रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: रविवार, 31 डिसेंबर 2023 (10:19 IST)

किडनीचं किती नुकसान झालंय हे लघवीच्या रंगावरून कसं ठरवायचं?

किडनीद्वारे आपल्या शरीरात असणाऱ्या द्रव पदार्थातील अनावश्यक घटक आणि अतिरिक्त पाणी गाळले जाते अर्थात स्वच्छ केले जाते. त्यानंतर ते मूत्राद्वारे शरीरातून बाहेर फेकले जाते.
 
तर भारतात गंभीर आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये 10 पैकी 9 प्रमुख कारणं ही किडनीच्या आजाराची असतात.
 
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या 'इंडिया: हेल्थ ऑफ द नेशन स्टेट (2017)' या अहवालानुसार, किडनीचे आजार हे भारतातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वृद्धत्व ही या आजाराच्या वाढीची प्रमुख कारणे आहेत.
 
नेचर या वैद्यकीय जर्नलच्या विश्लेषणानुसार, जगात किडनीच्या आजाराची जवळपास 69.7 मिलियन प्रकरणं आहेत, त्यापैकी 1.15 मिलियन प्रकरणं एकट्या भारतात आहेत.
 
2010 ते 2013 दरम्यान, 15-69 वर्ष वयोगटातील जे मृत्यू झाले त्यापैकी 2.9% प्रकरणं ही किडनी निकामी होऊन मृत्यू झाल्याची होती. मात्र मागील दशकाच्या तुलनेत (2001 ते 2003) त्यात 50% वाढ झाली आहे.
 
किडनी निकामी होण्यामागे मधुमेह हे प्रमुख कारण होतं.
 
किडनी आणि लघवी यांचा संबंध काय आहे?
या आजाराची कारणे सखोलपणे समजून घेण्यासाठी बीबीसीने नेफ्रोलॉजिस्ट असलेल्या डॉ. सिद्धार्थ जैन यांच्याशी संवाद साधला.
 
लघवी आणि किडनीचा संबंध स्पष्ट करताना ते म्हणाले, "लघवी ही किडनीत तयार होते. लघवीतून शरीरातील हानिकारक चयापचय घटक काढून टाकले जातात. किडनी शरीरात असणाऱ्या द्रव पदार्थातील अतिरिक्त कचरा काढून टाकण्याचं काम करते."
 
सोप्या शब्दात, किडनी ही आपल्या शरीराची फिल्टर प्रणाली आहे. किडनी रक्तातील कचरा काढून टाकते, जो लघवीच्या माध्यमातून बाहेर पडतो.
 
प्रोटीन्युरिया म्हणजे काय आणि यातून किडनी खराब झाल्याचं कसं समजतं?
डॉ. जैन यांनी प्रोटीन्युरियाबद्दल तपशीलवार माहिती दिली. ते सांगतात, "प्रत्येक निरोगी व्यक्तीचे शरीर लघवीद्वारे काही प्रमाणात प्रथिने उत्सर्जित करते. परंतु जेव्हा ही प्रथिने शरीरातून मोठ्या प्रमाणात उत्सर्जित केली जातात तेव्हा ते शरीरासाठी धोकादायक ठरतं. आणि या गळतीला प्रोटीन्युरिया असं म्हणतात."
 
प्रोटीन्युरियाचे सर्वात सामान्य कारण म्हणजे मधुमेह. जर एखाद्या व्यक्तीला अनियंत्रित मधुमेह असेल, तर लघवीद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रथिने बाहेर टाकली जातात. अशा प्रकारे, अनियंत्रित मधुमेहाचे पहिले लक्षण म्हणजे प्रोटीन्युरिया आहे.
 
प्रोटीन्युरियाची इतर कारणे म्हणजे उच्च रक्तदाब आणि किडनीशी संबंधित इतर आजार.
प्रोटीन्युरियाच्या लक्षणांबद्दल बोलताना ते सांगतात, "जर रुग्णांना वाटत असेल की त्यांची लघवी फेसाळ आहे, तर ते प्रोटीन्युरियाचे लक्षण आहे."
 
प्रोटीन्युरियाच्या पुढच्या टप्प्यात रुग्णांचे हात आणि पाय सुजतात. थकवा, ओटीपोटात दुखणं किंवा पोटात संसर्ग होऊ शकतो.
 
या आजाराच्या इतर कारणांमध्ये रक्तदाब आणि किडनीशी संबंधित इतर आजारांचा समावेश होतो.
 
लघवीचा रंग आणि किडनीचा आजार
लघवीत पाणी, युरिया आणि क्षार असतात. जेव्हा शरीरात अमीनो आम्लाचे प्रमाण जास्त होते तेव्हा यकृतामध्ये युरिया तयार होतो.
 
युरिया हा आपल्या द्रव घटकांतील मुख्य कचरा समजू. हा युरिया लघवीद्वारे शरीराबाहेर फेकला जातो.
 
हार्वर्ड हेल्थ या वैद्यकीय जर्नलनुसार, लघवीत अतिरिक्त पाणी आणि कचरा असतो. आपल्या शरीरातील द्रव पदार्थ किडनीद्वारे स्वच्छ करून रक्तात शोषले जातात. त्याचा रंग सामान्यतः फिकट पिवळा ते गडद तपकिरी असतो. या रंगावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
 
डॉ. जैन पुढे सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीला त्याची लघवी लाल, तपकिरी किंवा इतर कोणत्याही गडद रंगाची वाटत असेल तर त्याने काळजी घ्यावी.
 
तसेच, लघवीचे प्रमाण सामान्यपेक्षा खूपच कमी किंवा सामान्यपेक्षा जास्त असल्यास किंवा व्यक्तीला वारंवार लघवी करावी लागत असल्यास किंवा व्यक्तीला लघवी करताना खूप त्रास होत असल्यास आणि ती अजिबात नियंत्रित करता येत नसल्यास किडनीचा त्रास होण्याची शक्यता असते.
 
किडनीचं नेमकं काम काय आहे?
किडनी हा शरीराचा एक आवश्यक अवयव आहे आणि त्याची अनेक कामं आहेत.
 
जसं की, ते तुमच्या शरीरातील कॅल्शियम, सोडियम आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्सचे निरोगी संतुलन राखण्यास मदत करतात.
 
लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतात. तुमच्या रक्तातील नाजूक ऍसिड-बेस (पीएच) संतुलन राखतात. आपल्या शरीरातील कचरा द्रव स्वरूपात काढून टाकतात.
 
किडनी ही शरीरातील जास्तीचे पाणी, क्षार आणि युरिया उत्सर्जित करतात.
 
आपल्या शरीरातील रक्त उच्च दाबावर शुद्ध केलं जातं. हे रक्त किडनीत येतं आणि किडनी यातील ग्लुकोज, फायदेशीर क्षार आणि पाणी यासारख्या उपयुक्त पदार्थांचे पुनर्शोषण करते. रक्त शुद्ध झाल्यानंतर रक्तवाहिनीद्वारे रक्ताभिसरण प्रणालीकडे परत येते.
 
किडनी शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करते.
 
मधुमेहामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. जगभरातील जवळपास 41.5 दशलक्षालहून अधिक लोक मधुमेहाने त्रस्त आहेत.
 
मधुमेह हा किडनी निकामी होण्याचं प्रमुख कारण आहे. मधुमेह असलेल्या सुमारे 40 टक्के लोकांना शेवटी किडनीचा आजार होतो.
 
किडनीचे गंभीर आजार काय आहेत?
किडनीच्या आजाराची सर्वात सामान्य कारणे म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह.
 
प्रत्येक किडनीमध्ये नेफ्रॉन नावाचे सुमारे 1 दशलक्ष छोटे फिल्टरिंग युनिट्स असतात. नेफ्रॉनला दुखापत करणारा किंवा प्रभावित करणारा कोणत्याही घटकामुळे किडनीचा आजार होऊ शकतो. मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्हीमुळे किडनी खराब होऊ शकते.
 
उच्च रक्तदाबामुळे किडनी, हृदय आणि मेंदूतील रक्तवाहिन्यांनाही नुकसान होऊ शकते. किडनी अत्यंत संवहनी असते. म्हणजे त्यात अनेक रक्तवाहिन्या असतात. म्हणून रक्तवाहिन्यांचे रोग सामान्यतः आपल्या किडनीसाठी देखील धोकादायक असतात.
 
क्रॉनिक किडनी डिसीज (ज्याला क्रॉनिक किडनी फेल्युअर असेही म्हणतात) म्हणजे किडनी आपलं काम करणं बंद करते.
 
क्रॉनिक किडनी डिसीजची लक्षणे कालांतराने विकसित होतात आणि किडनीला हळूहळू नुकसान पोहोचते.
 
या लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या, भूक न लागणे, थकवा आणि अशक्तपणा, झोपेची समस्या, लघवीत बदल, नैराश्य, स्नायू दुखणे आणि हातांना सूज येणे यांचा समावेश होतो.
 
क्रॉनिक किडनी डिसीज मध्ये कालांतराने आणखीन वाढ होते आणि किडनी काम करणं थांबवते.
 
Published By- Priya Dixit