बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: इंदौर , रविवार, 24 सप्टेंबर 2017 (22:48 IST)

भारत बनला वन-डे मध्ये नंबर वन

रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या अर्धशतकीय खेळीच्या मदतीने भारताने ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्‌सने मात करत मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाना दिलेले 294 धावांचे आव्हान 47.5 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत भारताने सहज विजय मिळविला. या विजयासह भारत वन-डे क्रमवारीत भारताने पहिले स्थान पटकाविले.
 
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 294 धावांचा पाठलाग करताना भारतानेही दमदार सलामी दिली. सलामीवीर रोहीत शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे यांनी सावध सुरूवात केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर हल्ला चढविला. दोघांनीही चौफेर फटकेबाजी करत 22 षटकांत 139 धावांची सलामी दिली. रोहित शर्माने 62 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांची आतिषबाजी करत 72 धावा, तर अजिंक्‍य रहाणेने 76 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 70 धावांची खेळी केली.
कुल्टर नाइलला उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात रोहीत शर्मा बदली खेळाडू कार्टराइटकडे झेल देऊन बाद झाला, तर कमिन्सने रहाणेला पायचीत बाद केले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली (28) आणि केदार जाधव (2) झटपट बाद झाले.
 
भारताच्या 35.2 षटकांत 4 बाद 206 असा धावसंख्येनंतर हार्दिक पांड्याने तुफानी फलंदाजी केली. हार्दिक पांड्याने 45 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. त्याने मनिष पांडे सोबत पाचव्या विकेटसाठी 78 धावांची निर्णायक भागेदारी केली. हार्दिक पांड्याने 72 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकत 78 धावांची खेळी करत भारताला विजयासमीप नेले. मनिष पांडे याने नाबाद 36, तर महेंद्रसिंग धोनी 3 धावांवर नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट्रिक कमिन्स याने दोन, तर नॅथन नाईल, रिचर्डसन, ऍगर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
 
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र आक्रमक फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला हार्दिक पांड्याने 42 धावांवर बाद केले. त्यानंतर ऍरॉन फिंच याने कर्णधार स्टिव्ह स्मिथ सोबत 154 धावांची दमदार भागीदारी केली.
 
सलामीवीर ऍरॉन फिंचने 124 धावांची आक्रमक खेळी केली. फिंचने 125 चेंडूंत 12 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी केली. कुलदीप यादव याने केदार जाधवकरवी त्याला बाद करत ही जोडी फोडली.
फिंचला कर्णधार स्टिव्ह स्मिथने चांगली साथ दिली.
 
स्मिथने 71 चेंडुत 5 चौकारांच्या मदतीने 63 धावांची अर्धशतकी खेळी केली. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना स्टिव्ह स्मिथ माघारी परतला. तेव्हा आस्ट्रेलियाची 42 षटकांत 3 बाद 243 अशी भक्कम स्थिती होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला खिळ बसली. पहिल्या दोन सामन्यांत वर्चस्व गाजवाणारे भारतीय गोलंदाज या दोन्ही खेळाडूंपुढे पुरते हतबल दिसले. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्याने आस्ट्रेलियाच्या फलंदाजांना तिनशे पार धावसंख्ये नेता आली नाही. भारताकडून जसप्रित बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन, तर चाहल आणि पांड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.