बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (13:03 IST)

अशोक सराफ: 'धनंजय माने आमच्या मनात राहतात'

ashok saraf
पराग फाटक
अशी ही बनवाबनवी या सिनेमाला 33 वर्षं पूर्ण झाली आहेत. 'धनंजय माने इथेच राहतात का?' आणि 'इस्राईलला गेलेला मित्र वारला, त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले सत्तर रुपयेही वारले'. या दोन वाक्यांनी आणि पर्यायाने 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटाने पोट धरून हसवलं.
 
दर शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होतात. चित्रपटातील पात्रांचे कपडे, स्टाइल ट्रेडिंग होऊ लागतात. थोड्या दिवसांनी दुसरं काहीतरी ट्रेंड होऊ लागतं. 32 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट खोगीरभरती ठरला नाही. हा चित्रपट मराठीजनांच्या मनामनात पोहोचला. या चित्रपटातल्या संवादांनी दंतकथा पातळी गाठली.
 
या चित्रपटाचा फॅन आहे, त्यातले डायलॉग पाठ आहेत, केवळ यावरून अनोळखी माणसाची दोस्ती होते. एकप्रकारे वयाची-प्रांताची- धर्म,जातीपातीची बंधनं झुगारून माणसांना एकत्र आणणारी ही कलाकृती आहे.
 
'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट मराठीतला अलौकिक असा मैलाचा दगड वगैरे नाही. फेस्टिव्हलसाठी बनलेला आर्ट सिनेमाही नाही. चित्रपटाच्या पदरी पुरस्कारांच्या चळती वगैरेही नाहीत. पण तो जनतेचा चित्रपट आहे.
 
घर सोडून बाहेर राहणं, खडूस मालक, घरासाठीची ओढाताण, नोकरीतले जुगाड, खविस बॉस ही सर्कस उमेदवारीच्या काळात प्रत्येकजण अनुभवतो. परशा, सुधीर, धनंजय, शंतनू यांच्या जागी आपण स्वत:ला पाहतो.
 
परिस्थिती ओढवल्यामुळे का होईना पण समोरच्याचं नुकसान न करता खोटं बोलण्याची वेळ प्रत्येकावर कधी ना कधी येते. आपल्याप्रमाणे जगणारीही माणसं आहेत, आपण एकटे नाही, हा धीर 'बनवाबनवी' चित्रपट देतो.
 
बत्तीस साल बाद...
 
बत्तीस वर्षांपूर्वीच्या इंटरनेटपूर्व काळातल्या या चित्रपटाच्या संवादांवरून आज 20202मध्ये मीम्स रचले जातात. फेसबुकवर या चित्रपटाचे फॅन पेजेस आहेत.
 
जुने मित्र या चित्रपटाचे डायलॉग एकत्र करून एकमेकांना टॅग करतात. ते पाहून खो-खो हसतात, कमेंट्सचा पाऊस पडतो. या चित्रपटाचं गारूड किती व्यापक आहे याची जाणीव होते. शेकडोवेळा हा चित्रपट पाहणारे रसिक आहेत.
 
नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम अशी मनोरंजनाची वैयक्तिक केंद्रं एन्जॉय करणाऱ्या तरुण पिढीलाही हा चित्रपट आपलासा वाटतो. त्यातला विनोद त्यांना अपील होतो. हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. जिगरी दोस्त खूप महिन्यांनी, वर्षांनी एकत्र जमले की अशी ही बनवाबनवी पाहणं आपोआप होतं. आवडणारे सीन पुन्हापुन्हा पाहिले जातात.
 
असा बनला 'बनवाबनवी'
कामाच्या शोधात पुण्यनगरीत आलेले चार तरुण. पोटाची खळगी भरण्यासाठी आधी डोक्यावर छप्पर लागतं. त्यांच्याकडे तेही धड नाही. नोकरीचा शोध सुरू आहे पण खूप पैसै नाही. नोकरी मिळालेय पण डोक्यावर छप्पर मिळवण्यासाठी या चार मित्रांना नाईलाजाने एक नाटक करावं लागतं. लग्न झाल्याचं नाटक आणि दोन पुरुषच त्यांच्या बायका असल्याचं नाटक. हे या चित्रपटाचं कथानक.
 
चार मित्र आणि त्यांच्या आयुष्याची वाटचाल हा फॉर्म्युला मराठी तसंच हिंदी चित्रपटांमध्ये याआधीही वापरला गेला आहे. पण हा चित्रपट साधेपणाने जिंकून घेतो.
 
शर्टाची तीन बटणं उघडी सोडल्यामुळे छातीवरचं केसांचं जंगल दिसणारा, पोट सुटलेला हिरो आजच्या काळात भावण्याची, पटण्याची शक्यता कमी आहे. सदरा टाइपशर्ट आणि लेंगासदृश पँट घालणारा व्यक्ती हिरो होऊ शकते हे या चित्रपटाने सिद्ध केलंय.
 
वसंत सबनीस यांनी लिहिलेलं संवाद कालातीत आहेत. तो विनोद टोकदार आहे पण विखारी नाही. आजकालच्या काही कॉमेडी म्हणवल्या जाणाऱ्या अनेक चित्रपटांमध्ये खूप सारे अंगविक्षेप करूनही प्रेक्षकाला हसायला येत नाही. पण बनवाबनवी पाहताना आपण खुर्चीतून पडू की काय असं अनेकदा वाटतं.
 
अनेकदा चित्रपटातील माणसं स्वत:वर हसतात. पण त्यांचं हसं होत नाही. निखळ हसणं किती आवश्यक आहे याची हा चित्रपट वारंवार जाणीव करून देतो.
 
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुधीर जोशी, अश्विनी भावे, निवेदता जोशी-सराफ, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर अशी एकापेक्षा एक कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. यासगळ्यांनी मिळून अक्षरक्ष: कल्ला केला आहे. कोण्या एकाची मक्तेदारी न राहता सगळ्यांनी मिळून धमाल उडवून दिली आहे.
 
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हल्ली निर्मात्यांना वेगळा पैसा राखून ठेवावा लागतो. तीस वर्षांपूर्वी प्रमोशनचं फॅड असतं तर 'बनवाबनवी'चं मेकिंग ऑफ हातोहात खपलं असतं.
 
'तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखं.'
दुधाच्या रांगेत खूप वेळ लागणार हे लक्षात आल्यानंतर पोटात कळ येऊन बसकण मारणारा धनंजय माने पाहताक्षणी आपला वाटू लागतो. त्याच्या हातात एक माणूस बाटली देऊन तो माणूस म्हणतो- काही काळजी करू नका. मी रिकामटेकडाच आहे. इतकं खरं वाक्य आपल्या चित्रपटांमध्ये नसतं. अशोक सराफ यांनी 'धनंजय माने' जगलाय.
 
सुधीर जोशींनी रंगवलेला विश्वास सरपोतदार हा इरसाल घरमालक निव्वळ अशक्य आहे. या चित्रपटातली दोघांची जुगलबंदी अनुभवणं हा खूप मोठा स्ट्रेसबस्टर आहे. सरपोतदारांच्या डायबेटिससाठी औषध असल्याचं धनंजय माने सांगतो. तिकडे आपला मित्र जाणार असल्याची लोणकढी थाप मारतो. त्याबळावर पन्नास रुपये मिळवतो.
 
चित्रपटात पुढे धनंजय माने हा इस्राईलचा मित्र वारला असं सांगतो. 'तुमचे पैसे वारले' असं सरपोतदरांना सांगतो तेव्हा आपण हसून लोळण घेतो. मराठी चित्रपटात इस्राईलचा संदर्भ कायच्या काय मजा आणतो. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्राईलच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी डायबेटिसचं ते औषध, वारलेले 70 रुपये यावरून सोशल मीडियात मीम्सना उधाण आलं होतं.
 
धनंजय मानेचा भाऊ एक फोटो दाखवतो. त्या फोटोत तीन मित्र असतात. पण तिघांचेही चेहरे कट झालेले असतात. असं का याचं उत्तर देताना धनंजय माने म्हणतो- फोटो काढताना, फोटोग्राफर शिंकला! विनोदात अशी निरागसता हल्ली अभावानेच आढळते.
 
धनंजय मानेपाठोपाठ त्याचा भाऊ शंतून, परशा आणि सुधीर तिघे पुण्यनगरीत दाखल होतात आणि हास्यमैफलीत आपण दंग होतो.
 
घर एकाला भाड्याने दिलेलं- चार कपबशा दिसल्यावर माने 'मला सकाळी दोन कप चहा लागतो' म्हणून वेळ मारून नेतात. 'तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखं' म्हणून सरपोतदारांना पटतं. आणि त्यानंतर येतो तो ऐतिहासिक डायलॉग. 'धनंजय माने इथेच राहतात का?' मराठीतल्या ऑल टाइम हिट डायलॉगपैकी हा एक आहे. 70 रुपये, इस्राईलमध्ये मिळणारं डायबेटिसचं औषध हा कल्ला मुळातूनच अनुभवावा असा.
 
सरपोतदारांचा बंगला सोडल्यावर लीलाताई काळभोर यांच्या बंगल्यावरचं नाट्य सुरू होतं. त्याआधी माने अप्रोच समजावून देणारं वाक्य बोलतो- 'आपण त्यांचं नुकसान करत नाही, त्यांना लुबाडत नाही'. 'हा माझा बायको पार्वती', हे मानेंचं परशाची बायको म्हणून ओळख करून देतानाचं वाक्य अजरामर ठरलं.
 
धनंजय माने मॅडम बॉसला लिंबू कलरची साडी सुचवतात. मॅडम साडी नेसून येतात त्यावेळी लक्षात आल्यावर लिंबूवरून शब्दच्छली विनोदाचा स्फोट होतो. लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण- मराठी भाषा, त्यातले शब्द, त्याची वळणं किती समृद्ध आहेत याची पदोपदी जाणीव होते. अव्वल कलाकारांना संहितेची साथ असेल तर काय किमया घडू शकते याचं हे चित्रपट वस्तुपाठ आहे.
 
पुरुष मंडळी बायका म्हणून वावरत असल्याने क्षणोक्षणी खोटं आणि गडबडगोंधळाचे प्रसंग घडतात. पण कलाकारी सच्ची असल्याने संवाद मनाला भिडतात. चित्रपटाच्या शेवटी बनवाबनवी उघड होते. परिस्थिती माणसाला अगतिक करते. शहरात येणाऱ्या प्रत्येकावर कधी ना कधी ही परिस्थिती ओढवतेच.
 
पैसा, घराचा आसरा यासाठी कराव्या लागणाऱ्या लढाईतूनही विनोद निर्मिती होऊ शकतो हा विचार बनवाबनवी चित्रपटाने दिला. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळातही हा स्ट्रगल कायम आहे. तो पार करताना अनेकांची तिशी उलटते. मात्र अशी ही बनवाबनवी हा चित्रपट तिशीतही संदर्भांसह चिरतरुण आणि खणखणीत आहे.
 
(ता.क- सदरहू लिखाण पत्रकारीय चौकटीतून सिनेमाचं केलेलं पोस्टमॉर्टेम नाही. ते परीक्षणही नाही. का पाहावा, का पाहू नये, अमुक स्टार, तमुक रेटिंग असली काही भानगड नाही. हॅशटॅगी नोस्टॅलजिया प्रमोशन कॅम्पेनचा हे लिखाण भाग नाही. एका सामान्य चित्रपट रसिकाचं मुक्तचिंतन या भावनेने वाचावं.)