सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 17 जून 2023 (18:00 IST)

भारत पाकिस्तान श्रीलंकेत आमनेसामने; जाणून घ्या आशिया कपचं 'हायब्रिड मॉडेल'

india pakistan
15 वर्षांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड एशिया कप क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करणार आहे.
 
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रबंधन समितीचे प्रमुथ नजम सेठी यांनी हायब्रिड पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेच्या तारखांची घोषणा केली.
 
नजम सेठी यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करून याबद्दल माहिती दिली. त्यांनी लिहिलं, “तुम्ही तयार आहाता का? एशिया कप येतोय.”
 
त्यांनी म्हटलं की, “एशियन क्रिकेट बोर्डाने हायब्रिड मॉडलच्या स्वरुपात पाकिस्तानात एशिया कपच्या आयोजनाची परवानगी दिली आहे.”
 
याआधी 2008 मध्ये पाकिस्तानात या प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन झालं होतं. त्यावेळी 50 ओव्हर्सच्या मॅच असणाऱ्या एशिया कप स्पर्धेत एकूण सहा देशांनी सहभाग घेतला होता.
 
नजम सेठी त्यांच्या व्हीडिओत म्हणाले, “या स्पर्धेचं आयोजन पीसीबी (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) करेल पण मॅचेस पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवल्या जातील. हे हायब्रीड मॉडल आहे, आणि यामुळे काही जुने प्रश्नही सुटतील.”
 
भारत यात सहभागी होणार का?
एसीसीने 2023 च्या एशिया कपच्या आयोजनाचे अधिकार गेल्या वर्षी पाकिस्तानाला दिले. यानंतर बीसीसीआयने म्हटलं की भारत शेजारच्या देशात जाऊन मॅच खेळणार नाही.
 
बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी म्हटलं की पाकिस्तानबद्दल भारताचं एक विशिष्ट धोरण आहे आणि बीसीसीआय त्या धोरणाचं पालन करेल.
 
त्यांनी म्हटलं, “भारत 2023 चा एशिया कप तटस्थ ठिकाणी खेळेल. भारताची टीम पाकिस्तानात जाणार नाही, पाकिस्तानची टीम भारतात येणार नाही. याआधीचे एशिया कपही तटस्थ ठिकाणी झालेले आहेत.”
 
यानंतर एशिया कपच्या आयोजनाबद्दल समस्या निर्माण झाल्या. प्रकरण एवढं चिघळलं की पाकिस्तानने भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून मागे हटण्याचा इशारा दिला.
 
आता 15 जूनला नजम सेठी यांनी म्हटलं की भारताची टीम पाकिस्तानात येऊन खेळू शकत नाही त्यामुळे हायब्रिड व्यवस्था केलेली आहे.
 
म्हणजे भारतीय टीम या स्पर्धेत सहभागी होईल पण कोणतीही मॅच पाकिस्तानात खेळणार नाही.
 
नजम सेठी म्हणाले, “पाकिस्तानच्या फॅन्सची इच्छा आहे की 15 वर्षांनी पहिल्यांदा त्यांना भारतीय टीमला पाकिस्तानात खेळताना पाहाण्याची संधी मिळावी. पण आम्ही भारतीय क्रिकेट बोर्डाची अडचण समजू शकतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही सीमा पार करण्याआधी सरकारची परवानगी हवी असते. त्यामुळे हायब्रिड मार्ग हा सर्वात चांगला उपाय आहे. मी यासाठी प्रयत्न केले होते.”
 
ते पुढे म्हणाले, “ आम्हाला आशा आहे की या स्पर्धेसाठी आम्ही उत्तम व्यवस्था करू शकू. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या टीम्सची सरबराई करू शकू. त्याबरोबरच 2025 च्या फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या आयसीसी चँपियन्स ट्रॉफीसाठी तयारी करू शकू.”
 
“एसीसी बरोबर चर्चा सुरू आहेत. आम्ही श्रीलंका क्रिकेट बोर्डाशीही बोलतोय. या स्पर्धेच्या आयोजनात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही.”
 
काय आहे हायब्रिड मॉडेल?
जेव्हा एकाच स्पर्धेच्या मॅचेज वेगवेगळ्या देशांमध्ये आयोजित केल्या जातात तेव्हा त्याला हायब्रिड मॉडेल असं म्हणतात. 2023 च्या एशिया कपच्या चार मॅचेस पाकिस्तानात तर नऊ मॅचेस श्रीलंकेत खेळल्या जातील.
 
ही स्पर्धा 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरपर्यंत खेळली जाईल.
 
कोणकोणत्या टीम्स सहभागी होणार?
एसीसीनुसार या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळच्या टीम्स सहभागी होतील.
 
नेपाळ पहिल्यांदाच आशियात होणाऱ्या कोणत्या स्पर्धेत सहभागी झाला आहे.
 
या काळात 13 वनडे मॅच खेळवल्या जातील. सहा टीम्समध्ये दोन गटात मॅच होतील. प्रत्येक गटातून एक दोन टीम्स सुपर फोरमध्ये जातील. फायनल मॅच सुपर फोर स्टेजमधल्या दोन टीम्स मध्ये होईल.
 
पाकिस्तानी सोशल मीडियावर याची चर्चा का?
पाकिस्तानच्या सोशल मीडियावर या हायब्रिड मॉडेलवरून चर्चा सुरू आहे.
 
काही लोकांचं म्हणणं आहे की पाकिस्तानने हायब्रिड मॉडलचा प्रस्ताव देऊन चूक केली. त्यांनी असं करायला नको होतं.
 
थर्ड अम्पायर नावाच्या एका युट्यूब ब्लॉगरने म्हटलं, “सगळ्या मॅचेस पाकिस्तानात व्हायला हव्या होत्या. ज्या टीम्स सहभागी होणार नाहीत त्यांचे पॉईंट्स दुसऱ्या कोणत्या टीमला दिले असते. असं आधीही वर्ल्ड कपमध्ये झालेलं आहे.”
 
“पण पाकिस्तानला स्वतःच याची काळजी नव्हती. एशिया क्रिकेट काऊन्सिलही बीसीसीआयच्या अवतीभोवती फिरतं आणि बीसीसीआय जय शाहांच्या अवतीभोवती फिरतं. असं वाटतंय की येत्या वर्ल्ड कपमध्ये याचा खूप परिणाम होईल.”
 
सईद ओमर नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर लिहिलं की, “आपल्याला लॉलिपॉप दिलं जातंय. आपण आपल्या देशात फक्त एक मॅचच खेळू शकू. हायब्रिड मॉडेलनुसार भारताना एशिया कप खेळायला मंजुरी दिली पण पाकिस्तान पूर्ण वर्ल्ड कप खेळण्यासाठी तिकडे (भारतात) जाईल.”
 
डॉन न्यूजचे स्पोर्ट्स एडिटर अब्दुल गफ्फार यांनी लिहिलं की, “ही चांगली गोष्ट आहे. मी 20 मे ला बातमी दिली होती की एसीसी हायब्रिड मॉडल पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड स्वीकारेल. स्पर्धेच्या पहिल्या चार मॅचेस पाकिस्तानात होतील.”
 
आणखी एका ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं, “नजम सेठींच्या हायब्रिड प्रस्तावाने गोष्टी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या बाजूने झाल्या. बीसीसीआयने ऑक्टोबर 2021 ला घोषणा केली होती की एशिया कपच्या आयोजनातून पाकिस्तानला बाहेर केलं जाईल. आता आशा आहे की पाकिस्तान वर्ल्ड कप 2023 मध्ये भाग घेईल आणि त्याचबरोबर 2025 च्या चँपियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानात येईल हेही सुनिश्चित करेल.”
 
आरफा फिरोज झाकी लिहितात, “पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यात काही डील झालीये का? हायब्रिड मॉडेल स्वीकारण्याचा परिणाम 2023 चा वर्ल्ड कप आणि 2025 च्या चँपियन्स ट्रॉफीवर होईल. वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानला भारतात जायचं आहे आणि चँपियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानात होणार आहे.”
 
इस्माईल कुरेशी यांनी नजम सेठींचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलं, “हे भविष्याच्या दृष्टीने उचलेलं चांगलं पाऊल आहे. आता आशा आहे की भारत या स्पर्धेदरम्यान समजंसपणा दाखवेल आणि या पार्श्वभूमीवर 2025 मध्ये चँपियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येईल. क्रिकेटसाठी का होईना.”
 
ट्रोल नावाच्या एका पाकिस्तानी ट्विटर अकाऊंटवरून एक कार्टून पोस्ट केलंय. त्यात म्हटलंय की, “सगळ्या मोठ्या मॅचेस श्रीलंकेत होतील तर चार भंगार मॅचेस पाकिस्तानात होतील.”
 
शहरयार एजाज लिहितात की, “तुम्ही चार मॅचमुळे खूश होताय. तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं की एशिया कपचं आयोजन पाकिस्तानात होईल. जर भारत त्यांच्या मॅचेस पाकिस्तानात खेळणार नसेल तर पाकिस्ताननेही भारतात वर्ल्ड कपच्या मॅचेस खेळायला नकोत. पण असं होणार नाही. शिवाय आता दुसऱ्या टीम्सच्या मॅचेसही पाकिस्तानात होणार नाहीत. फक्त चार मॅचेससाठी तुम्ही स्वतःला हिरो समजताय. भिकाऱ्यांना निवडीचा अधिकार नसतो.”
 
भारतीय खेळ पत्रकार बोरिया मुजूमदार यांनी लिहिलेल्या एका लेखात म्हटलंय की आता हाच पर्याय शिल्लक होता. याशिवाय पाकिस्तान यात खेळू शकता नसता आणि एसीसीचा हेतूच कमजोर पडला असता कारण एसीसीचा उद्देश आहे की सगळ्या आशियायी देशांना एकत्र आणणं.
 
ते लिहितात, “जर भारत पाकिस्तानची मॅच होणार नसेल तर ब्रॉडकास्टर्स ठरलीये त्याच्या एक तृतीयांश रक्कम पण देणार नाहीत. एका अंदाजानुसार एशिया कपचा 79 टक्के रेव्हेन्यू भारत पाकिस्तान मॅचमधून येतो.”
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बीसीसीआयची किती ताकद आहे हे पाकिस्तानचे लोक चांगल्याप्रकारे जाणतात.
 
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांनी म्हटलं होतं, “पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 50 निधी येतो आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाकडून. आयसीसीकडे पैसा येतो तो मॅचेस खेळवण्यातून. त्यातून जमा झालेला पैसा ते आपल्या सदस्यांमध्ये वाटतात.”
 
राजा पुढे म्हणतात, “आयसीसीकडे येणाऱ्या पैशापैकी 90 टक्के पैसा भारतीय मार्केटमधून येतो. म्हणजे एक प्रकारे भारताचे बिझनेस हाऊसेस पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चालवत आहेत. उद्या कोणा भारतीय पंतप्रधानाला वाटलं की ते पाकिस्तानाला फंडिंग देणार नाहीत तर आपलं क्रिकेट बोर्ड कोसळू शकतं.”
 
ते म्हणतात, “आयसीसी भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवतं कारण असं केल्याने त्यांच्या कमीत कमी मॅच होतील हे सुनिश्चित करता येतं. आता अशीही शक्यता आहे की दोन्ही देश फायनल मॅचमध्ये पोचतील. असं झालं तर मॅच कोणीही जिंकलं तर आयोजकांचा फायदाच होईल.”
Published By -Smita Joshi