महाराष्ट्रात दुष्काळासाठी 1207 कोटींची मदत
दिवसेंदिवस महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती भीषण होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारला दुष्काळासाठी मदत म्हणून 1207 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सांगितले. मात्र, राज्य सरकारकडून केंद्राकडे 2200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे या मदतीवर राज्य सरकार नाखूष असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्यातच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील अनेक गावे ओस पडली असून, येथील नागरिक रोजगारासाठी शहरांकडे धाव घेत आहेत. जनावरांना पाणी, चारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडे अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा भीषण परिस्थितीत राज्य सरकारने केंद्राकडे मदतीची अपेक्षा केली होती. सरकारच्या या मागणीला केंद्राकडून प्रतिसाद देण्यात आला आहे.