1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

राज ठाकरेः झंझावाती राजकारणी ते हळवा कलावंत

- विकास शिरपूरकर

PR
राज श्रीकांत ठाकरे एक झंझावात किंवा वादळ म्हणा हवं तर. राज ठाकरे यांचं नुसतं नाव उच्‍चारलं तरी मराठी माणसाच्‍या (बहुतांश) मनात मराठीचा स्‍वाभिमान जागा होतो. तर अमराठी विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारींच्‍या मनात रागाची किंवा द्वेषाची भावना. अनेक वर्ष राखेखाली धगधगत असलेल्‍या मराठीच्‍या मुद्याला राज यांनी फुंकर घातली आणि नवनिर्माणाचे आंदोलन उभे राहिले.

  जहाल राजकारणी म्हणून सर्वपरिचित असलेल्‍या राज ठाकरे यांच्‍यात एक हळव्‍या मनाचा कलावंतही दडला आहे. हे फार कमी जणांना ठावूक असेल. त्‍यांना महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक वर्तुळातही मानाचे स्‍थान आहे. राज यांच्‍या या व्‍यक्तीमत्वाबद्दल...      
मात्र या जहाल, कणखर आणि खंबीर राजकारण्‍यामागे एक हळूवार मनाचा कलावंतही दडलेला आहे. हे ब-याच कमी जणांना माहीत असावं. महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात ठाकरे कुटुंबीय जितके जहाल आणि वादग्रस्‍त म्हणून ओळखले जातात. तितकाच त्‍यांना महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक वर्तुळातही मानाचे स्‍थान आहे. ठाकरे घराण्‍यातून रक्तातच उतरलेला हा कलेचा गूण राज यांच्‍यासाठी तरी कसा अपवाद ठरणार.

PR
अवघ्‍या महाराष्‍ट्राचे वैचारिक प्रबोधन करणा-या प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्‍या विचारांचे बाळकडू आणि बाळासाहेब ठाकरे यांच्‍यातील जहाल राजकारण्‍याचा वारसा घेऊन वाढलेल्‍या राज यांच्‍यावर लहानपणापासूनच कलेचे संस्‍कारही झाले आणि म्‍हणूनच राज हे राजकारण्‍या इतकेच व्‍यंगचित्रकार म्हणूनही सर्वपरिचित आहेत.

राज यांचे पिताश्री स्‍व.श्रीकांत ठाकरे हे स्‍वतः मराठीतील एक चांगले संगीतकार होते. तर काका बाळासाहेब ठाकरे हे मार्मिक व्‍यंगचित्रकार.

श्रीकांत आणि कुंदा ठाकरे यांच्‍या पोटी 14 जून 1968 रोजी जन्‍मलेल्‍या राज यांचे शिक्षण मध्‍य मुंबईतील बाल मोहन विद्या मंदिरात झाले. लहानपणापासून चित्रकलेची आवड असलेल्‍या राज यांनी महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे स्‍कूल ऑफ आर्ट्समधून घेतले. वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे.

PR
आपण राजकारणात आलो नसतो तर नक्कीच वॉल्ट डिस्ने स्‍टुडिओसाठी कार्टून केले असते असे ते नेहमी म्हणतात. चित्रपट निर्मिती आणि फोटोग्राफीचीही त्‍यांना आवड आहे. राज यांचा हा गुण त्यांच्‍या मुलातही उतरला आहे. तर चुलत भाऊ उध्‍दव एक चांगला फोटोग्राफर आहे. उध्‍दवचा मुलगा आदित्‍य उत्तम कवी आहे.

मराठीतील प्रख्‍यात अभिनेते मोहन वाघ यांच्‍या कन्‍या शर्मिला यांच्‍याशी राज यांचा विवाह झाल्‍याने तिकडूनही त्यांची कलेशी नाते जोडले गेले आहे.

एक कलावंत अणि व्‍यंगचित्रकार म्हणून महाविद्यालयीन काळात आपल्‍या करीअरकडे पाहणा-या राज यांनी नंतर राजकारणात उडी घेतली. शिवसेनेच्‍या माध्‍यमातून भारतीय विद्यार्थी सेना, शिव उद्योग सेना या संघटनांची बांधणी करणा-या राज यांनी नंतरच्‍या काळात शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेची स्‍थापना केली. मराठीच्‍या मुद्यावरून देशभर रान पेटविणा-या आणि लोकसभा निवडणुकीत राज्यातील तगड्या पक्षांनाही घाम फोडणा-या राज आता राजकारणात पूर्णवेळ बिझी असले तरीही त्यांच्‍यातील कलावंत त्यांनी जपून ठेवला आहे. म्हणूनच आपल्‍या पक्षाची वेबसाईट तयार करताना त्यात एक कप्‍पा व्‍यंगचित्रांसाठी ठेवण्‍यास ते विसरले नाहीत.

PR
राजा जर कलागुणांचा चाहता असेल तर त्या राज्‍याचा उत्कर्ष लवकर होतो, असे पूर्वीच्‍या काळी म्हटले जात असे आणि म्हणूनच कलेला राजाश्रय मिळावा असा प्रयत्‍न केला जाई. आधुनिक काळात राजप्रथा संपली असली तरीही हेच सुत्र राज्यकर्त्‍यांना लागू होऊ शकते. म्हणूनच मराठी माणसाला त्यांच्‍यातील राजकारण्‍यासोबतच कलावंतही तितकाच जवळचा वाटतो.