टी-शर्ट, टोप्या, पेनची 'नमो अॅप'वरून विक्री सुरू
लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी बाकी असताना राजकीय पक्षांनी आपापले 'डावपेच' आखायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सोशल मीडियाचा आधार घेत मोदी यांच्या खासगी मोबाइल अॅप्लिकेशन 'नमो अॅप'वरुन एक नवीन मोहीम सुरू केली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. नमो अॅपवरून आता टी-शर्ट, टोप्या, वह्या आणि पेनची विक्री सुरू करण्यात आली आहे. या उत्पादनावर नमो अगेन, नमो नाम, इंडिया मोडिफाईड, यासारखे घोषवाक्य लिहिले आहेत. नमो टी-शर्ट, नमो नोटबुक, स्टिकर, मॅग्नेट आणि मग यांची किंत 99 रुपयांपासून 299 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. मोदी यांचा ऑफिशियल नमो अॅप हा देशभरात खूप प्रसिद्ध आहे. आतापर्यंत जवळपास 5 मिलियन लोकांनी तो डाउनलोड केलेला आहे.
नमो अॅपवरुन सामान खरेदी करणार्या ग्राहकांना ब्रँड क्वालिटी, योग्य भावात उत्पादने मिळावीत हा त्यामागचा हेतू आहे. या उत्पादन विक्रीतून जो पैसा मिळेल तो गंगा स्वच्छतेसाठी वापरला जाईल, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांनी दिली. भाजपच्या या नमो अॅपनंतर काँग्रेसही निवडणुकीच्या तोंडावर यासारखाच एक अॅप लॉन्च करणार असल्याची माहिती आहे.