शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By नई दुनिया|

किरीट सोमय्यांना अडथळा शिशिर शिंदेंचा

NDND
उत्तर पूर्व मुंबईमधून भाजपचे किरीट सोमय्या व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार संजय दिना पाटील यांच्यात लढत रंगणार आहे. याच मतदारसंघातून दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम इच्छुक होती. पण, पक्षश्रेष्ठींनी सोमय्यांना पसंती दिल्याने पूनम यांना माघार घ्यावी लागली.

पूनम यांचा अडथळा दूर केला असला तरी किरीट सोमय्यांची डोकेदुखी संपलेली नाही. मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे त्यांना राष्ट्रवादीच्या संजय पाटलांशी कडवी टक्कर घ्यावी लागणार आहे. या मतदारसंघात मानखुर्द, शिवाजी नगर, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर (पश्चिम), विक्रोळी, भांडूप व मुलूंड हे भाग येतात. संजय पाटील भांडूपचे विद्यमान आमदार आहेत. मुलुंड, भांडूपमध्ये लोडशेडींग, मुलुंड व कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंड समस्या, देवनार डंपिंग ग्राऊंडचे प्रदुषण, इस्टर्न एक्सप्रेस व एलबीएस मार्गाचा विस्तार, पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गाचे अर्धवट राहिलेले काम हे येथील मुद्दे आहेत.

सोमय्या व पाटील यांच्या मार्गात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिशिर शिंदेंचा मोठा अडथळा आहे. याशिवाय बहूजन समाज पक्षाचे अशोक सिंह हे सुद्धा उमेदवार आहेत. शिशिर शिंदे आक्रमक आमदार आहेत. मराठी मते ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वळवतील असा अंदाज आहे. त्याचा तोटा सोमय्या व पाटील दोघांनाही होऊ शकतो. अशोक सिंह यांना दलित मते मिळू शकतात. त्याचा तोटा पाटील यांना प्रामुख्याने होईल. सोमय्यांना गुजराती मते मोठ्या प्रमाणात मिळू शकतात.