रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वेबदुनिया|

कॉंग्रेसने कापला कदमांचा 'पतंग'?

- किरण जोशी

सांगली मतदारसंघातील उमेदवार कॉंग्रेसने अजूनही जाहीर केलेला नसला तरी विद्यमान खासदार प्रतीक पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत आहेत. यामुळेच की काय, आपला पुत्र विश्वजीतसाठी प्रयत्नशील असलेले राज्याचे महसूलमंत्री व सांगलीचे पालकमंत्री पतंगराव कदम यांनी या निर्णयावर आगपाखड करून 'दादा' घराण्यावर सडकून टीका केली.

वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचे सांगलीत नेहमीच वर्चस्व राहिले आहे. दादा गेल्यानंतर या घराण्याची ताकद कमी झाली असली तरीही सत्तापदे याच घराण्याकडे होती. पण आता त्यांच्या या वर्चस्वाला उघड आव्हान मिळत आहे. या निवडणुकीत वसंतदादांचा नातू व विद्यमान खासदार प्रतीक पाटील याला उमेदवारी न मिळता ती पुत्र विश्वजीतला मिळावी यासाठी पतंगराव प्रयत्नशील होते. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना यश आलेले दिसत नाही. यासंदर्भात त्यांनी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटही मागितली होती. मात्र, त्यांना ती नाकारल्याचे कळते.

या सगळ्याचा राग त्यांनी आज सांगलीत पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला. कॉंग्रेस 'दादा' घराण्याला प्राधान्य देत असल्याबद्दल त्यांनी आखपाखड केली. 'दादांचे' घराणे आपल्यावर गद्दार असल्याचा आरोप करते, मात्र, हेच घराणे गद्दार आहे. यांच्यापैकी कोणताही सदस्य निवडणुकीला उभा राहिला की त्याला आमच्या भिलवडी वांगी मतदारसंघातून आघाडी देण्याचे काम आम्ही आजपर्यंत इमाने इतबारे पार पाडले. पण निवडून आल्यानंतर त्याचे चीज केले नाही. विद्यमान खासदार प्रतीक पाटील यांच्याविषयीही नाराजी आहे, असेही पतंगराव म्हणाले.

दादा घराण्यातील सदस्यांमुळेच वसंतदादा बॅंक बुडीत खात्यात गेली. सांगली महापालिकेवरील सत्ताही त्यांनी गमावली. दोन-चार कॉंग्रेसचे सदस्य निवडून आले ते माझ्यामुळे हे सांगताना आपल्यावर राज्याची जबाबदारी असल्याने आता प्रतीक यांच्या प्रचारासाठी सांगलीत फिरकणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केले.