मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (17:46 IST)

मनोज जरांगे हे समाजाला फसवत आहेत, एकेकाळच्या सहकाऱ्याचा आरोप

मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करावा आणि सगेसोयऱ्यांच्या व्याख्येची अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा केली आहे.
 
तर दुसरीकडे मराठा आंदोलनात जरांगेंसोबत असलेले त्यांचे जुने सहकारी कीर्तनकार अजय महाराज बारसकर यांनी 'जरांगे हे मराठा समाजाला फसवत आहेत, त्यांनी आतापर्यंत केलेल्या गुप्त बैठकींचा तपशील द्यावा,' असे आरोप पत्रकार परिषद घेत केले.
 
मराठा समाजाला स्वतंत्रपणे 10 टक्के आरक्षण देणारा कायदा विधिमंडळाच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात एकमताने मंजूर करण्यात आला.
 
राज्य मागासवर्ग आयोगाने 16 फेब्रुवारीला दिलेल्या अहवालातील शिफारसी स्वीकारत सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले.
 
मात्र, हे आरक्षण मान्य नसल्याचं म्हणत मनोज जरांगेंनी 24 फेब्रुवारीपासून ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
 
महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, त्यासाठी कुणबी नोंदी शोधाव्यात. ते होत नसेल तर मराठा आणि कुणबी एकच आहेत असा एका ओळीचा अध्यादेश काढावा.
 
सगेसोयऱ्यांची सगोसोयऱ्यांची व्याख्या आम्ही सरकारला दिली आहे, त्यानुसार आम्हाला अंमलबजावणी व्हावी, अशा मागण्या मनोज जरांगेंनी आज (21 फेब्रुवारी) केल्या.
 
अंतरवलीसह महाराष्ट्रातल्या सर्व आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या, ही मागणीसुद्धा जरांगेंनी केली.
 
‘जरांगेंनी गुप्त बैठका केल्या, ते पारदर्शक नाहीत’
मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देत असतानाच त्यांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या कीर्तनकार अजय महाराज बारसकर यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
 
जरांगे हे पारदर्शक आहेत. कोणताही मंत्री येऊ दे किंवा आमदार येऊ दे, ते जुमानत नाहीत. म्हणूनच मी असेल किंवा मनोज जरांगेंवर मराठा समाजाने विश्वास ठेवला होता. त्यांना स्वीकारलं होतं. पण जरांगे केवळ आपला कसा फायदा होईल, आपण कसे पुढे जाऊ हेच पाहतात, असा आरोप अजय महाराजांनी केला.
 
“मनोज जरांगेंनी 23 डिसेंबरला पहिली गुप्त बैठक ‘कन्हैय्या’ हॉटेलमध्ये घेतली. त्या मीटिंगचा मी प्रतिनिधी आहे. जरांगे आत एक बोलले, बाहेर कॅमेऱ्यासमोर दुसरं बोलले."
 
"त्यानंतर मुंबईला जायला मोर्चा निघाला, आम्ही ड्राफ्ट घेऊन निघालो. सरकारचे प्रतिनिधी होते. आमदार बच्चू कडू उपस्थित होते, त्यांनी सगळा ड्राफ्ट वाचून दाखवला. तोच ड्राफ्ट वाशीला कानामात्रा न बदलता वाचून दाखवला. पुन्हा म्हटलं की, आम्ही आता गुप्त बैठक करणार नाही. पण मी साक्षीला आहे. रांजणगावला एका बंगल्यावर पहाटे चार ते सहा, एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यासोबत मीटिंग केली. त्या अधिकाऱ्याने ही मीटिंग रेकॉर्ड केली आहे. पुन्हा त्याच अधिकाऱ्यासोबत गाडीत मीटिंग झाली,” असा गौप्यस्फोट अजय महाराजांनी केला.
 
लोणावळ्याची गुप्त मीटिंग तुम्हाला माहितीये. वाशीची पण माहितीये, असंही त्यांनी म्हटलं.
 
जरांगेंची लढाई श्रेयवादासाठी
आझाद मैदानावर जाण्यासाठी निघालेला मोर्चा जेव्हा वाशीत पोहोचला तेव्हा काय झालं, यासंबंधीचे दावेही अजय महाराजांनी केले. त्यांनी त्यावेळेचा घटनाक्रम पत्रकार परिषदेत बोलताना सांगितला.
 
“वाशीला कंटेनरवर उभे होते. स्पीकरचा प्रॉब्लेम झाला. त्यावेळी मी आंदोलक म्हणून सहभागी झालो होतो. त्यांनी म्हटलं होतं की कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय परत फिरायचं नाही. आझाद मैदानात जायचं. आमचे सात-आठ हजार लोक आधी आझाद मैदानात जाऊन पोहोचले.
 
सरकारच्या वतीने आलेले प्रतिनिधी म्हणाले पंधरा मिनिटांत जीआर देतो. पंधरा मिनिटांत शासन निर्णय होतो का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 
बारसकर यांनी पुढे सांगितलं की, “त्यांनी तो सग्यासोयऱ्यांचा जीआर हातात घेतला आणि म्हणाले की, हे सगळं नीट वाचून घेऊन तपशीलवार. पटलं तर हा अधिनियम स्वीकारू, नाहीतर आझाद मैदानात जाऊ. त्यानंतर त्यांनी पुन्हा बंद खोलीत जाऊन चर्चा केली.
 
सामाजिक न्याय विभागाचे जे सचिव आहेत भांगे सर त्यांच्योसोबत बंद खोलीत काय चर्चा केली?”
 
“पहाटे तीन वाजता मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा आले. अध्यादेश त्यांना मान्य झाला. त्यात 16 फेब्रुवारीची तारीख आहे. त्यांनी अंधारातून पुन्हा मागणी केली की, आता गुलाल घ्यायला आझाद मैदानात जातो. त्यांना केवळ दबाव आणायचा होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांवं आणि ग्लासभर पाणी पाजावं, एवढीच त्यांची इच्छा होती. त्यांची सगळी लढाई श्रेयवादासाठी आहे,” बारसकर म्हणाले.
 
'आरक्षण कोण मागतं. गरीब लोक आरक्षण मागतात. जेसीबीतून फुलं उधळणारे थोडीच आरक्षण मागतात, त्यासाठी कोण पैसा देतो?' असा प्रश्नही त्यांनी विचारला.
 
जरांगेंना अध्यादेश, अधिनियम, अधिसूचना कशातलाही फरक कळत नाही, असंही त्यांनी म्हटलं.