गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: मुंबई (रुपेश दळवी) , गुरूवार, 26 नोव्हेंबर 2015 (10:22 IST)

नांदूरमधमेश्वर अभयारण्यात निसर्गप्रेमी पर्यटकांची गर्दी

गजबजलेल्या शहरापासून दूर पिकनिक स्पॉट म्हणजे निसर्गरम्य ठिकाणाची टुर हे तरुणाईचे जणू गणितच झाले आहे. नाशिकमधल्या भागात असाच एक आकर्षणाचा निसर्गरम्य स्पॉट प्रसिद्ध होवू लागला आहे, तो म्हणजे मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य. वाईल्ड फोटोग्राफीचा छंद असलेल्या पक्षीमित्र 'प्रवीण दौंड' ह्यांनी ह्या अभयारण्याची माहिती व मार्गदर्शन करणारी www.nandurmadhmeshwar.com वेबसाईट तयार केली व ह्या वेबसाईटमुळे निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी अभयारण्य सफर सोपी झाली आहे. सौंदर्य निर्मितीच्या 'आदिल शेख' ह्यांच्या सोबत प्रवीण दौंड ह्यांनी ह्या निसर्ग पर्यटन-सफरीत मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडणारा एंड्राइड मोबाइल एप आणि अभयारण्याचा माहितीपट तयार केला असून पर्यटकांसाठी तो लवकरच उपलब्ध होणार आहे. 
 
हिवाळा आला कि पक्षी-निसर्ग प्रेमींना चाहूल लागते ती पक्षी निरीक्षणाची आणि पक्षी निरीक्षणासाठी हे पक्षीप्रेमी महाराष्ट्राच्या विविध पक्षी अभयारण्यांना भेटी देतात. महाराष्ट्राच्या प्रमुख अभयारण्यांपैकी एक नांदुर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य असेच एक. महाराष्ट्राचे पक्षीतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या अभयारण्याचा परिसर फ्लेमिंगो, डक, स्पूनबिल, कॉमन क्रेन यांसारख्या देशी-विदेशी रंगीबेरंगी रंगीबिरंगी पक्ष्यांच्या वास्तव्याने गजबजला आहे. भारतातील दुसरे भरतपूर म्हणून ज्येष्ठ पक्षीप्रेमी सलीम अली यांनी कौतुक केलेल्या या अभयारण्याला भेट देण्यासाठी देशभरातील पक्षीमित्रांचीही रीघ लागली आहे. पर्यटकांच्या निवासाची उत्तम व्यवस्था हे अभयारण्याचे आकर्षण ठरू पाहत आहे. निफाड तालुक्‍यातील खानगावथडी येथे गोदावरी व कादवा नदीच्या संगमावर १९९१ ला बंधाऱ्याची दगडी भिंत बांधकाम पूर्ण झाले आणि त्यामुळे या ठिकाणी नदीच्या प्रवाहातील गाळ साचल्याने उंचवटे तयार झाले व हा परिसर पक्ष्यांच्या निवासासाठी तयार झाला. परिणामी हे ठिकाण पक्षीतीर्थ म्हणून नावलौकिकास आले. दरवर्षी परदेशातुन व विविध राज्यांतुन २४२ प्रकारचे पक्षी या अभयारण्यात येतात. काही पक्षी ५०,००० किलोमीटरहुन अधिक लांबचा प्रवास करून येथे येतात. पक्षांप्रमाणेच येथे इतर काही प्राणी आढ़ळुन येतात. ह्यात हरिण, बिबट्या , कोल्हे, रानडुक्कर, ससे ई. प्राण्यांचा समावेश होतो..
 
चित्तवेधक हालचाली, आवाज आणि रंगसंगतीने लक्ष वेधून घेणारे हे विविध आकाराचे पक्षी, पक्ष्यांच्या विविध रंगसंगती, सूर्यादय, सूर्यास्ताचे सुंदर देखावे, प्राचीन मंदीरे, पौराणिक कथांचे पूरावे, धरण, निसर्ग निर्वेचन केंद्र, पाठबंधारे विभागाचा सुंदर बंगला, मळे  अश्या अनेक गोष्टींचे येथे आकर्षण आहे. मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य येथील पक्ष्यांची अनोखी शाळा पहायची असेल तर एकदा तरी महाराष्ट्राचं भरतपूर असलेल्या ह्या निसर्ग-टुर स्पॉटला नक्कीच भेट द्यावी लागेल. अश्या निसर्गरम्य मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य ला वेबसाईट च्या माध्यमातून भेट दिल्यास निसर्ग पदभ्रमंती करणाऱ्या पर्यटकांना अभयारण्याची व्याप्ती सहज जाणून घेता येईल, अशी आशा आहे.