिग्गज नेत्यांनी या मतदरासंघात निवडणूक लढवली आहे, अनेक मोठ्या नेत्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
 
मतदारसंघाची रचना
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दक्षिणेस शिवाजीनगर म्हणजे मानखुर्द शिवाजीनगर हा भाग नंतर घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडुप हे भाग येतात. या मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येत असून मानखुर्द शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम, भांडूप पश्चिम, विक्रोळी, मुलुंड हे मतदारसंघ येतात.
 
ढोबळ विचार करता या सर्व मतदारसंघांवर शिवसेना-भाजपा युतीचे प्राबल्य असल्याचं दिसून येतं. याला अपवाद फक्त मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचा. तेथे समाजवादी पार्टीचे अबू आजमी प्रतिनिधित्व करतात.
2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पूर्व येथे भाजपाचे पराग शहा, घाटकोपर पश्चिम येथे भाजपाचे राम कदम, भांडुप पश्चिम येथे सेनेचे रमेश कोरगावकर, विक्रोळी येथे शिवसेना उबाठाचे सुनिल राऊत, मुलुंड येथे भाजपाचे मिहिर कोटेचा विजयी झाले. यावरुन या मतदारसंघातील मतदारांचा एकूण कल दिसून येतो.
 
आजवरचा राजकीय इतिहास
इथल्या विधानसभा मतदारसंघांत शिवसेना-भाजपा युतीचं प्राबल्य दिसत असलं तसेच सलग दोन लोकसभा निवडणुकांत मतदारांनी भाजपाच्या पारड्यात वजन टाकलं असलं तरी आजवर अनेक पक्षांना इथून लोकसभेत जाण्याची संधी मिळाली आहे.
 
1967 साली काँग्रेसने सनदी अधिकारी स. गो बर्वे यांना या मतदारसंघातून पहिल्यांदा संधी दिली ते विजयीही झाले मात्र विजयानंतर अगदीच अल्पकाळात बर्वे यांचं निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत बर्वे यांच्या भगिनी तारा सप्रे काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत गेल्या.
 
1971 साली काँग्रेसचेच राजाराम गोपाळ कुलकर्णी लोकसभेत निवडून गेले. मात्र 1975 साली लागलेल्या आणीबाणीने सर्वच चित्र पालटून गेले. त्यानंतर 1977 साली आलेल्या जनता पक्षाच्या लाटेत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी सुब्रमण्यम स्वामी यांना मिळाली. त्यांनी कुलकर्णी यांचा पराभव करुन लोकसभेत प्रवेश केला होता.
 
1980 साली ही संधी स्वामी यांना परत एकदा मिळाली. त्यामुळे स्वामी हे या मतदारसंघात सलग दोनवेळा जिंकणारे पहिले आणि एकमेव खासदार ठरले. त्यानंतर या मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी गुरुदास कामत आणि किरिट सोमय्या यांना मिळाली मात्र त्यांना सलग दोनवेळा प्रतिनिधित्व करता आले नाही.
 
1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या काँग्रेसलाटेमध्ये या मतदारसंघातही परिवर्तन झाले. या निवडणुकीत ईशान्य मुंबईच्या लोकांनी काँग्रेसच्या गुरुदास कामत यांना निवडून दिले. मात्र 1989 पर्यंत हा जोम टिकला नाही. 1989 च्या निवडणुकीत भाजपाच्या जुन्या फळीतल्या कार्यकर्त्या, महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून काम केलेल्या तसे ऑपेरा हाऊस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेल्या जयवंतीबेन मेहता विजयी झाल्या.
 
1991 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत गुरुदास कामत पुन्हा एकदा विजयी झाले. तर 1996 साली भाजपाचे प्रमोद महाजन या मतदारसंघात विजयी झाले. प्रमोद महाजन यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत लोकसभेत निवडून जाण्याची एकदाच संधी मिळाली, ती याच मतदारसंघातून मिळाली.
 
परंतु अटलबिहारी वाजपेयी यांचं 13 दिवसांचं सरकार मग एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांची अल्पकाळ चाललेली सरकारं कोसळल्यावर 1998 साली झालेल्या निवडणुकीत गुरुदास कामत यांनी प्रमोद महाजन यांना पराभूत केले. पुढच्याच वर्षी 1999 साली देशभरात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दिशेने मतदारांचा कौल असताना या मतदारसंघातही परिवर्तन झाले आणि भाजपाच्या किरिट सोमय्यांनी कामत यांना सुमारे 7 हजार मतांनी पराभूत केले. 5 वर्षांनी गुरुदास कामत 2004 साली पुन्हा एकदा खासदार झाले.
 
2009 साली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दिना पाटील यांच्याकडे आला, त्यांनी 2014 पर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2014 साली भाजपाचे किरिट सोमय्या पुन्हा एकदा ईशान्य मुंबईतून विजयी झाले.
 
2019 साली काय झालं होतं?
2019 साली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यातर्फे किरिट सोमय्या यांना पुन्हा एकदा या मतदारसंघात संधी मिळेल अशी स्थिती होती. मात्र किरिट सोमय्या यांनी अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेतील व्यवहारांवर बोट ठेवल्यामुळे तसेच शिवसेनेसंदर्भातील अनेक प्रकरणांवर जाहीर वक्तव्यं केल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये या मतदारसंघाबाबतीत कटूता आली होती. त्यामुळेच शिवसेनेच्या आग्रहामुळे भाजपाने या मतदारसंघात सोमय्या यांच्याऐवजी मनोज कोटक यांना संधी दिली. मनोज कोटक यांनी मोठ्या फरकाने संजय दिना पाटील यांनी पराभूत केले.
 
किरिट सोमय्या आणि शिवसेना
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गैरव्यवहार बाहेर काढणारे किरीट सोमय्या यांचं शिवसेनेशी वितुष्ट सुरू झालं ते 2014 नंतर 2017 साली किरीट सोमय्या यांनी 'बांद्रा का माफिया' असा शब्दप्रयोग केला होता. ही थेट उद्धव ठाकरेंवर केलेली टीका मानलं गेलं आणि तेव्हापासून शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यात चांगलाच बेबनाव झाला.
 
महापालिकेचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून किरीट सोमय्यांनी एक ना अनेक घोटाळे, गैरव्यवहार, कामकाजातल्या अनियमितता आणि लोकांचे प्रश्न रेटले. परिणामी शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत भाजपने पूर्वीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. शिवाय, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आर्थिक अपहार खणून काढण्यातही किरिट सोमय्या यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. मात्र, तरीही त्यांना विश्वासार्हता कमावता आली नाही.
 
पुढे काय?
शहरीकरणाचा वाढता भार, प्रदुषण तसेच झोपडपट्ट्यांमधील सुविधांची स्थिती अशा अनेक प्रश्नांना या मतदारसंघाला तोंड द्यावे लागत आहे. ठाण्याच्या दिशेने आणि नवी मुंबईच्या दिशेने येणारे मुख्य रस्ते मुंबईत सर्वप्रथम या मतदारसंघात येतात. मुंबईच्या दिशेने येणारे स्थलांतर, वाढती लोकसंख्या याचाही सामना या मतदारसंघाला करावा लागतो, त्यादृष्टीने आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुविधांवर येणारा ताण या मुख्य समस्या मतदारसंघात आहेत.
 
2024 साठी कोणते घटक महत्त्वाचे ठरणार?
2024 साली होत असलेली लोकसभा निवडणूक राज्यातलं सगळं राजकीय चित्र बदलल्यानंतरची होणारी पहिली मोठी निवडणूक आहे. गेल्या लोकसभेत शिवसेना भाजपा यांची युती होती आता शिवसेनेतला मोठा गट शिंदे गटाच्या रुपाने भाजपाबरोबर आहे तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसपक्षही मदतीला आहे. विरोधकांची क्षीण झालेली ताकद पाहाता मोठ्या महाविकास आघाडीला विजयी होण्यासाठी या मतदारसंघात मोठ्या चमत्काराचीच अपेक्षा करावी लागेल.
 
तर भाजपाला अंतर्गत दुही तसेच शिंदे गट- अजित पवार गट यांच्या समन्वय राखून काम करावे लागेल. तरच या मतदारसंघात युतीला सलग तिसऱ्यांदा यश मिळू शकेल.
 
Published By- Priya Dixit