1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified शनिवार, 27 मे 2023 (10:09 IST)

शुबमन गिलच्या वादळात मुंबई इंडियन्स भुईसपाट, गुजरात टायटन्स अंतिम फेरीत

सलामीवीर फलंदाज शुबमन गिलचं तडाखेबंद शतक आणि नंतर गोलंदाज मोहित शर्माच्या 5 बळींच्या जोरावर गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर 62 धावांनी विजय मिळवला.
या विजयासह गुजरातने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी पहिल्याच हंगामात गुजरातने जेतेपदावर नाव कोरलं होतं. यंदाही सातत्यपूर्ण खेळ करत गुजरातने अंतिम फेरीत आगेकूच केली आहे. दुसरीकडे प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईचा प्रवास क्वालिफायर2च्या लढतीतच संपुष्टात आला. गेल्या हंगामात तळाशी राहणाऱ्या मुंबईने यंदा तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली.
 
गुजरातच्या दिमाखदार विजयाचा शिल्पकार ठरला युवा सलामीवीर शुबमन गिल. टेस्ट, वनडे, ट्वेन्टी20 यासह आयपीएल स्पर्धेत गिलच्या नावावर शतक आहे. यंदाच्या हंगामात धावांची टांकसाळ उघडताना गिलने विक्रमांच्या यादीत स्वत:चं नाव कोरलं आहे.
 
शुबमनने साकारलेली 129 धावांची खेळी आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातली प्लेऑफ्समधली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
 
गिलने 7 ते 16 या षटकांदरम्यान 36 चेंडूत 94 धावा चोपून काढल्या.
 
गिलने यंदाच्या हंगामात तीन शतकं झळकावली आहेत. आयपीएलच्या एका हंगामात यापेक्षा शतकांचा विक्रम फक्त विराट कोहली आणि जोस बटलर यांच्या नावावर आहे.
 
गिलने शेवटच्या 4 सामन्यांपैकी 3 मध्ये शतक झळकावलं आहे. गिलने बंगळुरुविरुद्ध 58 चेंडूत 101 तर चेन्नईविरुद्ध 52 चेंडूत 104 धावांची खेळी साकारली होती. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या करो या मरो लढतीत गिलने 60 चेंडूत 129 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली.
 
गिलने यंदाच्या हंगामात 851 धावांची मजल मारली आहे. अंतिम सामना बाकी असून, गिलला यामध्ये भर घालण्याची संधी आहे. आयपीएलच्या एका हंगामात 800पेक्षा जास्त धावा करण्याची किमया फक्त विराट कोहली आणि जोस बटलर यांना साधली आहे. या दुर्मीळ मांदियाळीत आता गिलचा समावेश झाला आहे.
 
शुक्रवारी साकारलेल्या खेळीसह हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला देण्यात येणारी मानाची ऑरेंज कॅप गिलने नावावर केली आहे.
 
इंडियन प्रीमिअर लीगमधील क्वालिफायर-2 हा सामना काल (26 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला.
 
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यामुळे नाणेफेकीस विलंब झाला. अखेर, पाऊस थांबल्यानंतर रात्री पावणेआठ वाजता नाणेफेक झाली. तर साडेसातऐवजी आठ वाजता सामना सुरू झाला.
 
नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईने गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. गुजरातला कमी धावांमध्ये रोखून वातावरणाचा फायदा घेण्याचा मुंबईचा विचार होता.
 
पण गुजरातच्या सलामीवीरांनी पॉवरप्लेमध्ये जोरदार फटकेबाजी करत मुंबईच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं.
 
पहिल्या 6 षटकांत गुजरातच्या बिनबाद 54 धावा फलकावर लागलेल्या होत्या. पण पुढच्या षटकांत पियुष चावलाने सलामीवीर वृद्धिमान साहाला बाद करून त्याचा अडथळा दूर केला.
 
साहा बाद झाल्यानंतर गुजरातच्या धावांचा वेग आटोक्यात येईल, अशी अपेक्षा मुंबईला होती. पण तसं काही घडलं नाही.
 
गेल्या काही सामन्यांमध्ये धावांचा रतीब घालणाऱ्या शुबमन गिलने याही सामन्यात तुफान फटकेबाजी करत धावांचा आलेख चढता ठेवला. त्याने सुरुवातीला ऑरेंज कॅप आपल्या नावे केली.
 
त्यानंतर चौफेर हाणामारी करत सुरुवातीला 32 चेंडूंमध्ये वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर गिल आणखी आक्रमक बनला. त्याने एकूण 49 चेंडूंवर आपलं शतकही पूर्ण केलं. गेल्या चार सामन्यांमधील गिलचं हे तिसरं शतक ठरलं आहे.
शुबमन गिलने आपल्या डावात एकूण 60 चेंडूंचा सामना करत 129 धावा झोडपून काढल्या. गिलने 7 चौकार तर 10 षटकार खेचले.
 
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या साई सुदर्शनने गिलला सुयोग्य साथ दिली. त्याने 31 चेंडूंमध्ये 43 धावांची खेळी केली. पण फलंदाजीदरम्यान जखमी झाल्याने तो रिटायर्ड आऊट होऊन माघाली परतला. यानंतर आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्या यानेही मुंबईच्या गोलंदाजावर तुटून पडत 13 चेंडूंमध्ये 28 धावा जोडल्या.
 
20 षटकांचा खेळ संपला तेव्हा गुजरात टायटन्सने 3 बाद 233 अशी अवाढव्य धावसंख्या फलकावर उभी केली होती.
 
दरम्यान, गुजरातची फलंदाजी सुरू असताना मुंबईचा गोलंदाज ख्रिस जॉर्डन आणि यष्टीरक्षक ईशान किशन यांच्यात नजरचुकीने धडक झाली. यामध्ये ईशान किशनच्या डोळ्याला मार बसल्याने त्याने या सामन्यातून माघार घेतली.
 
किशनच्या अनुपस्थितीत 234 धावांच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा दबाव मुंबईवर आणखी वाढला.
 
रोहित शर्मासोबत ईशानच्या जागी सलामीवीर म्हणून निहाल वढेरा उतरला खरा पण तो फार काही कमाल दाखवू शकला नाही. त्याने केवळ 3 चेंडू खेळून 4 धावा काढल्या आणि शमीच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात तंबूत परतला.
यानंतर मोहम्मद शमीने तिसऱ्या षटकात कर्णधार रोहित शर्माला बाद करून मोठा अडथळा दूर केला. रोहितने सात चेंडूंचा सामना करत एका चौकाराच्या मदतीने केवळ 8 धावा केल्या.
 
दोन्ही सलामीवीर माघारी परतल्याने मुंबईची अवस्था 2.2 षटकांत 2 बाद 21 अशी नाजूक बनली होती. अशा स्थितीत तिसऱ्या क्रमांकावर आलेला कॅमेरून ग्रीनसुद्धा हाताच्या कोपराला दुखापत होऊन तंबूत परतला. यामुळे मुंबई आणखीनच अडचणीत सापडली.
 
पण त्यानंतर मधल्या फळीतील तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी जोरदार फटकेबाजी करत मुंबईचं आव्हान कायम ठेवलं.
 
विशेषतः तिलक वर्मा अत्यंत आक्रमकपणे खेळत होता. त्याने पाचव्या षटकांत शमीवर हल्ला चढवून सलग चार चौकारांसह एकूण 24 धावा वसूल केल्या.
 
मुंबई आपल्या लक्ष्याच्या दिशेने वेगाने घोडदौड करत असतानाच राशिद खानने तिलक वर्माला त्रिफळाचीत केलं. तिलकने केवळ 14 चेंडूंचा सामना करत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 43 धावांची खेळी केली.
 
तिलक वर्मा बाद झाल्यानंतर जखमी होऊन माघारी परतलेला कॅमेरून ग्रीन पुन्हा मैदानावर दाखल झाला. यानंतर ग्रीन-यादव जोडीने धावफलक वेगाने हलता ठेवला.
 
सगळं काही आता सुरळीत सुरू आहे, असं वाटत असतानाच मुंबईला आणखी एक धक्का बसला. 11 षटकात फलकावर 3 बाद 124 अशी धावसंख्या असताना कॅमेरून ग्रीन बाद झाला. त्याने 20 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या.
 
यानंतरही सूर्यकुमार धीर न खचता एक बाजूला तळ ठोकून उभा होता. सूर्यकुमारने पुढील सूत्रे हातात घेत वेगाने धावा बनवण्यावर भर दिला. पण वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात तो पंधराव्या षटकात बाद झाला.
 
सूर्यकुमारने एकूण 38 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. त्याला अनुभवी गोलंदाज मोहित शर्माने बाद केले.
 
सूर्या बाद होताच मोहितने आपल्या गोलंदाजीने सामन्याचं चित्रच पालटून टाकलं. मैदानावर दाखल होणारा मुंबईचा पुढचा कोणताही फलंदाज मोहितच्या गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही.
 
मोहितने केवळ 2.2 षटकांत 10 धावा देत 5 विकेट काढले. अखेर 18.2 षटकांत मुंबई संघ 171 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयासह गुजरातने IPL 2023 च्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. आता अंतिम फेरीत गुजरातचा मुकाबला बलाढ्य चेन्नई संघाशी होईल.
 
IPL स्पर्धेच्या रचनेनुसार, साखळी फेरीत पहिल्या दोन क्रमांकावर असलेले संघ हा क्वालिफायर-1 चा सामना खेळतात. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत जातो. तर साखळी फेरीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमधील विजेता संघ पुढे जाऊन क्वालिफायर-1 मधील पराभूत संघाशी भिडतो.
 
या दोन्ही संघात सामना होऊन अंतिम फेरीत पुढे कोणता संघ जाणार हे निश्चित होतं, असा हा नियम आहे.
 
क्वालिफायर-1 मध्ये मंगळवारी (24 मे) चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरातला हरवून थेट अंतिम फेरी गाठलेली आहे. त्यामुळे या विजयामुळे गुजरात आणि चेन्नई यांच्यात येत्या 28 मे रोजी IPL च्या 16व्या हंगामाच्या जेतेपदासाठी लढाई होईल.
 


Published By- Priya Dixit