शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जून 2020 (21:52 IST)

ट्रायने डीटीएच ग्राहकांच्या सोयीसाठी आणले नवीन अ‍ॅप

डीटीएच ग्राहकांना चॅनेल निवडता यावेत यासाठी आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एक खास अ‍ॅप लाँच केलं आहे. ट्रायने TRAI Channel Selector अ‍ॅप लाँच केलं असून याद्वारे ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनेल्स निवडता येणार आहेत. ट्रायने डीटीएच ग्राहकांच्या सोयीसाठी हे नवीन अ‍ॅप आणलं आहे.
 
या अ‍ॅपद्वारे ग्राहकाला त्याच्या आवडीचे चॅनेल्स निवडता येणार आहेत. तसेच एखादं चॅनेल नको असल्यास ते हटवण्याचा पर्यायही ग्राहकांकडे असेल. याशिवाय प्लॅनमध्ये काही बदल करायचा असल्यास तो पर्यायही यामध्ये आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि iOS दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
 
डाउनलोड केल्यानंतर हे अ‍ॅप सुरू करण्यासाठी सर्व्हिस प्रोवाइडर निवडावा लागतो, त्यानंतर मोबाइल नंबर, सब्सक्राइबर ID किंवा सेट-टॉप-बॉक्स नंबर टाकण्याची आवश्यकता आहे. यानंतर युजरला त्याच्या रजिस्टर्ड नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी टीव्ही स्क्रीनवरही दिसेल. या अ‍ॅपमध्ये सब्सक्राइबरच्या अकाउंटबाबत, एकूण उपलब्ध असलेल्या चॅनेल्सबाबत, सब्सक्राइबरने कोणते चॅनेल्स निवडले आहेत, अकाउंट बॅलेन्स किती आहे अशी सर्व माहिती मिळते. सध्या काही आघाडीचे डीटीएच ऑपरेटर्स या अ‍ॅपसोबत जोडले गेले आहेत. पण ग्राहकांच्या सुविधेसाठी लवकरच अन्य डीटीएच ऑपरेटर्सचाही यामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ट्रायने सांगितलं.