सिगरेट ओढताय कोरोनाचा तुम्हाला जास्त धोका
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोना संबंधीत एक अति महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, जे लोक सिगारेट ओढतात अशांना कोरोना व्हायरसचा अधिक धोका आहे. दरम्यान, कोरोना बाबत सरकारने सुरु केलेल्या हेल्पलाईन नंबरवर अनेक लोक दररोज संपर्क साधत आहेत. त्यांच्याकडून कोरोनाबाबत प्रश्न विचारले जात आहेत. पीआयबीने ट्विट करून याची माहिती दिली आहे.
सरकारने सुरु केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर अनेकांनी सिगारेट पिण्यामुळे कोरोनाचा संसर्ग होतो का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. यावर उत्तर देताना सांगण्यात आले की, सिगारेट पिणाऱ्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका आहे. कारण सिगारेट पिताना हाताचा आणि ओठांचा वापर होतो. त्यामुळे हा व्हायरस तोंडावाटे आतमध्ये प्रवेश करू शकतो आणि सिगारेट पिणाऱ्या व्यक्तीला कोरोनाचे संक्रमण होऊ शकते.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील स्पष्ट केले आहे की, दारू आणि सिगारेट पिणाऱ्यांना कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आवाहन केले आहे की, सिगारेट पिणाऱ्यांनी आताच सिगारेट पिणे बंद करावे हिच ती योग्य वेळ आहे. तसेच चांगले जेवण, भरपूर झोप आणि नियमित व्यायाम करून आपले आरोग्य निरोगी ठेवा, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.
कोरोनाचे वाढते रुग्ण
देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाडत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये असून याठिकाणी 135 रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात 130, कर्नाटक 55, तेलंगणा 44, गुजरात 43, उत्तर प्रदेश 42, राजस्थान 40, दिल्ली 36, पंजाब 33, हरयाणा 32, तामिळनाडू 29 मध्य प्रदेश 20 रुग्ण आढळून आले आहेत.