बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. मैत्री दिन
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

.... त्याही पलीकडील मै‍त्री

NDND
विश्वरचना झाली तेव्हापासूनच स्त्री आणि पुरुष हा आदिम व मूलभूत भेद भाणसाच्या प्रवृत्तीला चिकटला आहे. स्त्री व पुरुषातील नैसर्गिक आकर्षणाच्या स्थायीभाव हा चिरंजीव असला तरी त्याला असलेले असंख्य पापुद्रे सर्वसाधारण मानवी संवेदनांना अजिबात जाणवत नाहीत. माझ्या मते आकर्षणाच्या पलीकडे जाऊन एखाद्या स्त्रीने पुरुषाशी वा एखाद्या पुरुषाने स्त्रीशी केलेली व तरीही गाढ व अव्याहत, निरंतर वाहत राहणारी मैत्री येथे विशेषत्वाने अभिप्रेत आहे.

आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांकडून अशा प्रकारच्या मैत्रीचा प्रस्ताव येण्याचे प्रमाण अगदी नगण्यच. स्त्री मात्र अशा प्रकारच्या मैत्रीची असोशीने वाट बघत असणार्‍या मानसिकतेत वावरणारी. एक स्त्री व दुसरी स्त्री यांच्यातील मैत्री ही नाही म्हटले तरी एका विशिष्ट बिंदूपाशी थांबते एका विशिष्ट मर्यादेपलीकडे तिला विशाल होता येत नाही. असं थांबलेपण मैत्रीचं नातं जून करण्यास आपसूकच कारणीभूत ठरू लागतं. ती मागेही जात नाही पण थांबून गेलेला विस्तार त्या मैत्रीत मग फारसं अप्रूप उरत नाही. एक पुरूष व दुसरा पुरूष यांची मैत्री दोन स्त्रियांमधील मैत्रीपेक्षा काहीशा भिन्न मानसिकतेचे प्रतिनिधित्व करते. या मैत्रीचे हृदय स्त्री-मैत्रीतील मानसिकतेपेक्षा अधिक विशाल असते. कारण 'जेलसी' हा स्वभाव दुर्विशेष प्रामुख्याने स्त्रियांचीच मक्तेदारी मानली जाते.

WDWD
स्त्री ही भावनेला प्रधान मानणारी तर पुरुष हा भावनेला काहीसे दुय्यम स्थान देणारा जात्याच असतो. वात्सल्य-ममता हे स्वभाव विशेष स्त्रीमधे ज्या प्रमाणात वास्तव्य करतात तेवढे ते पुरूषामध्ये करत नाहीत. एखाद्या भिन्न-लिंगी मैत्रीत बरेचदा भावनांना नीट हातळले गेले नाही म्हणून तणाव निर्माण होतो किंवा ती उपरोक्त कारणामुळे तुटायलाही येते. मैत्री सांभाळण्याचे कामही पुरूषांपेक्षा स्त्री जास्त जबाबदारीने करते. स्त्रीला जी मैत्री हवी असते. ती शरीर-निरपेक्ष व मनाच्या गुंत्याची अशी. परंतु, शारीरिक गुंत्यात गुंतायला पुरुष अधिक उत्सुक असतात.

लिंगभेदापलीकडील मैत्री असा अर्थ आपण त्याही पलीकडील मैत्रीच्या संदर्भात घेतला तर त्याहीपलीकहे पोहोचण्याची जी एक बौद्धिक, शारीरिक, मानसिक कुवत लागते ती बाळगण्याची किंवा तशी व्यक्ती उपलब्ध होण्याची टक्केवारी अतिशय नगण्य असते. खरे तर मैत्री असणारी कोणतीही दोन पात्रे एकमेकांच्या संदर्भात जे जाणतात ते इतर कुणीही जाणत नसते. म्हणूनच ज्या दोन व्यक्ती मित्र म्हणून मिरविणार्‍या असतात त्या एकमेकांविषयी आदर बाळगणार्‍या असतील तर त्या मैत्रीकडे केवळ आदराने बघण्याचा डोळा समाजाजवळ असावयास हवा. कारण ही मैत्री त्याहीपलीकडे जाण हे जास्तीत जास्त सहभाग समाजानेच या मैत्रीला कितपत घट्ट हात दिला आहे या समजण्यावर अवलंबून असते.
त्याहीपलीकडे मैत्रीला पोहोचायचं असेल तर कोणत्याही नात्यांची लेबल, भिंती नकोत. नातं पूर्वीचेच एस्टॅबलीश झालेले असेल तर नात्याचा विसर पडून पुढे जाता यायला हवं नाहीतर सुखदेव क्षणकेंच्या शब्दात
त्वचेच्या काठाशी
रुतलेले घर रक्तावे
रक्ताचे पखर नातीगोत
असं म्हणण्याची वेळ येईल. मैत्रीचा प्रवास, कुठपर्यंत असावा हे ठरवणे संबंधित व्यक्तींच्या हातीच असते परंतु, ही मैत्री मग .... त्याही पलीकडे जाते अथवा नाही ही बाब बाजूला राहण्याची शक्यता असते. कारण उभयंताची संमती असेल तर शरीराच्या डोहात बुड़ून पल्याडची अनुभूती घेतली जाऊ शकते. परंतु, येथे उभयपक्ष समान अधिकार बाळगणारे असणे अत्यंत गरजेचे ठरते. जबरदस्ती किंवा लादले जाणे हा प्रकार उद्भवला तर ती लैंगिक शोषणाची बाब होऊ शकते व संबंधाना वेगळेच विघातक वळण लागण्याची शक्यता असते.

थोडक्यात .... त्याही पलीकडल्या मैत्रीचा अनुभव हा नशीबवान वा भाग्यवान लोकांचीच मक्तेदारी आहे असे म्हणू गेल्यास फारसे असंयुक्तिक ठरणार नाही. परंतु अशी मैत्री ही अत्यंत दुर्मिळ दुर्लभ व अशा मैत्रीच्या प्राप्तीसाठी कुठलीही किंमत चुकविण्याची तयारी ठेवणं हा प्रत्येक व्यक्तीला अभिमानास्पदच वाटण्यासारखं आहे. फक्त मैत्री हेवा करण्यासारखी असावी एवढाच मुद्दा आहे.