मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|
Last Modified: औरंगाबाद - , शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2009 (12:33 IST)

औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसची सरशी

मनसेने खाते उघडले

औरगाबाद जिल्ह्यात काँगेसने तीन जागा जिंकून बाजी मारली आहे. सेनेला दोन जागा मिळाल्या आहेत तर दोन जागांवर बंडखोर उमेदवार विजयी झाले आहेत. मनसेने कन्नडची जागा जिंकून खाते उघडले असून राष्ट्रवादी काँग्रेसला पैठणची जागा मिळाली आहे.

औरंगाबाद शहरातील तीन जागांपैकी एका जागेवर शिवसेनेचा तर एका जागेवर शिवसेना बंडखोराचा विजय झाला आहे. औरंगबाद पूर्वमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे. औरगांबाद पश्चिम राखीव मतदारसंघात शिवसेनेचे संजय पांडुरंग शिरसाट यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे चंद्रभान पारखे यांचा १४ हजारांवर मतांनी पराभव केला. संजय शिरसाट यांना ५७ हजार ९२२ मते मिळाली तर पारखे यांना ४३ हजार ७९५ मते मिळाली. गृहनिर्माण राज्यमंत्री प्रीतमकुमार शेगावकर यांचे चिरंजीव प्रशांत शेगावकर हे या मतदारसंघात रिपाईचे उमेदवार होते ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आणि त्यांची अनामत रक्कम जप्त झाली.

औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेने माजी महापौर विकास जैन यांना उमेदवारी दिली होती. या निर्णयाच्या विरोधात बंडखोरी करून शिवसेनेचे माजी खासदार व जिल्हा प्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी निवडणूक लढविली. प्रदीप जैस्वाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना यांचा आठ हजार मतांनी पराभव केला. प्रदीप जैस्वाल यांना ४९ हजार ९६५ मते मिळाली तर कदीर मौलाना यांना ४१ हजार ५८१ मते मिळघली. विकास जैन यांना अवघी ३३ हजार ९८८ मते मिळाली.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा हे विजयी झाले. त्यांना ४८ हजार १९७ मते मिळाली तर त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी भाजपचे डॉ. भागवत कराड यांना ३२ हजार ९६५ मते मिळाली. येथे बंडखोर सुभाष झांबड यांना १७ हजार २७६ मते मिळाली.

फुलंब्री मतदारसंघात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री हरिभाऊ बागडे पराभूत झाले. काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी त्यांचा दोन हजार सहाशे मतांनी पराभव केला. डॉ. कल्याण काळे यांना ६३ हजार २१४ तर हरिभाऊ बागडे यांना ६० हजार ६२३ मते मिळाली. या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुहास शिरसाठ यांना १५ हजार ७०२ मते मिळाली.

गेली अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला असणार्‍या पैठण मतदारसंघात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला. शिवसेनेतून पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले संजय वाघचौरे यांनी विमान आ. संदीपान भुमरे यांचा तेथे पराभव केला. संजय वाघचौरे यांना ६४ हजार १०८ तर संदीपान भुमरे यांना ५० हजार ३११ मते मिळाली. येथील मनसेचे उमेदवार सुनील शिंदे यांना २२ हजार १०५ मते मिळाली.

गंगापूर मतदारसंघात अनपेक्षितरित्या भाजपचे बंडखोर उमेदवार आणि जिल्हा परिषदेतील माजी सभापती प्रशांत बंब यांचा विजय झाला. त्यांनी शिवसेनेचे अण्णासाहेब माने यांचा तब्बल २४ हजार मतांनी पराभव केला. प्रशांत बंब यांना ५३ हजार मते मिळाली तर माने यांना २९ हजार ३११ मते मिळाली. येथील कृष्णा पाटील डोणगावकर यांना २३ हजार मते मिळाली. वैजापूर मतदारसंघ मात्र आपल्याकडेच राखण्यात शिवसेनेला यश आले. येथे शिवसेनेचे आर. एम. वाणी यांनी काँग्रेसचे दिनेश परदेशी यांचा पाच हजार मतांनी पराभव केला.

सिल्लोड मतदारसंघ काँग्रेसने भाजपकडून हिसकावून घेतला गेले तीनवेळा भाजपकडे असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी भाजपचे सुरेश बनकर यांचा दणदणीत पराभव केला. अब्दुल सत्तार यांना ८७ हजार ८६२ मते मिळाली तर भाजपचे सुरेश बनकर यांना ६१ हजार ३८७ मते मिळाली.

कन्नड मतदारसंघात अत्यंत चुरशीचा सामना झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार व रायभान जाधव यांचे चिरंजीव हर्षवर्धन जाधव यांनी त्यात बाजी मारली. हर्षवर्धन जाधव आणि शिवसेनेचे बंडखोर उदयसिंह राजपूत यांच्या शेवटपर्यंत चुरस होती. हर्षवर्धन जाधव यांनी उदयसिंह राजपूत यांचा पराभव केला. सेनेचे नामदेव पवार व काँग्रेसचे भारतसिंह राजपूत हे तिसर्‍या, चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. मनसेचा पहिला आमदार असा विक्रम मात्र यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या नावावर नोंदविला गेला आहे.