1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|

तिसरा कसोटी सामना दिल्लीत होणार

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चार कसोटी क्रिकेट मालिकेच्या सामन्यांचे ठिकाण आणि वेळ बदलण्यात आला नसून कडक सुरक्षा व्यवस्थेत तिसरा कसोटी सामना दिल्लीत होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक (बीसीसीआय) मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

सुरक्षेच्या कारणास्तव 29 ऑक्टोबरला होणारा तिसरा कसोटी सामना रद्द किंवा स्थलांतरीत केला जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. मंडळाच्या त्रिसदस्यीय प्रतिनिधीमंडळाने आज गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांशी सुरक्षे संदर्भात भेट घेऊन चर्चा केली. काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत खेळण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

सरकारकडून संपूर्ण सहकार्य आणि सुरक्षा व्यवस्थेचे आश्वासन मिळाले असल्याचे बीसीसीआयच्या वित्त समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

गृह सचिवांची बैठक घेणार्‍या मंडळाच्या अधिकार्‍यामध्ये शुक्लासह, पंजाब क्रिकेट संघाचे अध्यक्ष आय. एस. बिंद्रा आणि बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी रत्नाकर शेट्टी यांचा समावेश होता. त्यांनी गृह सचिव मधुकर गुप्तांसह इतर अधिकार्‍यांची भेट घेतली.