सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. त्यांना नेताजी सुद्धा म्हटले जाते.
दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती.
सुभाष चंद्र बोस यांनी दिलेला जय हिंदचा नारा हा भारताचा राष्ट्रीय घोषवाक्य ठरला आहे. “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा” हे त्यांचे भाषणही त्यावेळी खूप लोकप्रिय होते.
१९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते. सुभाषचंद्र त्यांचे सहावे अपत्य व पाचवे पुत्र होते.
वयाच्या १५व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.
१९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.
रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजी मणिभवन नामक वास्तु मध्ये वास्तव्य करत. तेथे जुलै २०, १९२१ रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.
पंडित जवाहरलाल नेहरूंसह, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. १९२८ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले.
जानेवारी २६, १९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली.
२२ जुलै १९४० रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोसांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेशी भेट झाली होती. दोघांमध्ये देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व अस्पृश्यता यावर चर्चा झाली.
आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला.