शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (20:24 IST)

फायब्रॉईड म्हणजे काय? गर्भाशयात गाठी का होतात? त्यांची लक्षणं काय?

uterus
सामान्य भाषेत सांगायचं झालं तर 'फायब्रॉईड' म्हणजे गर्भाशयात किंवा गर्भाशयाच्या बाजूला तयार होणारी गाठ. फायब्रॉईड्स एक-दोन किंवा अनेक असू शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, फायब्रॉईड म्हणजे कॅन्सरची गाठ अजिबात नाही. फायब्रॉईड्स स्नायूपेशी (Muscle Cells) आणि तंतुपेशी (Fibroid Cells) यांच्यापासून बनलेले असतात. फायब्रॉईड्स कशामुळे होतात याचं निश्चित कारण सांगता येत नाही. तज्ज्ञ म्हणतात, तिशीच्या आसपास असलेल्या स्त्रियांपैकी 20 टक्के महिलांच्या गर्भाशयात गाठी होण्याची शक्यता असते.
 
'फायब्रॉईड्स' म्हणजे काय? याची कारणं काय आहेत? यावर उपचार कसे करतात? हे तज्ज्ञांकडून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
फायब्रॉईड्सची लक्षणं काय?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार पाळीच्या दिवसात अतिरक्तस्राव होणे, पाळी लवकर येणं आणि पाळीच्या दिवसाच खूप जास्त वेदना होणं याचं एक प्रमुख कारण फायब्रॉईड्स असण्याची शक्यता असते.
 
व्होकार्ट रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. इंद्राणी साळुंखे फायब्रॉईड्सच्या लक्षणांची माहिती देतात.
 
* पाळीच्या दिवसात होणारा अतिरक्तस्राव
* पाळी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहणे
* सारखं लघवीला होणं
* पाठदुखी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, प्रजननात होणारा त्रास उदाहरणार्थ- वंध्यत्व, एकापेक्षा जास्त वेळा झालेला गर्भपात आणि वेळेआधी येणाऱ्या प्रसूतीकळा ही देखील फायब्रॉईड्सची लक्षणं आहेत.
 
तज्ज्ञ सांगतात, की गाठ कुठे आहे आणि किती आहेत यावरून महिलांना होणारा त्रास अवलंबून असतो. एक किंवा दोन गाठी असल्या तर त्रास फार जास्त होत नाही. पण, गाठीच्या आकारात वाढ झाली किंवा गाठींची संख्या वाढली तर लक्षणं दिसू लागतात.
 
फायब्रॉईड्स कशामुळे होतात?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, फायब्रॉईड्स कशामुळे होतात याचं ठोस कारण नाही. गर्भाशयाचे स्नायू गुळगुळीत आणि लवचिक असतात. या स्नायूंची अतिरिक्त वाढ झाल्यामुळे फायब्रॉईड्स तयार होतात.
 
फायब्रॉईड्स होण्याची कारणं-
आनुवंशिकता- अनेक फ्रायब्रोइड्स आनुवंशिक (Genetic) घटकांमुळे होतात
हार्मोन- फायब्रोईडममध्ये महिलांच्या शरीरातून निघणाऱ्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन होर्मोनचं प्रमाण गर्भाशयातील स्नायूंपेक्षा जास्त असतं
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी भालेराव-गांधी यांनी महिलांच्या आरोग्यावर एक पुस्तक लिहिलंय.
 
त्या म्हणतात, "गर्भाशय तीन थरांचं बनलेलं असतं. यातील मधल्या अस्तरातील स्नायूपेशींची काही कारणांमुळे जास्त वाढ झाल्यास त्याचं रूपांतर लहान-मोठ्या गाठीत होतं. याला 'तंतुस्नायू-अर्बुद' म्हणजेच Fibrosis Uterus असं म्हणतात."
 
फायब्रॉईड्सच्या गाठींची सुरवात गर्भाशयाच्या मधल्या अस्तरात होते. त्यानंतर यांचा आकार हळूहळू वाढत जाऊन ते आतल्या किंवा बाहेरच्या अस्तरावर दवाब आणतात.
 
त्या पुढे लिहितात, "गाठीचा आकार वाढल्याने ओटीपोटातील गर्भाशय पोटाच्या पोकळीत वाढू लागतं. त्यामुळे पोटात जड वाटू लागतं."
 
काहीवेळा मूत्राशय किंवा गुदद्वारावर भार पडल्यामुळे लघवीला त्रास होणं किंवा बद्धकोष्टतेचा त्रास होण्याची शक्यता असते.
 
फायब्रॉईड्सचे प्रकार कोणते?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फायब्रोईड्सच्या चार प्रमुख प्रकारांची माहिती दिली आहे.
 
इंट्राम्युरल फायब्रॉईड्स (Intramural Fibroids)- हे फायब्रॉईड्स गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये तयार होतात. सामान्यत: याच जागेत गाठी तयार होतात
सब सिरोस फायब्रॉईड्स (Sub Serous Fibroids)- या गाठी गर्भाशयाच्या बाहेर तयार होतात
सब म्युकस फायब्रॉईड्स (Sub Mucous Fibroids)- या गाठी गर्भाशयाच्या मध्यभागी तयार होतात
पेडूनक्युलेटेड (Pedunculated) फायब्रोइड्स- या गाठी गर्भाशयाच्या बाजूला तयार होतात
 
फायब्रॉईड्सचा त्रास कोणाला होऊ शकतो?
हिंदुजा रुग्णालयातील डॉ. अश्विनी भालेराव-गांधी त्यांच्या पुस्तकात सांगतात, "फायब्रॉईड्स होण्यामागे बऱ्याच वेळा आनुवंशिकता कारण असू शकतं. आजी, आईला फायब्रॉईड्सचा त्रास असल्यास नात, मुलगी यांच्यामध्ये सुद्धा फायब्रॉईड तयार होण्याची शक्यता असते."
 
स्त्रीरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, 20 ते 45 वयोगटातील प्रजननक्षम महिलांमध्ये फायब्रॉईड्स होण्याची शक्यता जास्त असते. डॉ. इंद्राणी साळुंखे सांगतात, "मासिक पाळी लवकर आल्यास किंवा रजोनिवृत्ती उशीरा आल्यासही फायब्रॉईड होण्याची शक्यता असते."
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार लग्न न झालेल्या स्त्रिया, वंध्यत्वाने ग्रासलेल्या स्त्रिया, एखादच मूल असलेल्या स्त्रियांमध्ये फायब्रोइड्स जास्त प्रमाणात आढळून येतात. काही वेळा लहान वयामध्ये विशीच्या आतही या गाठी गर्भाशयात वाढीला लागतात.
 
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर सांगतात, "फायब्रॉईड मोठे आणि गर्भाशयाच्या आतील भागात असतील तर प्रजननासाठी त्रास होऊ शकतो. जर इंट्राम्युरल फायब्रॉईडमुळे काहीवेळा गर्भपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही."
 
फायब्रॉईड्सची तपासणी कशी करतात?
योनीमार्गाची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर फायब्रॉईड्सची माहिती मिळते. काही वेळा सोनोग्राफी करून याची तपासणी करावी लागते. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. इंद्राणी साळुंखे फायब्रॉईड्सच्या तपासणीच्या तीन पर्यायांची माहिती देतात.
 
सोनोग्राफी- याच्या मदतीने फायब्रॉईड्स कुठे आहेत आणि किती आहेत हे तपासण्यात येतं
MRI- फायब्रोइड्सचा (गाठी) आकार आणि त्यांची जागा तपासली जाते
 
हिस्टरेस्कोपी- यात वैद्यकीय तज्ज्ञ गर्भाशयाच्या मुखातून टेलिस्कोप गर्भाशयात नेतात. गर्भाशयाची तपासणी केली जाते
 
फायब्रॉईड्सवर उपाय काय?
महिलेच्या शरीरात फायब्रॉईड्सची संख्या जास्त असेल, आकार मोठा असेल किंवा यामुळे पाळीचा त्रास होत असेल तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार शस्त्रक्रियाकरून गाठी काढाव्या लागतात.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार यात मायमेक्टॉमी आणि हेस्टरेक्टॉमी या दोन प्रमुख शस्त्रक्रिया आहेत.
 
मायमेक्टॉमी- महिलेला भविष्यात मूल व्हावं अशी इच्छा असेल तर गर्भाशय आणि गर्भाशयाच्या भिंतींवरील गाठी काढून गर्भाशय तसंच ठेवलं जातं. पण ही शस्त्रक्रिया प्रत्येकवेळी शक्य असतेच असं नाही.
हेस्टरेक्टॉमी- फायब्रोइडसाठी ही सामान्यत: केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. यात महिलेचं गर्भाशय काढून टाकण्यात येतं.
 
तज्ज्ञ म्हणतात, की वयाची पस्तिशी ओलांडलेल्या माहिलेला फायब्रॉईड्सचा त्रास होत असेल तर गर्भाशय काढून टाकणं योग्य ठरतं आणि महिला 45 वर्षांपेक्षा जास्त असेल तर गर्भाशयासोबत काहीवेळा स्त्रीबीजकोषही काढून टाकण्यात येतो.
 
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी भालेराव गांधी पुस्तकात लिहितात, "काही महिला विचारतात की शस्त्रक्रिया केली नाही तर काय होईल? गाठ खूप मोठी झाल्यास अतिरक्तस्राव होऊन जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. गाठीचा दबाव मूत्राशय, मूत्रवाहिनीवर पडून लघवीला त्रास होऊ शकतो. काहीवेळा गाठीचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं."
 
तज्ज्ञ सांगतात, की एखादी छोटी गाठ असेल तर गर्भाशय काढून टाकण्याची गरज नसते. गर्भाशयातील गाठ वाढत नसेल तर शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते.
 
पण फायब्रॉइड्सचा त्रास असलेल्या एखाद्या महिलेला गर्भाशय काढायचं नसेल तर काय उपाय आहे?
डॉ. पालशेतकर पुढे सांगतात, की अशा महिलांमध्ये गर्भाशयाच्या आत एक वस्तू (Intrauterine Device) बसवली जाते. यावर प्रोजेस्ट्रोन हार्मोन असतात. यामुळे रक्तस्राव नियंत्रणात येण्यास मदत होते. महिलांच्या गर्भाशयात बसवण्यात येणाऱ्या वस्तूला सामान्य भाषेत 'कॉपर-टी' असं म्हटलं जातं.

Published By-Priya Dixit