शुभ मुहूर्त
यावर्षी वटपौर्णमेचा हा सण 24 जून रोजी आला आहे. वटपौर्णिमेच्या तिथीचा प्रारंभ हा पहाटे 3.32 पासून ते 25 जून रात्रौ 12.09 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे दिवसभरात कधीही वडाची पूजा करणे योग्य ठरेल.
वटपौर्णिमा इतिहास आणि महत्त्व
आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. या दिवशी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून आणि त्याची पूजा करून हे व्रत करण्यात येतं. या दिवशी महिला आपल्या नवऱ्यासाठी उपवास ठेवते. वडाची पूजा करतात, कथा करतात आणि पतीच्या दीघार्युष्याची प्रार्थना करतात. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. या मागील इतिहास म्हणजे या दिवशी सावित्रीने यमदेवाकडून आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणले. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली आणि यमदेवाने तिथेच सत्यवानाला त्याचे प्राण परत दिले असा समज असल्यामुळे या व्रताचं महत्त्व अजूनचं वाढतं.
आयुर्वेदिक महत्त्व
वटपौर्णिमा व्रतात वडाच्या झाडाचं महत्त्व आहे. निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे. अन्य झाडांच्या तुलनेत सर्वाधिक प्राणवायू हवेत सोडणाऱ्या वडाचे झाडं याचे वेगळंच महत्त्व आहे. वडाची आधार वाटणारी गर्द सावली आणि त्याचे औषधी उपयोग व पर्यावरणाच्यादृष्टीने असलेली उपयुक्तता यामुळे त्याची पूजा केली जाते.
पूजा विधी पूजा विधी
पर्यावरणाच्या दृष्टीने वडाला खूपच महत्त्व आहे. वडाचे झाडे हे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरते. वडाच्या झाडेचे अनेक फायदे आहेत. या दिवशी प्रत्यक्ष वडाची पूजा करतात.
ज्येष्ठ पौर्णिमेला सुवासिनी महिला हे व्रत करतात. हे तीन दिवसाचे व्रत आहे. व्रतारंभ हा पौर्णिमेच्या आधी दोन दिवस करण्यात येतो. तरी शक्य नसल्यास केवळ पोर्णिमेला व्रत करुन पूजा करावी. दिवसभर उपवास करून यादिवशी रात्री हा उपवास सोडावा. हे तिन्ही दिवस अगदी षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी. पण रोज शक्य नसल्यास, घरी पूजा, जप, नामस्मरण करण्यात यावे. तिसऱ्या दिवशी अर्थात वटपौर्णिमेला नित्यकर्म, आंघोळ आणि देवाची प्रार्थना, तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करावी.
सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्यलंकार परिधान करावे.
सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, असा संकल्प करावा.
वडाखाली चौरंग मांडून ही पूजा करावी.
प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी.
गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी.
नंतर सती मातेच्या मूर्ती किंवा मूर्ती उपलब्ध नसल्यास इतर अजून एक सुपारीची पण पंचोपचार पूजा करावी.
हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे.
वडाला हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.
5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी.
सुवासिनींसह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.
व्रत करणार्यांनी दिवसभर उपवास करून फळांचे सेवन करावे.
दुसऱ्या दिवशी सकाळी देवाची पूजा करुन दही- भाताचा नेवैद्य दाखवूनही हा उपवास सोडावा.
प्रार्थना
सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।। अशीही प्रार्थना केली जाते.
पारंपरिक कथा
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.
सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.