रविवार, 3 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जून 2022 (11:09 IST)

बिटकॉईन : सर्वांत मोठ्या क्रिप्टोकरन्सीला घरघर लागली, कारण...

bitcoin
सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिटकॉईनला गेल्या 24 तासांत मोठी घरघर लागली आहे.
 
बिटकॉईनचं मूल्य गेल्या 24 तासांत प्रचंड गडगडलं असून यामुळे क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे.
 
तुम्ही जर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करत असाल, तर तुम्हाला लक्षात आलं असेल की, क्रिप्टो बाजारात कशा प्रकारे गोंधळ माजला आहे.
 
नेमकं काय घडलं?
सध्या बिटकॉईनचा दर 21 हजार 974 डॉलर आहे. गेल्या पाच दिवसांत याची किंमत 25 टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या 18 महिन्यांतील बिटकॉईनचं हे सर्वात न्यूनतम मूल्य आहे.
 
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बिटकॉईनची किंमत अक्षरशः गगनाला भिडली होती. त्यावेळी एका बिटकॉईनचे सुमारे 70 हजार डॉलर मिळायचे, हे विशेष.
 
खालील आलेखातून आपल्याला बिटकॉईनच्या किंमतीचा अंदाज येऊ शकेल.
 
असं का घडतंय?
याची अनेक कारणं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. जगभरातील मंदी, महागाई या समस्या वाढत आहेत. जगभरातील शेअर बाजारही गडगडले आहेत. सरासरीपेक्षा 20 टकक्यांनी ते खाली गेल्याचं दिसून येतं.
 
परिणामी, मोठ्या गुंतवणूकदारांकडेही पैशांची चणचण निर्माण झाली आहे. तसंच सामान्य गुंतवणूकदारही गुंतवणूक करण्यात हात आखडता घेताना दिसत आहेत.
 
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणं हे जोखमीचं असल्याचं अजूनही अनेकांना वाटतं.
 
ही गुंतवणूक अस्थिर किंवा अनिश्चिततेची आहे, या धारणेतून बिटकॉईनमधील गुंतवणूक टाळली जाते. शिवाय, सरकारी आर्थिक यंत्रणांच्या अखत्यारित ती येत नसल्याने क्रिप्टोचा अॅक्सेस गमावल्यास तुमचा पैसा गमावण्याचीही भीती असते.
 
आता हे घडण्याचं कारण काय?
गेल्या महिन्यात बिटकॉईनसंदर्भात दोन मोठ्या घसरणी पाहायला मिळाल्या होत्या. यामुळे बाजारात अस्वस्थता निर्माण झाली. याचा परिणाम म्हणून लोकांनी आपल्याकडच्या बिटकॉईन्स विकण्यास सुरुवात केली.
 
बिटकॉईनच्या बाबतीत बोलायचं झालं तर जितके कमी लोक ते विकतात, तितकी त्याची किंमत स्थिर राहते, अथवा वधारते. पण लोकांनी वेगाने याची विक्री सुरू केली तर त्याचा परिणाम त्याच्या किंमतीवर होतो. अशा स्थितीत किंमत वेगाने खाली जाऊ लागते.
 
एफटी मार्केट्सच्या संपादक केटी मार्टिन सांगतात, "इतर चलनांप्रमाणे बिटकॉईनच्या घसरणीवर आळा घालण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे त्याचं नियंत्रण करता येऊ शकत नाही."
 
लोक किती प्रमाणात खरेदी करण्यास तयार आहेत, यावर त्याची किंमत ठरते, असं त्यांनी सांगितलं.
 
त्यामुळे जेव्हा जास्त लोक याची विक्री करू इच्छित असतील, तर समस्या निर्माण होते. सगळेच बिटकॉईनची विक्री करत असल्याने जास्त वेळ थांबून उपयोग नसतो, अशा वेळी नाईलाजाने तुम्हाला बिटकॉईन्स विकावे लागतात, असं केटी म्हणाल्या.
 
नेमकं आताच का?
गेल्या 24 तासांत बिटकॉईनसंदर्भात खालील घडामोडी पाहायला मिळाल्या.
 
1. सर्वात मोठा जागतिक क्रिप्टो एक्सचेंज प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Binance ने बिटकॉईनच्या विक्रीवर बंदी घातली होती. व्यवहारादरम्यान होत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं त्यांनी म्हटलं. पण प्रत्येकाने यावर विश्वास ठेवला नाही.
 
2. क्रिप्टोकरन्सी लेंडर कंपनी सेल्सियसनेही अशाच प्रकारचा निर्णय घेतला होता. पण त्यांनी हे जाहीर करताना बाजारातील विपरीत परिस्थिती असं याचं कारण दिलं होतं. नंतर कॉईनबेस एक्सचेंजने आपल्या 18 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.
 
3. यानंतर अस्वस्थ झालेल्या गुंतवणूकदारांनी अधिक प्रमाणात बिटकॉईन विकण्यास सुरू केलं.
 
स्थितीवर नियंत्रण कधी येईल?
थोडक्यात सांगायचं, तर बिटकॉईनच्या दरातील घसरण थांबवण्यासाठी लोकांनी त्याची विक्री करणं प्रथम थांबावं लागेल. यानंतर इतरांनी त्याची खरेदी सुरू केल्यास त्याचा दर पुन्हा वधारू शकतो. हे यापूर्वीही घडल्याचं दिसून येतं.
 
क्रिप्टो फॅन्स तुम्हाला याबाबत चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. कारण सध्या त्याची किंमत कमी आहे. त्यामुळे आता विकत घ्या, थांबा आणि पाहा. येत्या काळात त्याची किंमत पुन्हा वाढू शकेल.
 
याव्यतिरिक्त अल्पावधीत श्रीमंत बनलेल्या लोकांच्या कहाण्या, हाय प्रोफाईल सेलिब्रिटींकडून ब्रँडींगसुद्धा याला वाचवू शकतं.
 
टेस्ला प्रमुख इलॉन मस्क यांनीही त्यांचं बिटकॉईन प्रेम अनेकवेळा बोलून दाखवलं आहे. त्यांच्या कंपनीने गेल्या वर्षी बिटकॉईनमध्ये 1.5 मिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती.
 
पण गुंतवणूक सल्लागार यंदाच्या वेळी अधिक सावधगिरी बाळगण्याचाही सल्ला देत आहेत. स्ट्रेट स्ट्रीट अॅडव्हायजर्सचे व्यवस्थापकीय संचालक अल्ताफ कासम यांनी बीबीसी रेडिओसोबत बोलताना म्हटलं, "खरं सांगायचं तर या क्षेत्रात कणखर हृदयाच्याच व्यक्तींनी प्रवेश करायला हवा."