मुंबईच्या महालक्ष्मीचा.....इतिहास
तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. नवरात्रात महालक्ष्मीचा सोहळा अप्रतिम असतो मुंबईतील महालक्ष्मीचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे तो सारा परिसराच गर्भश्रीमंत ‘लक्ष्मीपुत्रां’ आणि ‘लक्ष्मीकन्यां’चाही..देवळाच्या समोरच पेडर रोडवर ‘प्रभुकुंज’ मध्ये देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मीच्या सारख्याच लाडक्या कन्या मंगेशकर भगिनी बंधू पंडित हृदयनाथांसोबत राहतात. देवळाला लागून असलेल्या ‘शिवतीर्थ’ इमारतीत मराठीची एकेकाळची आघाडीची नायिका ‘जयश्री गडकरां’चं वास्तव्य होत. देशातील सर्वात श्रीमंत असामी श्री. मुकेश अंबानीही इथून हाकेच्या अंतरावर राहतात. शेजारचा ‘ब्रीच कँडी’, देवळापासून काही अंतरावर असलेला ‘कार मायकेल रोड’, ‘पेडर रोड’, ही ठिकाण म्हणजे देशाच्या अर्थकारणाला गती देणाऱ्या मोठ-मोठ्या उद्योगपतींचा. या सर्वच परिसरावर महालक्ष्मीचा वरदहस्त असून इथे सहज म्हणून फेरफटका मारला तरी महा’लक्ष्मी’चे दर्शन अगदी सहजरित्या घडते..
अश्या या आई महालक्ष्मीचे वास्तव्य सध्याच्या ठिकाणी तिच्या दोन बहिणी, महाकाली आणि महासरस्वती, यांच्यासोबत साधारणतः १७८४-८५ पासून आहे.
मुंबईचा ब्रिटीश गव्हर्नर जॉन हॉर्नबी याने मुंबई आणि वरळी ही दोन बेट समुद्रात भरणी करून बांधून काढण्याचा चंग बांधला होता. व्यापारी असलेल्या इस्ट इंडिया कंपनीला हॉर्नबीचा हा पवित्रा बिलकुल मंजूर नव्हता. तरी हा पठ्ठ्या हिम्मत हरला नाही. मुंबई बेटाचं दक्षिण टोक, म्हणजे सध्या आपल्या महालक्ष्मीचे देऊळ आहे ते आणि समोरचे वरळी गाव, म्हणजे सध्या मुंबई महानगरपालिकेचे ‘लव्ह-ग्रोव्ह उदंचन केंद्र’ किंवा ‘अत्रीया मॉल’ आहे ते, तिथपर्यंत समुद्राचे पाणी पसरलेले होते. भरतीच्या वेळेस हे समुद्राचे पाणी पार भायखळ्या पर्यंत पोहोचत असे. त्यामुळे मुंबई बेटातून वरळीकडे जायचे तर होडीशिवाय पर्याय नसायचा. समुद्राचे पाणी जिथून आत घुसायचे त्या भागाला ब्रिटिशानी ‘द ग्रेट ब्रीच’ असे नाव दिले होते. ब्रीच म्हणजे खिंडार. ही यातायात बंद करण्याचे हॉर्नबीने ठरवले आणि त्याने ही खाडी भरून काढायचा आणि मुंबई बेटातून थेट वरळी बेटापर्यंत जाता येईल असा गाडी रस्ता बांधण्याचे काम इंग्लंडच्या कार्यालयाची परवानगी न घेता चालू केले. ‘वरळीचा बांध’ बांधण्याचे काम असे या कामाला त्यावेळी म्हटले गेले होते.या बांधाच्या बांधकामाचे कंत्राट रामजी शिवजी नावाच्या पाठारे प्रभू या तरुण इंजिनिअर कडे सोपवण्यात आले होते. बांध घालण्याचे काम सुरु झाले. दगडाच्या राशीच्या राशी भरून तारवं इथे येऊ लागली. दगडाच्या राशी खाडीत टाकून भरणी करण्याचे काम सुरु झाले. बांधकामात थोडी प्रगती झाली की समुद्राच्या पाण्याच्या रेट्याने बांधलेला बांध कोसळून जाई आणि पुन्हा सुरुवात करावी लागे. असे बरेच महिने चाललं. त्याकाळचे तंत्रज्ञान लक्षात घेता हे तसे कठीणच काम होते. पण रामजी शिवजी आणि हॉर्नबी या दोघांनीही हिम्मत हारली नाही..ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले परंतु परत परत तेच व्हायचे..!
अशा वेळी एका रात्री रामजी शिवजीला महालक्ष्मीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले, ‘मी माझ्या बहिणींसोबत महासागराच्या तळाशी आहे. तू मला बाहेर काढ आणि मगच तुझा बांध पूर्ण होईल..रामजी शिवजीने दृष्टान्तावर विश्वास ठेवला आणि ही घटना हॉर्नबीच्या कानावर घालायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी रामजी शिवजीने त्याचे स्वप्न आणि त्यातील देवीच्या दृष्टांताची गोष्ट हॉर्नबीच्या कानावर घातली आणि समुद्रात देवीच्या मूर्तींचा शोध घेण्यासाठी परवानगी मागितली. होर्नबी पक्का ब्रिटीश. या असल्या कथांवर त्याचा विश्वास असणेच शक्य नव्हते परंतु हाती घेतलेले काम पूर्ण होत नव्हते. बांध पुन्हा पुन्हा कोसळत जोता. खर्च वाढत चालला होता. हॉर्नबीच्या डोक्यावर इंग्लंडची परवानगी नसताना कामाला सुरुवात केली म्हणून सस्पेन्शनची तलवार लटकत होती आणि म्हणून वरळीचा बंध बांध्याला आणखी उशीर होऊन चालणार नव्हते. त्याला काहीही करून हा बांध पूर्ण करायचा होता आणि म्हणून त्याने काहीही न बोलता हा ही प्रयत्न करून बघू म्हणून रामजी शिवजीला देवीच्या मूर्तींचा शोध घेण्याची परवानगी दिली.
झाले रामजी शिवजी कामाला लागला. लहान बोटी मागवण्यात आल्या. स्थानिक मच्छिमार बंधूंची मदत घेण्यात आली. समुद्रात जाळी टाकण्यात आली आणि एके दिवशी जाळी वर काढताना हाताला जड लागली. जाळी बाहेर काढल्यावर रामजी शिवजीच्या स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्या जाळ्यात खरोखरच महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली अशा तीन महादेविंच्या मूर्ती सापडल्या. रामजी शिवजीने हॉर्नबीला त्या मूर्ती दाखवून त्याचा दृष्टांत खरा झाल्याचे सांगितले आणि या देवींच्या स्थापनेसाठी जागा देण्याची विनंती केली. हॉर्नबीनेही सध्याच्या महालक्ष्मी देवळाची जागा मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी दिली असे सांगून त्या जागी मूर्ती ठेवण्यास सांगितले. हॉर्नबीने दिलेल्या आदेशानुसार त्या जागी मूर्ती तात्पुरत्या स्वरुपात ठेवल्या आणि नंतर मात्र वरळीचा बांध कोणताही अडथळा न येता पूर्ण झाला. पुढे बांध पूर्ण होऊन हॉर्नबीच्या स्वाधीन केल्यानंतर रामजी शिवजीने त्याकाळात ८० हजार रुपये खर्चून महालक्ष्मीचे देऊळ बांधून त्यात महालक्ष्मी आणि महाकाली व महासरस्वती या तिच्या दोन बहिणींची मोठ्या भक्तिभावाने स्थापना केली. हे देऊळ सुमारे सन १७८४-८५ च्या सुमारास बांधले गेले आहे.
वरळीच्या बांधाच्या बांधकामाने मुंबईच्या ‘महालक्ष्मी’ला जन्म दिला हे शब्दशः खरे ठरले. मुंबईवर ‘लक्ष्मी’ प्रसन्न झाली ती या दिवसापासूनच. या बांधामुळे मुंबईत प्रचंड प्रमाणावर जमीन उपलब्ध झाली. देशभरातील अनेक ठिकाणाहून हुशार व्यापारी, तंत्रज्ञ, कलाकार, कारागीर मुंबईत येऊ लागले. व्यापार उदीम वाढला आणि मुंबई बघता बघत देशाची आर्थिक राजधानी बनली. मुंबईचे आर्थिक जगतातील हे स्थान आजवर देशातील इतर कोणतेही शहर हिसकावून घेऊ शकलेले नाही.
मुंबईवर महा’लक्ष्मी’चा वरदहस्त आहे, नव्हे मुंबई हे ‘महालक्ष्मी’चे जिवंत प्रतिक आहे. वरळीच्या बांधकामामुळे मुंबईला ‘महालक्ष्मी’चे देऊळ आणि दगडी मूर्ती तर मिळाल्याच परंतु खरी महा’लक्ष्मी’ म्हणून अक्खी मुंबई तिची ‘मूर्ती’ आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महालक्ष्मीचा समुद्रातून झालेला जन्म ही जरी आख्यायिका असली तरी ‘मुंबई’ने मात्र त्या आख्यायिकेला मूर्त स्वरूप दिल आहे यात शंका नाही. ‘मुंबई’ हीच समुद्रातून निघालेली ‘महालक्ष्मी’आहे..!
(मुंबईच्या इतिहासातील पाऊलखुणा यांमधून ही माहिती घेतली आहे..) जय महालक्ष्मी !!