बाळासाहेब ठाकरे जयंती: पहिले व्यंगचित्र साप्ताहिक 'मार्मिक’
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.
ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा आवडती होती. त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले.
नंतर बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे व्यंगचित्रात्मक साप्ताहिक काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ऑगस्ट १९६० मध्ये मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे मार्मिक नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. मार्मिक च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते.
संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली. १९६० पासून ते राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत मार्मिक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ठाकरे लहान मुलांसाठीच्या "श्याम या पाक्षिकाचे सुद्धा संपादक होते.