मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. मैत्री दिन
Written By वेबदुनिया|

भारतीय अध्यात्माचा पाया असणारी मैत्री

WDWD
कृष्ण आणि अर्जुन यांच्या मैत्रीवर भारतीय अध्यात्मशास्त्राची इमारत उभी आहे. या दोघांच्या मैत्रीला पदरही पुष्कळ आहेत. मैत्रीचा परिपूर्ण अनुभव या दोघांच्या नात्यांत येतो. मैत्रीची संकल्पना आणि मित्रत्वाचे निकषही स्पष्ट होतात.

अर्जुन आणि कृष्णाच्या मैत्रीला व्यापक संदर्भही आहेत. मुळात पांडव पाच असतानाही कृष्णाची विशेष मैत्री अर्जुनाशीच का जुळली? इतर पांडवही चांगले योद्धे असतानाही त्याने अर्जुनाच्याच रथाचे सारथ्य का केले आणि त्याचबरोबर अर्जुनाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगात श्रीकृष्ण का धावून गेला? या सार्‍या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या परस्परसंबंधात आहेत.

कृष्णाकडे अर्जुन केवळ मित्र, सखा, सोबती या भावनेने नाही तर गुरू, मार्गदर्शक अशाही व्यापक अर्थाने पहात होता. त्यामुळेच मित्र कसा असावा हे दोघांच्या नात्यावरून स्पष्ट होते.

कृष्णाने आपल्या बाजूने लढावे यासाठी अर्जुनाने आग्रह धरला होता. तो त्याला स्वतःला भेटायला गेला होता. त्याविषयीची कथाही प्रसिद्ध आहे. कृष्णाचे मोठेपण मान्य करून तो त्याच्या पायाशी बसला तर त्याचवेळी तेथे आलेला दुर्योधन मात्र अहम बाळगत त्याच्या डोक्यापाशी बसला. त्यामुळे उठल्यानंतर कृष्णाचे लक्ष पायाशी बससलेल्या अर्जुनाकडे जाऊन त्याच्याशी त्याने बोलणे सुरू केले. कृष्णाकडे पाहण्याचा अर्जुनाचा आणि दुर्योधनाचा दृष्टीकोन त्यांच्यातील नातेसंबंध स्पष्ट करणारा आहे. त्यामुळेच कृष्ण कौरवांकडे न जाता पांडवांच्या बाजूने गेला. पांडवांतही त्याचे अर्जुनाशी विशेष सख्य झाले.

आपली पुतणी आणि बलरामाची कन्या सुभद्राचे लग्न अर्जुनाशी व्हावे ही सुद्धा त्याचीच इच्छा. त्यानेच सुभद्रेचे हरण करण्यासाठी अर्जुनाला उद्युक्त केले. आपली पुतणी सुस्थळी पडावी ही त्याची इच्छा. त्यासाठी कृष्णाने बलरामाचा रागही ओढवून घेतला.

कुरूक्षेत्रावर आपल्या ज्येष्ठांना आणि गुरूंना पाहून अवसान गळालेल्या अर्जुनाला कृष्णानेच कर्म करण्यासाठी उद्युक्त केले. प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी काय करायचे ते ठरले आहे. त्यामुळे तू क्षत्रिय असल्याने कर्म कर असा उपदेश त्याने अर्जुनाला केला. यानंतर अर्जुन लढला. येथे कृष्णाने खर्‍या मित्राची भूमिका बजावली. प्रसंगी त्याला त्याच्या मानसिक दौर्बल्याला हिणवून त्याला युद्यासाठी त्याने प्रवृत्त केले. आणि त्याच्या या बोलण्यामुळेच युद्धाचे पारडे पांड़वांच्या बाजूने झुकले.

सूर्य मावळेपर्यंत जयद्रथाला मारले नाही तर आग्निकाष्ट भक्षण करीन अशी प्रतिज्ञा केलेल्या अर्जुनाला या संकटातून वाचविणाराही कृष्णच होता. पौराणिक कथेप्रमाणे त्यानेच सूर्य सुदर्शनचक्राद्वारे झाकून सूर्य मावळल्याचा आभास केला आणि त्यानंतर बाहेर आलेल्या जयद्रथाचा वध करण्यास अर्जुनाला सांगितले. कृष्णाचे चातुर्य आणि आपल्या मित्राच्या प्रतिज्ञापूर्तीसाठी चाललेली धडपडही यातून दिसून येते.

अशा अनेक कथांतून या दोघांच्या नातेसंबंधांवर प्रकाश पडतो. कृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या गीतेवर तर भारतीय अध्यात्मशास्त्र उभे आहे. या दोघांच्या संवादातूनही त्यांचे नाते काय होते हे समजते. मैत्रीचा ज्ञानदिवा त्यांनी तेवत ठेवला आणि पुढच्या अनेक पिढ्यांना त्याची प्रेरणा दिली.