शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , सोमवार, 30 मार्च 2009 (18:55 IST)

पवारांना वक्तव्य महागात पडण्याची शक्यता

मोजूनमापून बोलण्यात माहिर असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी रंगशारदा सभागृहात मुस्लिम समुदायाला चुचकारण्यासाठी केलेले वक्तव्य त्यांना महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपने या विधानांवर तीव्र आक्षेप नोंदवला असून निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करण्यात येणार आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटाचे अतिरेकी पकडल्यानंतर देशात कुठेही बॉम्बस्फोट झाले नाहीत, असे विधान करून पवारांनी मुस्लिम समुदायाला आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला. देशात बॉम्बस्फोटांची मालिका झाली तेव्हाच आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. मशिदींमध्ये कधीही मुस्लिम तरुण बॉम्बस्फोटासारखे कृत्य करणार नाहीत. मुंबई पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने मालेगाव स्फोटाची कसून चौकशी केली व हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधितांना अटक केली. मालेगावबरोबरच परभणी, नांदेड, अजमेरमधील बॉम्बस्फोटामागे हीच मंडळी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. बॉम्बस्फोट करणाऱ्यांना पकडण्यात आल्यानंतर त्यांच्यावर फुले उधळली जातात यावरून जातीयवाद्यांचे मनसुबे स्पष्ट होतात, असे सांगत पवारांनी शिवसेना व भाजपवर हल्ला चढविला होता.

भाजपच्या नेत्यांनी या विधानांवर आक्षेप नोंदवला असून मुस्लिमांच्या तुष्टीकरणासाठी पवारांनी हे जातीयवादी वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. वास्तविक मालेगाव बॉम्बस्फोटानंतर देशात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. मुंबईत एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाला. आसाममध्ये बॉम्बस्फोटांची मालिका झाली, या घटना पवारांना आठवत नाहीत, काय असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितिन गडकरी यांनी केला आहे.