बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (20:07 IST)

विशेष लेख - जीवेत शरद: शतम - श्रीपादकाका सहस्रभोजने

काल संध्याकाळी वॉट्सअँप बघतांना निवृत्त माहिती संचालक शरद चौधरी यांनी पाठविलेली एक पोस्ट बघितली, त्यात श्रीपाद सहस्रभोजने यांचा ९७वा वाढदिवस साजरा झाल्याची बातमी होती.
 
हे श्रीपाद सहस्रभोजने कोण? असा प्रश्न आजच्या पिढीला पडणे साहजिक आहे. मात्र आजपासून ३० ते ५० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पत्रकारितेत सक्रिय असणाऱ्या सर्व पत्रकारांना, त्या काळातील अधिकाऱ्यांना आणि राजकारण्यांना श्रीपाद सहस्रभोजने माहित नाही, असे होणारच नाही. महाराष्ट्राच्या चार दिग्गज मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून श्रीपास सहस्रभोजने यांनी यशस्वी कार्यभार सांभाळला होता. विशेष असे, की परस्परांचे विरोधक असलेल्या मुख्यमंत्र्यांनी विश्वासाने सहस्रभोजने यांना आपल्याकडे मागून घेतले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य माहिती आणि जनसंपर्क संचालक म्हणून ते १९८३ साली निवृत्त झाले होते.
 
श्रीपाद सहस्रभोजने आणि माझा गेल्या ४५ वर्षांपासूनचा संबंध आहे. त्या काळात त्यांची कार्यपद्धती मी जवळून बघितली आहे. त्यापूर्वीच्या काळातही त्यांनी केलेल्या कामांचे अनेक किस्से तत्कालीन पत्रकार आणि राजकारणी सांगतात. नंतरच्या काळात तर त्यांचे माझे कौटुंबिक संबंध प्रस्थापित झाले. ते आजही कायम आहेत. त्यामुळे मी त्यांना काकाच म्हणतो. आणि त्यांनीही तसेच प्रेम मला दिले आहे. जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यकाळ सुरु करणाऱ्या श्रीपाद काका सहस्रभोजने यांचेकडे वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची जबाबदारी आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा जनसंपर्क अधिकारी कसा असावा याचा आदर्शच त्यांनी प्रस्थापित केला. वसंतराव नाईकांचे मुख्यमंत्रीपद गेल्यावर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, वसंतराव आणि शंकरराव यांचे विळ्या भोपळ्याचे सख्ख्य होते. त्यामुळे शंकररावांनी मुख्यमंत्री होताच मुख्यमंत्री कार्यालयातील बहुतेक सर्व जुने अधिकारी बदलले, मात्र सहस्रभिजनेंना त्यांनी आवर्जून आपल्याचकडे ठेऊन घेतले. शंकररावानंतर वसंतदादा पाटील आणि शरद पवार हे मुख्यमंत्री झाले होते, त्यानंतर बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री झाले, त्यांच्या काळात शेतकरी दिंडीने हैदोस घातला होता, माध्यमांनी अंतुलेंना धारेवर धरले होते, यावेळी अंतुलेंचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणारे अधिकारी कमकुवत ठरले होते, एका अतीतटीच्या प्रसंगी श्रीपाद सहस्रभोजनेंनी परिस्थिती हाताळली. ते पाहून अंतुलेंनी आजपासून तुम्ही माझे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम बघा असे सहस्रभोजनेंना सांगितले. तत्कालीन अधिकाऱ्याला त्यांनी तत्काळ खात्याकडे परत पष्टवून दिले. अंतुलेंची बिघडलेली प्रतिमा सुधारण्याचे काम हे शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. मात्र शास्त्रभोजनेंनी हे शिवधनुष्य लीलया पेलले. अंतुले नंतर मुख्यमंत्री झालेल्या बाबासाहेब भोसलेंन्हीही त्यांना आवर्जून आपल्याकडे ठेऊन घेतले होते.
 
तरुण भारतात पत्रकार म्हणून कारकीर्द सुरु करणारे श्रीपाद काका राज्य सर्कसर्चयस प्रसिद्धी खस्त्यात नोकरीलसा लागले तेव्ह्सही जुन्या मध्यप्रांतातील मंत्र्यांनी त्यांना आग्रहाने शासकीय नोकरीत बोलावून घेतले आणि कोणताही अर्ज न करता त्यांना नोकरीवर ठेऊन घेतले. काका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक मात्र काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचे ते लाडके अधिकारी होते, याला कारण झोकून देत काम करण्याची त्यांची मानसिकता हेच होते. कोणतेही काम चांगलेच झाले पाहिजे या आग्रहापोटी ते काहीही करायला तयार असायचे. मला आठवते १९८१ साली मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले चंद्रपूरला आले होते, चंद्रपूरच्या मोर्वी विमानतळापासून त्यांची गावात उघड्या जीप वरून मिरवणूक काढण्यात आली, त्यावेळी मी दूरदर्शनचा न्यूज कॅमेरामन म्हणून कार्यरत होतो, अंतुलेंच्या जीप समोर आणखी एक उघडी जीप दिली होती, त्यात छायाचित्रकारांची सोय होती. त्या जीपवर उभा राहून मी छायाचित्रण करत होतो. चसयाचित्रां करताना दोन्ही हात कॅमेरामध्ये गुंतलेले असायचे त्यामुळे चालत्या जीपवर उभे राहून छायाचित्रण करताना माझा वारंवार तोल जात होता, काकांच्या हे लक्षात येताच ते लगेच जीपवर चढले, आणि पूर्ण अंतर मला धरून उभे राहिले. त्यावेळी सुपर क्लास वन ऑफिसरचा दर्जा असणाऱ्या श्रीपाद काकांनी कोंत्साही कमीपणा न वाटू देता मला सांभाळून घेतले. अश्या प्रकारची मदत त्यांनी फक्त मलाच नाही तर अनेकांना केली.
 
सरकारी नोकरीत वरिष्ठ अधिकारी हे कायम हाताखालच्यांना धारेवर धरणारे असतात, मात्र कनिष्ठांच्या अडचणी समजून घेत, त्यांना मदत करणारे फार थोडे असतात, काका मुंबईत उपसंचालक असताना हाताखालच्या एक माहिती सहाय्यकाचा मोठा भाऊ नागपुरात वारल्याचा फोन आला, पावसामुळे रेल्वे गाड्या बंद होत्या, श्रीपाद काकांनी नियमांची पर्वा न करता स्वतःच्या जोखमीवर त्या माहिती सहाय्यकाला विमानाने नागपूरला पाठवले, आणि भावाचे अंत्यदर्शन घेण्याची संधी मिळवून दिली. तो किस्सा हे माहिती सहायक आजही डोळ्यात पाणी आणून सांगतात.
 
काका जेव्हडे कर्तव्यकठोर तेव्देव्ह तत्वनिष्ठही आहेत. मला आठवते एकदा नागपुरात काका मला सायकलने जाताना दिसले, मी लगेचच स्कुटर घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यावेळी काका मुख्य संचालक पदावर कार्यरत होते, माहिती खात्याच्या नागपूर कार्यालयाला सांगून जीप किंवा कार ते केव्हाही मागवू शकत होते, तरी त्यांना सायकलवर फिरतांना पाहून मी विचारले तेव्हा अविनाश मी सध्या सुट्टीवर आलो आहे, मग सरकारी वषं का वापरायचे? असे उत्तर त्यांनी दिले. खासगी कामासाठी सरकारी वाहन वापरावे लागले तर ते नियमानुसार पैसे कार्यालयात जमा करायचे.
 
निवृत्त झाल्यावर काही वर्ष काका मुंबईत राहिले, नंतर १९९० च्या दरम्यान ते नागपुरात आले इथे पूर्वीकधीतरी घेऊन ठेवलेल्या प्लॉटवर घर बांधले आणि इथेच सपत्नीक राहू लागले. निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले होते, निवृत्तांच्या निवृत्ती वेतनाच्या समस्या ते सोडवून द्यायचे, त्यासाठी संबंधित कार्यालयात ते स्वतः सायकलने जायचे सायकलने जमेनासे झाले तेव्हा बसने फिरायचे मात्र समाजसेवा त्यांनी सोडली नाही.
 
नागपुरात आल्यावर काका सन्यस्त वृत्तीने राहू लागले, फुलपॅण्ट आणि शर्ट हा पारंपरिक पोशाख त्यागून त्यांनी पांढऱ्या धोतराची लुंगी आणि पांढऱ्या सुती कापडाची बंडी असा पोशाख वापरायला सुरुवात केली. केस आणि दाढी वाढवली अगदी मोठ्या समारंभांमध्येही ते आजही अश्याच पोशाखात वावरतात.  
आज वयाच्या ९७व्या वर्षीही काकांचा जनसंपर्क सुरूच आहे. त्यांचा गोतावळा फार मोठा आहे. त्यात कुणाबद्दलही काही कळणे कि आवर्जून त्यांना फोन करायचा हा काकांचा आवडता कार्यक्रम आहे. चांगल्याचे कौतुकही त्यांना आहे. या वयात त्यांनी स्वतःला कामात गुंतवून ठेवले आहे. अजूनही सकाळी उठून संघशाखेत काका न चुकता जातात. वृत्तपत्र वाचन आणि टीव्ही पाहणे हेदेखील सुरूच आहे.
 
काल शरद चौधरींची ही बातमी वाचली आणि काका आणि त्यांच्या परिवाराच्या आठवणी जाग्या आल्या मी लगेच स्कुटर उचलली आणि त्यांच्या रवींद्र नगरातील घरी पोहोचलो, त्यांच्या सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वसुधा सहस्रभोजने या ही होत्या. तासभर गप्पा मारल्या आणि राजगिऱ्याचा लाडू खाऊन परत निघालो रस्त्यातही या सर्वांवर प्रेम करणाऱ्या माणसाचाच विचार करत होतो. साने गुरुजींनी म्हटले आहे, खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे हे तत्व श्रीपादकाका सहस्रभोजने यांनी खऱ्या अर्थाने जीवनात अवलंबले आहे.
 
अश्या या सन्यस्त वृत्तीच्या श्रीपादकाकांना परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावे हीच प्रभुचरणी प्रार्थना.
अविनाश पाठक