बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By

चित्रा वाघ यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी

सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडल्यानंतर आता चित्रा वाघ यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडले आहे. 
 
चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षापदाचा आणि पक्षाचाही राजीनामा दिला आहे. वाघ यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली. "मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे," असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
 
चित्रा वाघ शुक्रवारी दिवसभर राष्ट्रवादीच्या कार्यालयात होत्या. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या पण संध्याकाळी कार्यालयातून गेल्यानंतर त्यांनी ट्विटरवरून राजीनाम्याची घोषणा केली.
 
चित्रा वाघांच्या दोनच दिवस आधी सचिन अहिर यांनी घड्याळ सोडून हाती शिवबंधन बांधले होते. सचिन अहिर वा संजय दिना पाटील यांच्यासारख्या निवडून येणा-या लोकप्रतिनिधींच्या जोरावरच मुंबईत 'राष्ट्रवादी'चं स्थानं होतं. सचिन अहिर यांना त्यामुळेच मंत्रिपदही देण्यात आलं होतं. त्यामुळे अहिर मुंबई प्रदेशाध्यक्ष असतांना शिवसेनेत जाणं हा 'राष्ट्रवादी'ला मोठा धक्का आहे.
 
अहिरांपाठोपाठ पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असलेल्या 'राष्ट्रवादी'मधल्या इतरही बड्या नावांची चर्चा लगेचच सुरु झाली आहे. त्यातलं महत्वाचं म्हणजे छगन भुजबळ यांचं. छगन भुजबळ येत्या आठवड्याभरात शिवसेनेमध्ये जातील अशा आशयाच्या बातम्या सर्वत्र फिरताहेत.
 
भुजबळांनी त्यांची राजकीय कारकीर्द बाळासाहेब ठाकरेंसोबत सुरू केली असली तरी सेना सोडल्यावर त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा महत्वाचा टप्पा शरद पवारांसोबत पार पडला आहे.
 
लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच राष्ट्रवादीच्या अनेक मोठ्या आणि शरद पवारांसोबत जवळचे संबंध असलेल्या नेत्यांनी त्यांची साथ सोडण्यास सुरुवात झाली होती. माढ्याच्या उमेदवारीवरून विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे निवडणुकीआधी 'भाजपा'त सामील झाले.
 
पक्षातून बाहेर पडणा-या नेत्यांची संख्या का वाढते आहे याबद्दल जेव्हा 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'चे प्रवक्ते नवाब मलिक यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले, "ज्यांना आत्मविश्वास नाही असे नेते कायम 'आयाराम-गयाराम'ची भूमिका घेतात. त्यांच्यासोबत कार्यकर्ते जातात असं होत नाही. जे गेले त्यांच्या जागी नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळते. नेते वा आमदार पक्ष सोडून गेल्यावर पक्ष संपतो असं कधीही होत नाही."