आज ‘IPL’च्या वेळापत्रकाची घोषणा
आयपीएल २०२० (IPL 2020)या स्पर्धेचं वेळापत्रक शुक्रवारी जाहीर होईल, अशी माहिती सौरव गांगुली यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. ‘आयपीएल’बहुप्रतीक्षित वेळापत्रक शुक्रवारी (४ सप्टेंबरला) जाहीर करण्यात येणार आहे, असे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले आहेत.
‘‘वेळापत्रकाला उशीर झाला आहे, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. प्रस्तावित वेळापत्रकातील समस्यांचे निराकरण करून त्याला अंतिम स्वरूप दिले जात आहे,’’ असे गांगुलीने सांगितले. ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल शुक्रवारी दुबईत वेळापत्रक जाहीर करतील. परंतु ते संपूर्ण वेळापत्रक जाहीर करतील की फक्त टप्प्याटप्प्याने हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.
१३ व्या सत्राचं वेळापत्रक (IPL 2020) तयार करताना बीसीसीआयला काही अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. करोना विषाणूसोबतच यूएईमधील उष्म वातावरणाचा खेळाडूवर होणारा परिणामाबद्दलही विचार करावा लागेल. येथील उष्म वातावरणामुळे खेळाडूंनी दुपारी सराव न करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीसीसीआयला वेळापत्रक बनवायला वेळ लागल्याचे म्हटले जात आहे.
सध्या संघ, खेळाडू आणि चाहते आयपीएलच्या वेळापत्रकाची वाट पाहत आहेत. याआधी असे सांगितले जात होते की, मुंबई (Mumbai Indians) आणि उप-विजेता संघ चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. मात्र चेन्नई संघातील खेळाडू करोनाबाधित आढळल्यानंतर वेळापत्रकात बदल होऊ शकतो, असे सांगण्यात आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि चेन्नईमध्येच सलामीचा सामना होणार आहे. चेन्नईचा संघ १९ सप्टेंबर रोजी सलामीचा सामना खेळण्यासाठी सज्ज असला तरी बीसीसीआय काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे आहे. याआधी अशीही माहिती होती की सलामीचा सामना मुंबई आणि बंगळुरू संघात होऊ शकतो.