शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By भाषा|

समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?

आझम खान यांच्याशी असलेल्या मतभेदांची जाहिर वाच्यता करून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास पक्ष सोडून जाऊ अशी धमकी समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह यांनी काल पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, रात्री तातडीने त्यांनी या विधानाचा खुलासा करून घुमजाव केले. पण त्यांच्या या विधानाने समाजवादी पक्षातील मतभेद मात्र समोर आले आहेत.

मी हे जग सोडून जाईन, पण पक्ष सोडणार नाही, असे भावनात्मक विधान करून त्यांनी पक्षाशी कटिबद्धता दर्शविण्याचा प्रयत्न केला. आझम खान सातत्याने अमरसिंह यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे वैतागलेल्या अमरसिंहांनी पक्षात 'एक तर मी राहिन किंवा खान' अशी भाषा केली होती.

अमरसिंहांची 'मैत्रिण' असलेल्या अभिनेत्री जयाप्रदा यांना रामपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. रामपूर हे आझम खान यांचे गाव. त्यांनी जयाप्रदांबद्दल नाराजी व्यक्त करून त्यांच्याविरोधात प्रचार सुरू केला आहे. जयाप्रदा येथूनच गेल्यावेळी निवडून आल्या होत्या. मात्र, आझम खान यांना आता त्यांना विरोध आहे. याच मुद्यावरून त्यांचे अमरसिंहांशी वाजले.

'मी कुठे उभा आहे, याची मला कल्पना आहे. माझी सहनशक्ती ज्यावेळी संपेल, त्यावेळी मी मुलायमजी आणि पक्षाला रामराम ठोकेन', असे विधान अमरसिंहांनी काल केले होते. मात्र, या विधानाचे परिणाम जाणवायला लागल्यानंतर, माझे विधान संदर्भ सोडून दाखविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ' आपल्यात काहीही मतभेद नाहीत. सगळे काही ठीक आहे, अशी सारवासारव त्यांनी केली. 'मुलायमसिंह हेच माझे नेते आहेत, त्यामुळे पक्षात फूट पडण्याची शक्यताच नाही, असे सिंग म्हणाले.