गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (10:36 IST)

कांदा पुन्हा एकदा डोळ्यातून पाणी काढणार ?

गेल्या काही महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता. मात्र देशात वेगेवेगळ्या ठिकाणी झालेल्या पावसामुळे पुन्हा कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कांद्याला मोठी मागणी निर्माण  झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्याचे भाव शंभर रुपये प्रती किलोपर्यत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे आगामी सणांचा काळ आणि हॉटेल व्यवसाय सुरू झाल्याने वाढलेली मागणी वाढली आहे तर पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे कांदा भाव वाढण्याची शक्यता अधिकच आहे. 
 
मंगळवारी लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला कमाल ७८१२ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. समितीच्या मुख्य आवारावर ५३२ वाहनांतून कांदा ६२०० क्विंटल आवक होऊन कांद्याला कमीत कमी १९०१ सरासरी ७१०० तर जास्तीत जास्त ७८१२ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले. कांद्याने वर्षभरापूर्वी मिळालेल्या सात हजार रुपयांचा टप्पा ओलांडला.
 
याआधी सोमवारी देशातील कांद्याचं सर्वात मोठं मार्केट नाशिक जिल्ह्यातील लासलगावला, कांद्याचा भाव प्रति क्विंटल ६ हजार ८०२ रूपये होता. वर्षभरातला हा सर्वाधिक भाव ठरला. मार्केटमधील व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, हा भाव रिटेल मार्केचला येत्या काही दिवसात १०० रुपये किलोपेक्षा जास्त जावू शकतो. परतीच्या पावसाचा फटका कांद्याला बसल्याने नव्या कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. परिणामी, बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याचे भाव वाढत आहेत. ही दरवाढ आणखी महिनाभर राहील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
 
कांद्याच्या पिकाचं पावसामुळे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये नुकसान झालं आहे. शेतातील कांदा पिकाला मोठं नुकसान यामुळे झालं आहे. यामुळे कांद्याला रास्तभाव मिळतोय. कांदा पावसाने खराब झाल्याने सप्लाय चेनला फटका बसला आहे. कांद्याचे भरमसाठी पिक येण्यास फेब्रुवारी उजाडणार आहे. फेब्रुवारी २०२१ पर्यंत कांद्याचे भाव कमी होण्याचे संकेत नाहीत.