कॉंग्रेस सव्वाशे वर्षांची म्हातारी- मोदी
भाजपचे तेजतर्रार नेते व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभर प्रचार दौर्यात कॉंग्रेसवर जोरदार टीका करण्याचा धडाका लावला आहे. कॉंग्रेस म्हातारी झाली असून तिला जेवढ्या लवकर निरोप देता येईल, तेवढा द्यायला हवा, असे आवाहन त्यांनी येथे केले. ते म्हणाले, की कॉंग्रेसचे वय आता १२५ वर्षांचे झाले आहे. या वयात हा पक्ष कोणाचेही भले करू शकणार नाही. हा पक्ष ना कोणत्या राज्यात बदल घडवू शकेल किंवा कोणत्याही समस्येचा सामना करू शकेल. देशाला तरूण सरकार पाहिजे आहे. भाजप केवळ २९ वर्षाचा तरूण पक्ष आहे. भाजपमध्येच महागाई व दहशतवाद निपटून काढण्याची क्षमता आहे. कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात तीन रूपये किलोने गहू देण्याचे आश्वासन दिले आहे, पण गुजरात सरकार गेल्या सात वर्षांपासून दोन रूपये किलोने गहू देते आहे, याकडे लक्ष वेधत त्यांनी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याची खिल्ली उडवली. दरम्यान, या मुद्यावर कॉंग्रेसने तातडीने मोदींना उत्तर दिले असून भाजपची विचारधारा म्हातारी असून देशाला मागे घेऊन जाणारी आहे, असे पक्षाचे प्रवक्ते अश्विनीकुमार यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसची तुलना सव्वाशे वर्षाच्या म्हातारीशी करण्याबद्दल भांबवलेले मोदी आपल्यावरील संस्कारानुसारच टीका करत आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.