गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 6 एप्रिल 2024 (09:39 IST)

मुंबईतून निवडणूक लढविणार का? अभिनेता गोविंदाने उमेदवारीबाबत स्पष्टच सांगितलं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात आठवड्याभरापूर्वीच प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आज, शुक्रवारी 5 एप्रिलला गोविंदा रामटेकमधील शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी निघाले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसंच, आपण निवडणूक लढवणार की नाही, याबाबतही भूमिका स्पष्ट केली.  
 
यावेळी गोविंदा म्हणाले की, मी रामटेकमधील उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी जात आहे. देवाकडे आणि आईदेवीकडे प्रार्थना आहे की, आमचा उमेदवार जिंकावा. सगळं शेवटी तुमच्या कर्तृत्वावरच अवलंबून असतं. त्यामुळे रामटेकचा प्रचार करून आमचे उमेदवार राजू पारवेंना निवडून आणू आणि आमच्या नावाचा जगात डंका असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
दरम्यान रामटेकच्या सभेला जात असताना नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना, गोविंदा यांना पत्रकारांनी विचारलं की,तुम्ही शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता मुंबईतून तुम्हाला उमेदवारी मिळणार का? यावर गोविंदा यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटलं की, लढणार की नाही माहीत नाही, परंतु मी तरी तिकीट मागितलेलं नाही. मला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मी पुन्हा एकदा नवी सुरूवात केली आहे. आतापर्यंत मी ज्या गोष्टीसाठी प्रण केला ते मला मिळालंच आहे, म्हणून आताही आमचा उमेदवार जिंकेल, अशी आशा गोविंदा यांनी व्यक्त केली.

Edited by -Ratnadeep Ranshoor