अगं आई गं. मनेका-मायावतींची जुंपली
'
आईचं दुःख कळून घ्यायला आईच व्हावं लागतं.' आणि 'आईचं दुःख समजून घ्यायला आई व्हायची काही गरज नाही' हे दोन एखाद्या सुमार मराठी कौटुंबिक चित्रपटातले 'कुबलछाप' डॉयलॉग वाटत असले तरी ते उच्चारणार्या अनुक्रमे मनेका गांधी व मायावती या दोन राजकारणी स्त्रिया आहेत. वरूण गांधी यांना भेटण्याची परवानगी मनेका गांधी यांना नाकरण्यात आल्यानंतर मनेकांनी मायावतींवर 'एक आईच दुसर्या आईचं दुःख समजू शकते. मायावतींना तो अनुभव नाही, अशा शब्दात टीका केली होती. त्याला मायावतींनी, आईचं दुःख समजून घेण्यासाठी आई होणं गरजेचं नाही, असं उत्तर दिलंय. मायावती म्हणाल्या, मनेका गांधींना केवळ आपल्या मुलाच्या दुःखाची काळजी आहे, मला तर पूर्ण देशातल्या लोकांची काळजी आहे. आईचं दुःख समजून घेण्यासाठी आई होण्याची गरज नाही. मदर टेरेसा याही आई झालेल्या नव्हत्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मनेका यांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार करायला हवे होते. तसे झाले असते तर आज वरूण तुरूंगात दिसला नसता, असा टोला लगावत, कायदे तोडणार्यांना क्षमा नाही. भलेही तो गांधी कुटुंबातला का असेना अशा शब्दांत मायावतींनी मनेका गांधी यांना फटकारले. मनेका गांधी यांचे विधान लाजीरवाणे आहे. त्यांनी आपली व देशाची माफी मागितली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, मायावतींच्या खुलाशाला मनेका यांनी पुन्हा टीकेनेच उत्तर दिले असून मायावती या जर स्वतःला मदर तेरेसा म्हणवत असतील तर त्या ही गोष्ट विसरताहेत की मदर तेरेसा यांनी कधीही हप्ता वसुली केली नाही किंवा त्यांनी कधी कुणाकडून ती करवूनही घेतली नाही.