मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

उद्धवा, अजब तुझा कारभार !

शिवसेनेला गेल्या वीस वर्षांत जे अपयश पहावे लागले नाही ते उद्धव ठाकरे यांच्या काळात पहावे लागले आहे. विधानसभेच्या दोन निवडणुका लढवूनही उद्धव पक्षाला सत्तेपर्यंत नेऊ शकले नाही. उलट राज ठाकरे यांच्या मनसेने साडेतीन वर्षांतच विधानसभेत प्रवेश करून स्वबळावर तेरा जागा कमावल्या आहेत. राज यांच्या यशाच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांचे अपयश ठळकपणे उघड झाले आहे. त्यामुळे आगामी काळ शिवसेनेच्या दृष्टीने आणि त्याचे नेतृत्व करणार्‍या उद्धव यांची कसोटी पहाणारा ठरणार यात काही शंका नाही.

बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे पक्षाची धुरा सोपवली तेव्हाच आक्रमक पक्षाचा मवाळ चेहरा असे त्यांचे वर्णन केले जात होते. त्यांच्याशी मतभेद असल्यानेच एकेक नेते शिवसेना सोडून बाहेर पडले. सर्वांत मोठा धक्का नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी दिला. राज यांनी तर स्वतंत्र पक्ष स्थापून आणि शिवसेनेचेच एकेकाळचे मुद्दे आणि स्ट्रॅटेजी स्वीकारत आपल्याच एकेकाळच्या मातृपक्षाला शह द्यायचे धोरण स्वीकारले. शिवसेनेतून हरवलेला आक्रमकपणा आणि रस्त्यावर उतरण्याची तयारी त्यांनी मनसेत आणली आणि तेरा जागांचे घवघवीत यश पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मिळवले आहे.

त्या तुलनेत उद्धव यांचे अपयशच प्रकर्षाने दिसून येते आहे. राणे बाहेर पडल्यानंतर त्यांचे समर्थक आमदार त्यांनी निवडून आणले. त्यांचा विजयरथ उद्धव यांनी श्रीवर्धनच्या पोटनिवडणुकीत शेकापच्या मदतीने जेमतेम रोखला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई महापालिका जिंकली, पण त्यासाठी शेवटचे अस्त्र बाहेर काढले होते, ते बाळासाहेबांच्या आवाहनाच्या माध्यमातून. पण या विधानसभा निवडणुकीत तर पक्षाची गेल्या वीस वर्षातील नीचांकी घसरण झाली आहे. याचा अर्थ स्वबळावर सत्ता आणणे उद्धव यांना कधीच जमलेले नाही. आताच्या निवडणुकीतही तेच अधोरेखित झाले आहे. यावेळी तर शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपही सेनेच्या पछाडत पुढे गेला आहे.

आता उद्धव यांच्या नेतृत्वाकडे साशंकतेने बघत असलेली काठावरची, कुंपणावरची मंडळी उघडपणे राजकडे गेली तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळेच येणारा काळ शिवसेनेचा खरा वारसदार कोण? राज की उद्धव हे ठरविणारा आहे हे नक्की.