शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. मैत्री दिन
Written By वेबदुनिया|

नुसते मैत्र नव्हे हा सृजनोत्सव

तरूणाईचा कवी संदीप खरे आणि त्या कवितांना सुरेल चाली लावून म्हणणारा संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्यातील मैत्री म्हणजे सृजनोत्सव आहे. या दोघांची मैत्री रसिकांसाठी मैफल आहे. आयुष्यावर बोलणारी.

या मैत्रीचे धागे तपासू गेलो तर त्यातील गुंतागुंत लक्षात येते. मुळात दोन सृजनशील माणसांच्या व्यक्तिमत्वातच गुंतागुंत असते. त्यात हे दोघे एकत्र आल्यानंतर होणारी गुंतागुंत किती अवघड असेल. संदीपने पहिल्या दोन कॅसेटस शैलेश रानडेबरोबर केल्यानंतर सलील आणि संदीप हे समीकरण बनले.

हे दोन प्रतिभावंत भेटले तेही योगायोगानेच. परस्परांबरोबर काम करण्यापूर्वी दोघांची क्षेत्रे वेगळी होती. सलील कुलकर्णीची ओळख पटू लागली होती ती नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून. त्याने काही चित्रपटांना संगीतही दिले होते. तोपर्यंत संदीपचे काही कॅसेटमुळे नाव होत होते. अचानक एका वळणावर दोघांची गाठ पडली आणि त्यांची जोडी जमली.

आयुष्यावर बोलू काही, नामंजूर आणि सांग सख्या रे या नवीन कॅसेटस म्हणजे या दुकलीच्या प्रतिभेचा उत्कट अविष्कार आहेत. वास्तविक संदीप स्वतः गायकही आहे. त्यामुळे त्याच्या कविता सुचतानाच लय घेऊन येतात. अशावेळी संगीतकार असलेल्या सलीलला वेगळी चाल सुचली तर? पण तसा प्रश्न पडतच नाही. त्यांचे एकमेकांशी अत्यंत चांगले ट्यूनिंग जमले आहे.

दोघांमध्ये असे काय होते, ज्यामुळे ते एकत्र आले? संदीप म्हणतो, मला सलीलची गायकी आवडली आणि त्याची संगीत देण्याची पद्धत. सलीलला संदीपमधील नैसर्गिक कवी आवडला. त्याच्या शब्दांना सूर देणे आपल्याला आवडेल असे सलीलला वाटले आणि सलीलच्या सूरांवर आपल्या शब्दांनी हिंदोळे घ्यावे असे संदीपला वाटले. वास्तविक सलीलची संगीतकार म्हणून ओळख होती. पण तो गायक आहे, हे 'आयुष्यावर...'मधून पहिल्यांदा कळले. संदीपच्या मते 'सलीलला माझ्या काव्यातला भाव ओळखू येतो. त्यानुसारच तो गातो. त्यामुळे ते काव्य रसिकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचते.' थोडक्यात परस्परांच्या बलस्थानांची आणि मुख्य म्हणजे एकमेकांना दोघांची गरज आहे, याची जाणीव त्यांना झाली आणि जोडगोळी जमली. संगीतकारांच्या जोड्या असतात, पण येथे कवी आणि संगीतकारांच जोडी जमली.

आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचेही तसेच. सुरवातीला केवळ प्रयोग म्हणून केलेला हा कार्यक्रम चक्क व्यावसायिक झाला. आता तर त्याने जवळपास साडेतीनशेचा टप्पा गाठला आहे. हा कार्यक्रम म्हणजे दोघांचाही सृजनोत्सव आहे. संदीपचे नवे गाणे आणि सलीलची नवी चाल या कार्यक्रमातून आपल्या भेटीला येते.
दोघांचे हे मैत्र म्हणजे लोकांसाठी शब्द सुरांची मैफल असते. दोघांच्या मैत्रीतून प्रतिभेचे लेणे उभे राहिले आहे. या लेण्याला मैत्रीदिनी सलाम.