समाजवादाच्या गोष्टी करणा-या समाजवादी पक्षाच्या नेत्यांकडे ज्यावेळी अवाढव्य संपत्ती दिसते तेव्हा हेच खरोखरीचे 'समाजवादी' का? असा प्रश्न सामान्य मतदाराला पडणे साहजिकच आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी आज उ.मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अबू यांनी यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सुमारे 122 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
अबू आजमी यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे बँकेत 1 लाख रुपये रोख, 12.5 लाख रुपयांचे दागिने, द.मुंबईत 12 कोटींचा बंगला, खंडाळ्यात 75 लाखाचा बंगला, तर कुलाब्यातही 2 कोटींचा बंगला आहे. अबू यांच्याकडे तीन आलीशान गाड्या असून त्यात मर्सिडीज, होंडा आणि फियाट या गाडीचा समावेश आहे.
अबू आजमी यांच्या या आकडेवारीनंतर ते आजवरचे लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.