रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह कोटेशन
Written By वेबदुनिया|

प्रेमा तुझा रंग कसा

आपल्या प्रेमाच्या आड आर्थिक तफावत, सामाजिक तफावत येणार नाही, या खात्रीने आपल्या प्रेमाचा शेवट विवाहबंधनात करायचा, असं त्या दोघांनीही तिच्या घरच्यांच्या अपरोक्ष ठरवलं. मित्र-मैत्रिणींच्या मदतीने नोंदणी विवाह करून दोघंही मोकळे झाले. संध्याकाळी तो तिला घेऊन स्वत:च्या घरी, तिच्या ‘सासरी’ गेला. तिने तिच्या आईला फोन करून लग्नाची बातमी दिली. दुस-या दिवसापासून रीतसर ‘संसार’ सुरू झाला. त्याची आई चार घरची धुणीभांडी करून दमून यायची. त्यामुळे सुनेने सारे घरकाम करावे, अशी अपेक्षा होती. सार्वजनिक संडास, त्यासाठी रांगा लावणे, घराच्या दारातच धुणी-भांडी करणे या सा-याची तिला सवय नव्हती. सगळे मिळून एकाच खोलीत झोपत असल्याने ‘गुलाबी’ स्वप्नेदेखील हवेतच विरून गेली. आठच दिवसांत ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ते तिच्या लक्षात आले.

लग्नाअगोदर ही सासरची सारी परिस्थिती माहीत असूनदेखील तिला वास्तवाची जाणीव नसल्याने तिने चुकीचा निर्णय घेतला होता, जो निभावणं तिला अशक्य होतं. आईवडिलांचं घर तर सुटलेलं. या घरात तर निभावणं शक्य नाही, अशा अवस्थेत ती माहेरी परत गेले तरी तो ‘धोका’ दिल्याबद्दल तिला दोष देणार होता. अतिशय दु:खी मनाने शेवटी ती आठ-दहा दिवसातचं उलट्या पावली स्वत:च्या घरी परत आली. अर्थात तिथे आईवडिलांकडून तिची नव्याने निर्भर्त्सना झाली; पण हे सर्व खालमानेने ऐकून घेण्याशिवाय तिच्यापुढे पर्यायही नव्हता.

‘द शो मस्ट गो ऑन’प्रमाणे आयुष्य पुढे जातच राहिलं. दोघंही एकमेकांना कॉलेजच्या आवारात दिसत; पण एकमेकांकडे पाहणेही टाळत. कॉलेजची वर्षे संपली. नोक-या लागल्या. दोघांच्याही घरी त्यांच्या लग्नाचे विचार पुन्हा सुरू झाले. मध्यस्थीने एकमेकांशी परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायचा ठरलं. त्यांचा विवाह न्यायालयाच्या हुकुमाने संपुष्टात येणार होता.

घटनांचा थोडाफार फरक असलेली अशी अनेक उदाहरणे. प्रेमाच्या अवास्तव कल्पना, वास्तव आयुष्यातील खडतर अडचणींची जाणीव नसणे, वडिलकीचा सल्ला न मिळणे, विवाहपूर्व समुपदेशनाचा अभाव यामुळे अतिशय कोवळ्या वयात घटस्फोटित असल्याचा शिक्का बसतो. प्रेम म्हणजे नेमके काय हेही माहीत नसलेल्या वयात प्रेमाचा आणि लग्नाचा निर्णय घेताना एक ‘थ्रिल’ वाटते; पण त्याची फार मोठी किंमत दोघांनाही मोजावी लागते. घटस्फोट किंवा लग्न रद्द करणे हे दोनच पर्याय शिल्लक राहतात.