गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2016 (12:49 IST)

वर्षातील फक्त पाच तासांसाठी उघडते निरई माता मंदिर

भारतात देवीदेवतांच्या मंदिरांची संख्या लक्षावधींनी असेल. या प्रत्येक देवळामागे काही ना काही इतिहास, कहाणी, रहस्य असतेच. प्रत्येक मंदिराची काही वैशिष्टय़ेही असतात. 
 
छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यातील सोदुल नदीच्या काठी मोहेरा येथील निरई पहाडावरील निरई माता मंदिरही याला अपवाद नाही. याचे वैशिष्टय़ म्हणजे हे मंदिर वर्षात एकदाच व तेही पाच तासांसाठीच खुले केले जाते. हे मंदिर म्हणायचे पण येथे मंदिरही नाही व मूर्तीही नाही. 
 
पहाडात ही एक जागा आहे. तरीही लाखो श्रद्धाळू येथे निरई मातेच्या दर्शनाला येत असतात. मात्र या मंदिरातही महिलांना प्रवेश नाही तसेच देवीचा प्रसादही महिला घेऊ शकत नाहीत. प्रसाद खाल्ला तर काही तरी अघटित घडते असे लोकांचे अनुभव आहेत.
 
या देवीला बळी देण्याची प्रथा आहे. ज्या दिवशी मंदिर खुले होते तेव्हा अक्षरश: हजारो बकर्‍यांचे बळी येथे दिले जातात. हे बळी बोललेला नवस फेडण्यासाठी चढविले जातात असेही समजते. 
 
चैत्री नवरात्राच्या दिवशी हे मंदिर खोलले जाते व तेथे आपोआप ज्योत प्रज्वलित होते व ती नऊ दिवस तेलाविनाच जळते असेही सांगितले जाते. या चमत्कारामुळे तर या देवीवर पंचक्रोशीतील भाविकांची अपार श्रद्धा आहे. 
 
ही ज्योत कशी प्रज्वलित होते हे अद्यापिही न सुटलेले कोडे आहे. येथे लोक दर्शनासाठी येतात व नवस बोलतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असाही समज आहे. या देवीची जत्रा चैत्रात भरते. 200 वर्षापूर्वी जयराम गिरी गोस्वामी यांनी निरई मातेसाठी 6 एकर जमीन दान दिली होती. 
 
तेथे शेती केली जाते व त्यातूनच या मंदिराचा खर्च भागविला जातो. या देवीला कुंकू, गुलाल, शृंगार साहित्य असे काहीही वाहिले जात नाही.