आरोग्य विभागाच्या गट ‘क’ची परीक्षा २४ ऑक्टोबर तर गट ‘ड’ची परीक्षा ३१ ऑक्टोबरला
पुढे ढकलण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या नव्या तारखा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्या आहेत. आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त रामास्वामी, संचालक अर्चना पाटील यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्य विभागाच्या गट कची परीक्षा २४ ऑक्टोबर तर गट डची परीक्षा ३१ ऑक्टोबरला होणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
काल, रविवारी राजेश टोपे यांनी लवकरच आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील असे सांगितले होते. तसेच त्यांनी १५, १६ किंवा २२, २३ ऑक्टोबरला पुन्हा परीक्षा होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर या परीक्षेबाबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाची माहिती राजेश टोपे यांना देण्यात आली. त्यानुसार आरोग्य विभागाच्या गट कची परीक्षा २४ ऑक्टोबरला होणार असून गट डची परीक्षा ३१ ऑक्टोबरला होणार आहे. कोणतीही जोखीम न घेता, तसेच रविवार असल्यामुळे सर्व शाळा शंभर टक्के उपलब्ध होतात. त्या अनुषंगाने परीक्षेच्या तारखा ठरवण्यात आल्या आहेत. या बैठकीमध्ये अन्य बाबींवर चर्चा झाली, अशी माहिती टोपे यांनी दिली.
परीक्षेच्या ९ दिवस अगोदर सर्व परीक्षार्थींना हॉल तिकिट दिले जाईल. यादरम्यान कोणत्याही अफेवर विश्वास ठेवू नका. परीक्षेत गैर मार्गांचा अवलंब होणार नाही. पण असे काही गैर दिसेल तर त्वरित पोलिसात एफआयआर दाखल करा, असे आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.