राहूल गांधीं कोट्यधीश नि कर्जदारही
कॉंग्रेसचे सरचिटणीस राहूल गांधी दोन कोटी ३३ लाखाचे धनी आहेत, पण त्यांच्यावर एचडीएफसी बॅंकेचे २३ लाखांचे कर्जही आहे. त्यांच्याकडे वाहन मात्र नाही. श्री. गांधी यांनी आज अमेठीतून उमेदवारी अर्ज भरला, त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली. नवी दिल्लीतील साकेतमध्ये असलेल्या एका मॉलमध्ये राहूल यांची दोन दुकाने आहेत. त्यातील एकाची किंमत एक कोटी ८ लाख तर दुसर्याची ५५ लाख ८० हजार आहे. शेअर्समध्ये त्यांनी पैसे गुंतवलेले नाहीत. आयुर्विमा व राष्ट्रीय बचत पत्रात त्यांनी १० लाख २९ हजार रूपये गुंतवले आहेत. ७० हजार रूपये त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या तीन बॅंक खात्यात मिळून १० लाख ९२ हजार रूपये जमा आहेत. राहूल यांचा महरोली येथे फार्म हाऊस आहे. त्याची किंमत दहा कोटी आहे. याशिवाय हरियाणा येथील फरीदाबादमध्ये सहा एकर शेती आहे. त्याची किंमत २८ लाख २२ हजार आहे. त्यांच्याकडे ३३३ ग्रॅमचे दागिने आहेत. त्याची किंमत दीड लाख रूपये आहे.