शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Updated : सोमवार, 18 डिसेंबर 2023 (15:21 IST)

Champa Shashthi चंपाषष्ठी संपूर्ण माहिती

khandoba
श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात. 

भंडारा 
खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो. 

तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन "सदानंदाचा येळकोट" किंवा "एळकोट एळकोट जय मल्हार" असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.
 
खंडोबाची पांच प्रतिके: 
१) लिंग: हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते. 
२) तांदळा: हि चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते
.३) मुखवटे: हे कापडी किंवा पिटली असतात. 
४) मूर्ती: ह्या उभ्या, बैठ्या, घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. 
५) टाक: घरांत पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनविलेल्या प्रतिमा.
 
खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्व आहे. 
 
काही सौम्य नवस: 
१) मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे. 
२) दीपमाळा बांधणे. 
३) मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे. 
४) पायऱ्या बांधणे, ओवरी बांधणे. 
५) देवावर चौरी ढाळणे. खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे. 
६) पाण्याच्या कावडी घालणे. 
७) उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतीकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळी कडून देवाची गाणी म्हणविणे. यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. 
८) देवाची गदा म्हणजे वारी मागणे. (देवाच्या नावाने ठराविक काळांत भिक्षा मागणे.) 
९) तळी भरणे, उचलणे, दहीभाताची पूजा देवास बांधणे. 
१०) पुरण-वरण व रोडग्याचा आठवा रीतिनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या-मुरळी यांस भोजन घालणे. 
११) कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे.
 
दिन विशेष: 
रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्टी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्म दिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले.

महाराष्ट्र आणि कर्नाटकांतील बारा प्रसिद्ध स्थाने:
महाराष्ट्र:
१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी 
२) निमगाव 
३) पाली-पेंबर सातारा 
४) नळदुर्ग (धाराशीव-उस्मानाबाद) 
५) शेंगुड (अहमदनगर) 
६) सातारे (औरंगाबाद) 
७) माळेगाव 
 
कर्नाटक: 
१) मैलारपूर-पेंबर (बिदर) 
२) मंगसूल्ली (बेळगाव) 
३) मैलारलिंग (धारवाड) 
४) देवरगुडू (धारवाड) 
५) मण्मैलार (बल्ळारी).
 
खंडोबाचे नवरात्र:
खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात. खंडोबाला मणि-मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी (मल्हारी), मैलार, तसेच (म्हाळसाचादेवीचा पती म्हणून) म्हाळसाकांत, मार्तंडभैरव, किंवा (स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून) खंडोबा म्हणतात. स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचावध करण्यास आला, त्यावेळी खड्गाला खंडा असे नांव पडले. हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले. 

खंडोबाची वेशभुषा: 
साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी, पांढरे धोतर, डोक्याला रुमाल, अंगरखा, उपरणे असा साधाच वेष असतो.
 
प्रमुख भक्ती: 
बेल-भंडार वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ति होय. हळदपूड, सुक्या खोबर्‍याच्या वाट्या एकत्र करुन तो प्रसाद व 
" येळकोट येळकोट जय मल्हार "  हा गजर करतात. याचा अर्थ असा लावतात, की 'हे खंडेराया, सर्वत्र भरपूर अन्न-धान्य पिकू दे. ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान-धर्म करता येईल.
 
खंडोबाच्या हातातील वस्तु: 
खंडोबाच्या चार हातांत खड्ग, त्रिशूळ, डमरु व रुधिर मुंडासह पानपात्र असते. जवळ कुत्रा असतो. मानप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो. 
 
जेजुरी 
जेजुरी हे गाव पुण्याच्या आग्नेयेस ३० मैलावर पुणे-पंढरपुर रस्त्यावर आहे. उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरांत असणार्‍या राममंदिरांत एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण १३, शके १७९२ मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी, बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणार्‍या ६३ ओर्‍या आहेत. 
 
खंडोबाची उपासना:  
खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्ठीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा-संमार्जन करावे. नंतर नवरात्र बसविणार्‍याने स्नान करुन शुचिर्भूत व्हावे. 
 
खंडोबाची पूजा: 
खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रुपकांची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्नसमारंभांतच खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते. 
 
देवाची स्वच्छता, घासपूस करुन पूजा करावी. 
कापूर-चंदनमिश्रीत पाणी एका भाड्यांत घेऊन ते पूजेसाठी वापरावे.
पूजा करताना फुले, गुलाल, व भंडार वहावा. भंडार लावलेले तांदूळाचे दाणे वहावेत.
पूजा करताना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत. 
 
पत्री: 
पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळसीपत्रे, दुर्वांकुरपत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची, सबजाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री-पाने देवास वहावी. 
 
देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे, अलंकार देवास अर्पण करावे. देवासमोर वाटींत दूध ठेवावे. त्रयोदशगुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा. 
देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात.

देवाजवळ नंदादीप 
सहाही दिवस तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात, देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. आरतीसाठी पीठाचे दिवेही केले जातात. सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्राच्या या दिवसांत फार फलदायी होते.
 
महानैवेद्य: 
सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत-बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात. 
खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात. महाराष्ट्रांत चातुर्मासांत कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो. 
 
चंपाषष्ठीस ब्राह्मण-सुवासीनीस भोजन, वाघ्या-मुरळींस भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानविडा-दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. जेवण वाढले की घरांतील सर्वजण ब्राह्मण, वाघ्या-मुरळीकडून ' वारी खंडोबाची ' म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात.
 
तळी भरणे-उचळणे हाही नवस प्रकार करतात. नंतर नवरात्र उठवतात. 
वारी मागणे- काही घरांतून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे. वारीचा अजुनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यांत वारी मागतात. ताम्हण घेऊन पाच घरी ' वारी खंडोबाची ' म्हणून ओरडतात. साधारणपणे कोरडे पीठ वारींत दिले जाते. त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरांतील सर्वजण प्रसाद म्हणून खातात. यामुळे अशा घरास खंडोबा अन्न-धान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे. 

दान-धर्म: 
या नवरात्रांत आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दान-धर्म करावा. अन्नदानास फार महत्व आहे. कुंकू-अक्षतांसह पान-विडा द्यावा.
 
दिवटी-बुधले: 
दिवटी- बुधले याचे महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधांत शांत (विझवावी.) करावी. 
व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे. 
 
लग्नकार्यांत अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे. याही प्रचलीत प्रथा आहेत. 
 
आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जावू नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा, आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे.