आपल्या आहारातील सर्वाधिक पोषक अन्न म्हणून माशांची ख्याती आहे. माशांचे मानवी शरीरासाठी असणारे अगणित फायदे आपल्याला सांगितले जातात, पण माशांमुळे डोळे आणि त्वचा सुंदर होते असं वक्तव्य केलंय महाराष्ट्र सरकारमधील भाजपाचे मंत्री विजयकुमार गावित यांनी केलंय.
टीव्ही 9 नं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
एका कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांना माशांच्या सेवनाचे फायदे सांगताना विजयकुमार गावित म्हणाले, "तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? ती दररोज मासे खायची. बघितले ना तिचे डोळे? नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर झालेत."
ते पुढे म्हणाले, "मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात, डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचं तेल असतं. त्या तेलामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वचाही चांगली दिसते."
अर्थात "मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात, डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितलं तरी पटवूनच घेणार," या वाक्याचं अजिबात समर्थन केलं जाऊ शकत नाही.
पण, खरंच मासे खाणं तब्येतीसाठी उपायकारक आहे का?
तर जर्नल ऑफ इंटर्नल मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, मासे आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड समृध्द अन्नपदार्थ खाल्ल्याने कर्करोग आणि हृदयविकार यांसारख्या आजारांमुळे मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो.
सुरमई, बांगडा, कुपा यांसारख्या तेलकट माशांच्या सेवनाने हृदविकारांचा धोका कमी होतो, कारण त्यात आइकोसेपेन्टाएनोइक अॅसिड (ईपीए) आणि डोकोसाहेक्साएनोइक अॅसिड (डीएचए) यांसारख्या समुद्री ओमेगा-3 प्रकारच्या मेदाम्लांचा समावेश असतो.
"मानवी चयापचय क्रियेमध्ये ईपीए आणि डीएचए या दोन्हींच्या अनेक महत्त्वाच्या भूमिका असतात, पण हे घटक आपण आपल्या शरीरातच पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत त्यामुळे आपल्या आहारामध्ये माशांचा समावेश करणं खरोखरच महत्त्वाचं आहे," असं तज्ज्ञ सांगतात.
तर इंग्लंडमधील साउदम्प्टन विद्यापीठातील मानवविकास आणि आरोग्य विभागाचे प्रमुख फिलिप काल्डर म्हणतात, "माशांमधील ओमेगा-3 चे शरीरावर कसे परिणाम होतात हे दाखवणारी लोकसंख्याधारित आकडेवारी आपल्याकडे आहे. ईपीए आणि डीएचए यांचं जास्त सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकारासारखे आजार आढळण्याची आणि त्यात त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी असते."
माशांमुळे त्वचेचा रंग सुधारतो का हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने त्वचारोग तज्ञ डॉ. अनुजा वैद्य यांच्याशी संपर्क साधला.
यावेळी त्या म्हणाल्या की, "त्वचा तजेलदार किंवा नितळ करण्यासाठी केवळ माशांचं सेवन केलं पाहिजे असं नसतं. आपल्या आहाराचाही उपयोग आपली त्वचा नितळ ठेवण्यासाठी आणि रंग खुलवण्यासाठी होतो. जसं की माशांमध्ये जे फॅटी ऍसिड असतात ते त्वचा नितळ ठेवण्यासाठी पूरक अशी भूमिका बजावू शकतात पण त्यासोबतच त्वचेचा पोत आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन इतर औषधही घ्यावी लागतात."
त्या पुढे सांगतात, "माशांमध्ये असलेले फिश ऑईल तुमच्या त्वचेसाठी चांगलं असतं. फिश ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई असतं, मात्र त्याच्या गोळ्या ही बाजारात मिळतात. त्वचा चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक असतं. पण माशांमध्ये याचे प्रमाण फार जास्त नसतं. अशावेळी आपल्याला इतर पर्याय शोधावे लागतात."
थोडक्यात त्वचेचा रंग उजळायचा म्हणून केवळ माशांचंच सेवन केलं पाहिजे असं नसतं, पण माशांमधील घटक पूरक भूमिका बजावू शकतात हे देखील तितकंच खरं आहे असं डॉ. वैद्य सांगतात.
डोळ्यांसाठी फायदेशीर
ओमेगा -3 फॅटी ऍसिड दृष्टी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. संशोधनानुसार, ओमेगा-3 फॅटी अॅसिडच्या सेवनाने मेंदू आणि डोळ्यांना खूप फायदा होतो. माशांमध्ये या आम्लाचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे मासे दृष्टी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
यासंदर्भात आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क केला.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "माशांमध्ये बऱ्याच प्रकारची जीवनसत्वं असतात. त्याचा फायदा आपल्या संबंध शरीराला होत असतो. माशांमध्ये अ जीवनसत्व असतं. ज्याप्रमाणे गाजर, पपई शेवग्याच्या शेंगां मधून अ जीवनसत्व मिळतं तेवढ्याच प्रमाणात ते माशांमधून ही मिळतं. त्यामुळे अ जीवनसत्वाचा मुबलक पुरवठा झाल्याने आपल्या डोळ्यांना त्याचा निश्चित फायदा होतो."
पण मासे खाल्ल्याने डोळ्याचा रंग बदलतो का? या प्रश्नावर डॉ. लहाने सांगतात, " माशांच्या सेवनामुळे डोळ्यांचा रंग बदलत नाही. मात्र अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे डोळ्यांचा रंग धूसर झालेला असतो तो सुधारतो."
अ जीवनसत्व कमी असल्यास डोळ्याला पांढरेपणा येतो, ज्याला मळकट काळा रंग असं म्हणता येईल. याला बीटाट स्पॉट असं म्हणतात. पण अ जीवनसत्व मुबलक प्रमाणामध्ये घेतल्यास हा रंग सुधारतो असंही त्यांनी सांगितलं.
माशांमुळे बुद्धी वाढते का?
वॉशिंग्टन विद्यापीठातील 'स्कूल ऑफ मेडिसिन'मधील रेडिऑलॉजी आणि न्यूरॉलॉजीचे सहायक प्राध्यापक सायरस राजी सांगतात, "सुधारलेलं आरोग्य आणि आजार यांनी आपल्या मेंदूची घनता बदलते. मज्जातंतूंची संख्या जितकी जास्त तितकी मेंदूची घनता जास्त असते."
सरासरी सत्तरीच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या 167 व्यक्तींच्या मासे खाण्याच्या सवयी आणि एमआरआय स्कॅन यांची तुलना संशोधकांनी केली.
तेव्हा त्यांना असं आढळलं की, मासे न खालेल्या सहभागी व्यक्तींपेक्षा दर आठवड्याला मासे खालेल्या व्यक्तींच्या मेंदूची घनता जास्त होती.
विशेषतः त्यांच्या अग्रखंडाची (फ्रंटल लोब) घनता जास्त होती- लक्ष्य केंद्रित करण्यासाठी हा भाग महत्त्वाचा असतो. शिवाय, त्यांच्या शंखखंडाची (टेम्पोरल लोब) घनताही जास्त होती- स्मरणशक्ती, अध्ययन आणि बोधक्षमता यांच्यासाठी हा भाग कळीचा असतो.
मासे शरीरातील जळजळ कमी करतात, या परिणामाशी मासे आणि मेंदू यांच्यातील संबंध घनिष्ठ जोडलेले असावेत, कारण जळजळ कमी करण्यासाठी मेंदू प्रतिसाद देतो तेव्हा त्या प्रक्रियेत मेंदूतील पेशींवर परिणाम होत असतो, असं राजी म्हणतात.
"याचा अर्थ, माशाला नेहमीच्या आहारात जागा दिली, तरी आपण मेंदूचं आरोग्य सुधारू शकतो आणि त्यातून अल्झायमर्ससारख्या आजारांना प्रतिबंध होऊ शकतो," असं राजी म्हणतात.
मेंदू शक्य तितका चिवट व्हावा, यासाठी विशी-तिशीतल्या लोकांनी आठवड्यातून किमान एकदा मासे खायला सुरुवात करावी, असं राजी सुचवतात.