महिलांवरील अत्याचार टाळण्यासाठी मानवी मूल्यांचे जतन
भानुमती नरसिंहन
महिलांवरील घरगुती अत्याचारांना रोखण्याच्या दृष्टीने मार्ग शोधण्यासाठी नुकतेच वॉशिंग्टन डीसीमध्ये माझी काही महिला नेत्यांबरोबर भेट झाली. महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न केवळ भारतापुरता मर्यादित नाही.खरे म्हणजे हा महिलांच्या हक्काचा प्रश्न नसून मानवी हक्काचा प्रश्न आहे. जर महिलांना सुरक्षित वाटत नसेल तर संपूर्ण समाजाचीच उलथापालथ होते आणि त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघांनी उठून अन्याया विरुद्ध झगडून योग्य मार्ग शोधला पाहिजे. माझा ठाम विश्वास आहे की मानवी मूल्यांचे जतन करून महिलावरील अत्याचार रोखण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे . भारतीय परंपरेत महिला आणि पुरुष दोघांनाही जीवनाच्या सर्व स्तरांवर सारखाच मान दिला जातो. याचेच प्रतिक म्हणजे अर्धनारीनटेश्वराचे रूप, ज्यात देव अर्धा नराच्या रूपात आणि अर्धा नारीच्यारुपात दाखवलेला आहे. त्यातून हे सांगायचे असते की सृष्टीची निर्मिती तिचे पालन यात त्या दोघांचा समान सहभाग असतो. आपल्या शरीरातील पेशीही आई आणि वडील दोघांच्या गुणसूत्रांपासून बनलेल्या असतात. प्रत्येकामध्ये दोन्ही शक्ती समप्रमाणात असतात. यिन आणि यँग मध्ये हीच संकल्पना मांडलेली आहे. चांगल्या आणि प्रगतीशील समाजासाठी प्रत्येकामधील हे संतुलन असणे गरजेचे आहे. आपण महिलांचा आदर करायला हवा आणि त्यांच्या पदाचा मान राखायला हवा.
मोठ्या शहरातून घडत असलेल्या घटना या अत्याचाराच्या विरोधात काही करण्याच्या दृष्टीने काळजी करण्यासारख्या आणि दक्षता बाळगण्यासारख्या आहेत. बळी पडलेल्यांना आणि कारणासाठी लढा देणाऱ्यांना आमचा पाठिंबा आहे. यामधून त्यांचे सामर्थ्य दिसून येते. त्यांना लढा द्यायचा आहे आणि त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. न्याय मागण्यासाठी उठवलेल्या या आवाजांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. पण यावर उपाय शोधण्यासाठी साकल्याने विचार व्हायला हवा. आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की चिंता आणि आक्रमकतेने उपाय सापडणार नाही. आपल्याला शांत डोक्याने आणि सुस्पष्ट विचाराने कामा करून हे ठरवायला हवे की आपल्याला अशाच्या विरोधात लढायचे आहे आणि कसे ? जेव्हा आपण शांत डोक्याने आणि सुस्पष्ट विचार करून पावले उचलू तेव्हाच दीर्घकालीन उपाय सापडेल. आध्यात्मिक ज्ञान आणि साधना यामुळे आपल्याला मन शांत ठेवायला मदत होईल. समाजात मानवी मूल्ये टिकवण्यासाठी जीवन व्यतीत केलेल्या महान गुरुवर्यांच्या शिकवणीमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. सर्वांमध्ये कारुण्याची भावना जागवली पाहिजे. यासाठी ध्यान, प्राणायाम आणि इतर आध्यात्मिक साधना करण्याने फायदा होतो. त्यामुळे आपल्यात साठलेला ताण निघून जातो आणि मन ताजेतवाने होते आणि आपण योग्य निर्णय घेऊ शकतो.